तातोडामधील नियोजित धरणाला स्थानिक जमीनमालकांची संमती

0
5

धारबांदोडा तालुक्यातील काजूमळ-तातोडा येथील नियोजित धरणाला स्थानिक जमीन मालकांनी काल संमती दिली आहे.
काजूमळ-तातोडी येथील नियोजित धरणाच्या विषयावर चर्चेसाठी स्थानिक जमीनमालकांची बैठक त्याच भागातील रसराज फार्ममध्ये घेण्यात आली. यावेळी राज्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, स्थानिक आमदार डॉ. गणेश गावकर व इतरांची उपस्थिती होती.
राज्य सरकारच्या जलस्रोत खात्याकडून विविध भागांत नवीन धरणे उभारण्याचे नियोजन केले जात आहे. त्यात काजूमळ-तातोडी येथेही धरण प्रकल्पाचा समावेश आहे.

या नियोजित धरण क्षेत्रात ज्या नागरिकांच्या जमिनी येत आहेत, त्या 40 नागरिकांना बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते. जलस्रोत खात्याचे अधीक्षक अभियंता दिलीप नाईक, कार्यकारी अभियंता लीलेश खांडेपारकर आणि साहाय्यक अभियंता दामोदर प्रभूदेसाई यांनी जमीनमालकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन स्पष्टीकरण केले.

या धरणामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना सरकारी पातळीवरून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार आहे. बाधित भागात घरे बांधणे, संरक्षक भिंती बांधणे, छोटे बंधारे बांधण्यात येणार आहेत. धरणासाठी जमीन देणाऱ्या सर्व लोकांना जास्तीत जास्त भरपाई आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्यात आला आहे.
सर्व संबंधितांच्या सहकार्याने डिसेंबर 2025 पर्यंत धरण प्रकल्प पूर्ण करण्याचा आराखडा तयार केला आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.