31 C
Panjim
Saturday, March 6, 2021

टूल-किटची कर्मकहाणी

  • दत्ता भि. नाईक

देशातील कोणताही प्रश्‍न असो त्यात मानवतावादाचा बुरखा पांघरलेले व पर्यावरणवादाचा झेंडा खांद्यावर घेतलेले कम्युनिस्ट विचारसरणीचे विविध गट यात उतरतात व स्वतःचा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात. भारत नावाच्या देशाचे तुकडे करण्याचा साम्राज्यवाद्यांचा व साम्यवाद्यांचा समान कार्यक्रम आहे. यापासून देशप्रेमी नागरिकांनी सावध राहिले पाहिजे.

द्वितीय महायुद्धानंतर सारे विश्‍व युद्धापासून स्वतःच्या देशाचे रक्षण व्हावे म्हणून धडपडले व त्यामुळे युद्धाच्या संकल्पनेचे संपूर्ण उच्चाटन होईल असे कित्येक स्वप्नाळू नेत्यांना वाटत होते. परंतु घडले भलतेच. शीतयुद्धाच्या नावाखाली सोव्हिएत रशिया व अमेरिका या दोन महाशक्तींनी आपापले प्रभावक्षेत्र वाढवण्याकरिता जे जे मार्ग अनुसरले ते पाहता शोषण, लुटालूट व रक्तपात यांचे सत्र थांबलेच नाही. याउलट छुपेपणाने हे सर्व प्रकार चालूच राहिले. साम्राज्ये खाली करताना स्वतंत्र होणारे देश बलवान होऊ नयेत व त्यांच्यासमोर एवढ्या मोठ्या समस्या जमा कराव्या की ज्यामुळे हे नवस्वतंत्र देश कोसळतील. १९४७ साली भारताची स्वातंत्र्याबरोबर केलेली फाळणी हा या कार्यक्रमाचा एक भाग होता. भारत बलवान झाला तर तो आशियाई देशांचे नेतृत्व करेल. आफ्रिकन राष्ट्रांना आत्मनिर्भर होण्यासाठी सहाय्य करेन ही भीती साम्राज्यवादी देशांच्या सरकारांच्या मनात तर आहेच पण याशिवाय स्वतःला बिगर सरकारी संघटना म्हणवून घेणार्‍या व लोकशाहीचा पूर्ण लाभ उठवून भारतातील ऐक्य व लोकशाही उलथवून टाकण्यासाठी वावरणार्‍या जगातील अनेक देशातून हद्दपार होऊन व ठेचले जाऊनही वळवळ चालू असलेल्या गरीबांचे हित साधण्याचे नाटक करीत ऐशआरामात राहणार्‍या डाव्या विचारसरणीच्या चमूचेही हेच मत आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत लाल किल्ल्याच्या परिसरात शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जो धुडगूस घातला गेला त्यावरून व यामागे असलेल्या शक्ती उघड्या पडल्यामुळे जी माहिती हाती आली आहे ती पाहता यामागे एक आंतरराष्ट्रीय कट असल्याचे सिद्ध झाले आहे.

