टोळधाडीसंदर्भात यंत्रणा सतर्क ः कवळेकर

0
126

 

राज्यातील सरकारी यंत्रणा टोळधाडीचे संकट रोखण्यासाठी सतर्क झाली असून टोळांना रोखण्यासाठी सुरक्षा उपाय योजना तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

देशातील काही भागात टोळधाडीचा प्रभाव दिसून येत आहे. महाराष्ट्रातील काही भागात टोळ पोहोचले आहेत. वार्‍याच्या वेगाप्रमाणे टोळ पुढे सरकत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कृषी खात्याचे अधिकारी, ओल्ड गोवा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन टोळांपासून शेती वाचविण्यासाठी उपाययोजना करण्यावर विचारविनिमय करण्यात आला आहे. राज्यातील कृषी खात्याच्या अधिकार्‍यांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

तसेच शेतकर्‍यांमध्ये टोळधाडीबाबत जनजागृती करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मंत्री कवळेकर यांनी सांगितले. राज्याच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्याची सूचना कृषी अधिकार्‍यांना करण्यात आली आहे. तसेच फरिदाबाद येथील टोळधाडीबाबत माहिती देणार्‍या केंद्राच्या संपर्कात आहोत.