ड्रग्सची खरेदी गोव्यातून; विक्री हैदराबादमध्ये

0
23

>> अमलीपदार्थांचे गोवाहैदराबाद कनेक्शन पुन्हा उघड

>> तेलंगणा पोलिसांकडून 2 हस्तकांसह ग्राहकास अटक

तेलंगणातील विशेष तपास पथक, राजेंद्र नगर झोन आणि मोकिला पोलिसांच्या पथकांनी दोन अमलीपदार्थ विक्रेते आणि एका ग्राहकाला हैदराबामध्ये सोमवारी अटक केली आणि विक्रीच्या उद्देशाने गोवा येथून खरेदी करून हैदराबादला आणलेले प्रतिबंधित अमलीपदार्थ कोकेन आणि चरस जप्त केला. अमलीपदार्थ प्रकरणात गोवा-हैदराबाद कनेक्शन असल्याचे पुन्हा एकदा तेलंगणा पोलिसांनी उघडकीस आणले.

लिंगमपल्ली अनुराधा, सनीकोम्मू प्रभाकर रेड्डी आणि वेंकट शिवा साई कुमार हे मित्र असून, त्यांना आणि त्यांच्या इतर काही मित्रांना अमलीपदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन आहे. सनीकोम्मू प्रभाकर रेड्डी याच्या निर्देशानुसार लिंगमपल्ली अनुराधा गोवा येथे अज्ञात व्यक्तींकडून अमलीपदार्थ खरेदी करत असे आणि हे अमलीपदार्थ हैदराबादला नेऊन विक्री केली जात होते, असा तेलंगणा पोलिसांचा दावा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यातून अमलीपदार्थांची वाहतूक केल्याची कबुली संशयित अनुराधाने पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी गोव्यातून अमलीपदार्थांची परराज्यात तस्करीचा आरोप फेटाळून लावला होता. मात्र तेलंगणा पोलिसांनी गोव्यातून अमलीपदार्थ खरेदी करून ते तेलंगणा येथे नेऊन विक्रीचे प्रकरण उजेडात आणून ही बाब सिद्ध केली आहे.