‘डीबीटी’मुळे पैशांची गळती रोखण्यात यश

0
13

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी; केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमला येथील ‘गरीब कल्याण संमेलना’तून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र पुरस्कृत कल्याणकारी योजनांच्या गोव्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) योजनेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. त्यामुळे पैशांची गळती रोखण्यात मदत झाली. तसेच गरिबांवर मोठा अन्याय करणारे खोटे लाभार्थीही संपविले, असे मोदी म्हणाले.

उत्तर गोव्यातील लाभार्थी पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गरीब कल्याण संमेलनाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट व इतर उपस्थित होते. दरम्यान, मडगाव येथील रवींद्र भवनात दक्षिण जिल्हा पातळीवर आयोजित कार्यक्रमात सुमारे १६ योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.
सरकार व्होट बँक तयार करण्यासाठी नाही तर नवीन भारतासाठी काम करीत आहे. आत्मनिर्भर भारत हे उद्दिष्ट असून, त्याचद्वारे सर्वांचा विश्वास जिंकत असल्याचे मोदींनी सांगितले. यापूर्वी देशाची प्रतिमा घोटाळे आणि भ्रष्टाचाराने डागाळली होती; पण आज जगात भारताचे नाव आदराने घेतले जात आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी किसान सन्मान निधी योजनेच्या सुमारे २१,००० कोटींच्या ११ व्या हप्त्याचे वितरण केले.
सुरवातीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. गोव्यातील अनेक लोकांनी या योजनांचा लाभ घेतला असल्याचे सांगितले. तसेच ज्यांनी अद्याप या योजनांसाठी नोंदणी केलेली नाही अशा पात्र व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

पंतप्रधान किसान सन्मान निधी, पंतप्रधान उज्ज्वला योजना, पोषण अभियान, पंतप्रधान मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, पंतप्रधान स्वानिधी योजना, एक देश एक रेशन कार्ड, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रे आणि पंतप्रधान मुद्रा योजना यांसारख्या योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. लाभार्थ्यांनी त्यांच्या सुधारणेसाठी आणि कल्याणासाठी या योजना राबविल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.