डिचोलीत विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू

0
5

>> व्हाळशी येथील घटना; अचानक सुरू झाला वीजप्रवाह; स्थानिकांकडून वीज खात्याच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त

व्हाळशी-डिचोली येथे काल सकाळी वीज खांबावर दुरुस्ती कामासाठी चढलेल्या लाईनमन मनोज वामन जांबावलीकर (34, रा. पिळगाव) यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सदर लाईनमनच्या मृत्यूमुळे पिळगावचे ग्रामस्थ आणि स्थानिक घटनास्थळी जमले आणि त्यांनी वीज खात्याच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. तसेच अधिकारी वर्गाला पाचारण करा व त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करतानाच मृतदेह हलवण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर पोलिसांनी वीज अधिकाऱ्यांना पाचारण केले. ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर अखेर दोन तासांनी अखेर मृतदेह रुग्णवाहिकेतून बांबोळी येथे गोमेकॉत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
सविस्तर माहितीनुसार, काल सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यालगतच्या एका फिटनेस सेंटरमध्ये विजेचा कमी दाब असल्याने लाईनमन मनोज जांबावलीकर हे वीज खांबावर चढून दुरुस्ती करीत होते. दुरुस्ती कामासाठी खांबावर चढण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र अचानक वीजपुरवठा सुरू होऊन विजेच्या धक्क्याने ते खांबावरच गतप्राण झाले. हा प्रकार लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली.

यानंतर घटनास्थळी अग्निशामक दल आणि डिचोली पोलीस दाखल झाले. व त्यांनी वीज खांबावरील मृतदेह खाली आणला. यावेळी पिळगावचे ग्रामस्थ आणि व्हाळशीतील स्थानिक लोकांनी वीज खात्याच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. तसेच वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. जोपर्यंत वीज खात्याचे अधिकारी घटनेबाबत स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत मृतदेह शवचिकित्सेसाठी इस्पितळात नेऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली. जवळपास दोन तासांनंतर वीज खात्याचे सहाय्यक अभियंता वल्लभ सामंत आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची गांभीर्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच मनोज जांबावलीकर यांच्या कुटुंबाला न्याय व मदत देण्याची ग्वाही दिली. त्यांनी ग्रामस्थ शांत झाले.
उपलब्ध माहितीनुसार, मनोज जांबावलीकर हे खांबावर चढले होते, त्यावेळी त्यांच्या हातात ग्लोव्हज्‌‍ नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरवली जातात की नाही, याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. वीज खात्याने तातडीने याची दखल देण्याची गरज आहे.
दरम्यान, वीज खात्यात कार्यरत लाईनमन हेल्पर आपला जीव धोक्यात घालून काम करतात आणि अशा घटनांत त्यांना नाहक जीव गमवावा लागतो. डिचोली तालुक्यात गेल्या काही वर्षांतील ही तिसरी घटना आहे.

मनोज जांबावलीकर हे गावकरवाडा-पिळगाव येथील रहिवासी असून, दोन वर्षांपूर्वी ते नोकरीत रुजू झाले होते. त्यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या मृत्यूस जबाबदार कोण, असा संतप्त सवाल त्यांचे नातेवाईक व संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

‘इन्व्हर्टर’मुळे लाईनमनचा
मृत्यू : मुख्य वीज अभियंता

वीज खांबावर दुरुस्तीसाठी चढण्यापूर्वी खंडित केलेला वीजपुरवठा एका कंपनीने सुरू केलेल्या इन्व्हर्टरमुळे पुन्हा प्रवाहित झाला आणि शॉक लागल्याने डिचोली येथे वीज दुरुस्तीचे काम करणारे लाईनमन मनोज जांबावलीकर यांचा मृत्यू झाला, अशी माहिती मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी काल दिली.

मनोज जांबावलीकर यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्वरित वीज खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली दोन साहाय्यक वीज अभियंते, कनिष्ठ अभियंत्याचा समावेश असलेले एक पथक घटनास्थळी पाठविण्यात आले. या पथकाने या प्रकरणी चौकशी केली. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी खांबावर दुरुस्तीला सुरुवात करण्यापूर्वी वीजप्रवाह बंद केल्याचे आढळून आले. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी केली असता तेथील एका फिटनेस कंपनीने इन्व्हर्टर सुरू केल्याने त्याचा विद्युत प्रवाह लाईनमन काम करीत असलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे वीज खाते एका कार्यक्षम कर्मचाऱ्याला मुकले आहे. या प्रकरणी योग्य कारवाई केली जात आहे, असेही स्टीफन फर्नांडिस यांनी सांगितले.
एखाद्यात कंपनीत किंवा घरात जनरेटर किंवा इन्व्हर्टर बसविण्यासाठी वीज खात्याकडून परवानगी घ्यावी लागते. बहुतांश वेळा जनरेटरसाठी परवानगी घेतली जाते; मात्र इन्व्हर्टर बसविण्यासाठी परवानगी घेतली जात नाही. इन्व्हर्टर बसविताना योग्य काळजी घेण्याची गरज असते. इन्व्हर्टरमधील वीज प्रवाह पुन्हा वीज तारांमध्ये जाऊ नये म्हणून खास स्वीच बसविण्याची गरज असते, असेही मुख्य वीज अभियंती स्टीफन फर्नांडिस यांनी सांगितले.