डिचोली तालुक्यात 100 टक्के बंद

0
159

डिचोली (न. प्र.)
कोरोनाच्या संकटामुळे लोकांना 21 दिवस घरातच राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काल बुधवारी डिचोली तालुक्यात 100 टक्के बंद पाळण्यात आला. डिचोली, साखळी तसेच डिचोली तालुक्यातही त्यामुळे लोकांना सामान व भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत होता. मात्र तरीही तेथील नागरिकांनी सहकार्य केले.

काल बुधवारी डिचोलीचा बाजार असल्यामुळे काही लोक बाजारात सकाळी येत होते. मात्र त्यांना पोलिसांनी घरी जाण्यास भाग पाडले. डिचोली येथील समाजसेवक नरेश कडकडे हे स्वतः जातीने बाजारात उपस्थित राहून लोकांना घरी जाण्याची विनंती करत होते.
पोलीस निरीक्षक संजय दळवी, उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, मामलेदार प्रवीणजय पंडित हे स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
सभापतींचे आवाहन

दरम्यान, सभापती व डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 21 दिवसांचा जो बंद आहे तो जनतेच्या हितासाठीच आहे. लोकांची गैरसोय होणार आहे. मात्र त्यातूनही मार्ग काढत सरकार आवश्यक सेवा देण्यासाठी प्रयत्नरत आहे. 21 दिवस सर्वांनी संयम दाखवत कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री. पाटणेकर यांनी यावेळी केले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय योग्य व देशहिताचा असल्याचे दयानंद कारबोटकर, तानाजी पळ यांनी यावेळी सांगितले.
————
गोवा सीमेवर कडक पहारा
दरम्यान, गोवा-महाराष्ट्र सीमेवर दोडामार्ग तपासणी नाका व पोलीस आऊट पोस्ट इथे कडक पहारा ठेवण्यात आलेला आहे. त्या भागातून वाहने व लोकांना प्रवेश बंद केला आहे. उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, मामलेदार प्रवीणजय पंडित, अजित गावकर यांनी सायंकाळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.