तिसरी, सहावी, दहावीसाठी पुढील वर्षापासून ‘एनईपी’

0
15

>> शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांची माहिती; 2027-28 या वर्षापासून सर्व इयत्तांना राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू होणार

पुढील 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी, सहावी आणि दहावीच्या वर्गाला राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2027-28 या वर्षापासून सर्व इयत्तांना एनईपी अभ्यासक्रम लागू होणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली. आगामी 2024-25 च्या शैक्षणिक वर्षात ऑगस्टपासून इयत्ता नववीसाठी एनईपी अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याने गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून नववीची परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने नववीच्या इयत्तेसाठी एनईपी अभ्यासक्रम लागू करण्याच्या विषयावर चर्चेसाठी राज्यातील मुख्याध्यापकांची एक बैठक मंगळवारी पर्वरी येथे घेतली. या बैठकीत नववीसाठी एनईपी अभ्यासक्रम लागू करण्याच्या विषयावर चर्चा करून त्यांच्या तक्रारी, शंका जाणून घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. एनईपी अभ्यासक्रम राबविण्यात येणाऱ्या सर्व अडचणींवर तोडगा काढण्यात येणार आहे. येत्या जून महिन्यात एनईपी समिती आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी सर्व तालुक्यांना भेटी देऊन सर्व संबंधितांशी संवाद साधणार आहेत. तसेच, दर दोन महिन्यांनी एनईपी अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रसाद लोलयेकर यांनी दिली.

एनईपी अभ्यासक्रमामुळे पाठपुस्तकामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. एनसीईआरटीने तयार केलेली पुस्तके वापरली जाणार आहेत. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नववीची परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे. उत्तरपत्रिकेची तपासणी विद्यालयातील शिक्षकवर्गाने केल्यानंतर गुण मंडळाकडे पाठविण्यात येतील, असेही लोलयेकर यांनी सांगितले.

एनईपी अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांना तालुका पातळीवर खास मार्गदर्शन, प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी नामवंत संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. तसेच, शिक्षकांच्या नियुक्ती, उपलब्धतेबाबत विद्यालयांना पूर्ण सहकार्य केले जाणार आहे, असेही लोलयेकर यांनी सांगितले.
एनईपी अभ्यासक्रम माध्यमिक स्तरावर राबविणारे गोवा हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे, असेही लोलयेकर यांनी सांगितले.
यावेळी शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे, गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये, शिक्षण खात्याचे अधिकारी डॉ. शंभू घाडी, मेघना शेटगावकर, एनईपी समितीचे कांता पाटणेकर, जे. रिबेलो यांची उपस्थिती होती.

विषय कोणते?, अभ्यासक्रम कसा?
सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन भाषांच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. एनईपीमुळे सर्व भाषा एकाच पातळीवर आणण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना एक विदेशी आणि दोन स्वदेशी भाषा शिकण्याचा पर्याय दिला जाईल. विदेशी भाषा म्हणून इंग्रजी भाषा आणि देशी भाषा म्हणून दोन देशी भाषा निवडाव्या लागणार आहेत. फ्रेंच, पोर्तुगीज अन्य विदेशी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील निर्णयापर्यंत तात्पुरती सूट दिली जाईल.
गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र हे विषय कायम आहेत. व्होकेशनल स्टडीज, इंटर डिसिप्लिनरी आणि आर्ट शिक्षण, शारीरिक शिक्षण हे नवीन विषय समाविष्ट केले जाणार आहेत.

व्यावसायिक शिक्षणामध्ये 15 एनएसक्यूएफ अंतर्गत विभागांचा समावेश आहे. सध्याचा संगणक विषय सुध्दा एनएसक्यूएफमध्ये समाविष्ट केला जाईल, शारीरिक शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षण, योग, वेल बिईंग याचा समावेश केला जाईल. कला शिक्षणामध्ये फाईन आर्ट, थिएटर आर्र्ट, संगीत आणि परफॉर्मिंग आर्ट यांचा समावेश असेल, अशी माहिती शिक्षण सचिवांनी दिली.