टिनेजर ग्रेटा थनबर्ग –
आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या देशातील किसान आंदोलनाचा भडका उडावा व त्याला वर्गसंघर्षाचे स्वरूप यावे म्हणून एक ग्रेटा थनबर्ग नावाची एक युवती वावरते व तिने बनवलेले टूल किट् आपल्या देशातील वर्गसंघर्षवाद्यांनी वापरल्याचे चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांच्या लक्षात आले आहे. जानेवारी २००३ मध्ये जन्माला आलेली ही युवती स्वतःला पर्यावरणवादी म्हणवून गेते. तिचा जन्म स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे झाला असून तिचे वडील रंगमंच अभिनेते व आई ऑपेरा गायिका आहे. स्वीडन हा देश उत्तर भूध्रुवाच्या अतिशय जवळ आहे. त्यामुळे तेथील तापमान अतिशय थंड असते. हिवाळ्यात तर तापमान शून्य अंशाच्या खाली जाते. अशा वातावरणात मांसाहार अत्यावश्यक ठरतो. तरीही ग्रेटा ही शाकाहारी आहे व बछड्याच्या मालकीचे असलेले दूधही पीत नाही. या अतिरेकी पर्यावरणवादी युवतीला भारतातील किसान आंदोलनात कोणता पर्यावरणवाद दिसला हा एक संशोधनाचा विषय आहे. पर्यावरणवादी ग्रेटा यांनी फ्रायडेज फॉर फ्युचर या नावाची एक चळवळ स्वीडनमध्ये सुरू केलेली आहे. हवामानासाठी शाळेत संप घडवणे हा तिचा आवडता कार्यक्रम आहे. स्विडीश संसदेच्या २०१८ साली झालेल्या निवडणुकीच्या काळात त्यांनी संसदेसमोर धरणे धरले होते. सुरुवातीला एकट्यानेच सुरू केलेल्या या धरण्यात नंतर इतरही सहभागी झाले. ग्रेटाला ऍस्पर्जर सिंड्रोम नावाचा आजार आहे, असे वैद्यकशास्त्राचे मत आहे. हा आजार झालेल्या व्यक्ती कुठलातरी एक विषय आयुष्यभर लावून धरतात असा अनुभव आहे. १३ नोव्हेंबर २०२० रोजी मिळालेल्या माहितीनुसार ग्रेटाने दहा लाख डॉलर एवढी माया जमवलेली आहे.
अठरा वर्षांनी टिनेजर ग्रेटा पर्यावरणाच्या क्षेत्रात सणक आल्यासारखी वागत असेलही. कोणतीही चळवळ चालवण्याकरता अशा माणसांची आवश्यकता असते. त्यांनी भारतातील पर्यावरणाच्या होणार्‍या र्‍हासाबद्दल मते व्यक्त केली असती तर त्यांच्यावर शक्य तेवढा विचार करता आला असता. परंतु त्यांचे टूल-किट ज्यांच्या हातात पडले त्यांना देशाचे नट-बोल्ट ढीले करावयाचे आहेत हे स्पष्ट आहे. हे टूल-किटही पर्यावरणाशी संबंधित नाही हे त्याच्या वापरावरून लक्षात येते.

दिशाहीन दिशा –
दिल्ली पोलिसांनी त्यांचे सर्व मार्ग वापरून या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी कसून प्रयत्न केलेले आहेत. यात भारतातील तथाकथित पर्यावरणवादी युवा मंडळी गुंतल्याचे लक्षात आले आहे. दिल्ली पोलिसांनी गोळा केलेल्या माहितीवरून ११ जानेवारी रोजी देशात अशांतता पसरवण्याकरिता एका झूम बैठकीचे आयोजन केले होते. ग्रेटा थनबर्गच्या टूल-किटनुसार आंदोलन कसे चालवावे याची माहिती या झूम बैठकीच्या आयोजकांमार्फत पोहोचली होती. साठ ते सत्तर जणांचा या झूम बैठकीत सहभाग होता. याच बैठकीत २६ जानेवारी रोजी देशाच्या एकतेला आव्हान देण्याचा कट शिजला होता. ट्विटरचे वादळ निर्माण करून देशात अराजक माजल्याचे जगाला वाटेल असे काहीतरी करावयाचे होते. दिशा रवी. निकिता जेकब व शंतनू या त्रिकुटाने वरकरणी साध्यासुध्या वाटणार्‍या किसानांचे आंदोलन स्वतःच्या ताब्यात घेण्याचे ठरवले होते.
फेब्रुवारी महिन्याच्या १४ तारखेला स्वयंघोषित पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिला बंगळुरू येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. नेहमीप्रमाणे स्वतःला मानवाधिकारांचे मक्तेदार समजणारी चित्रपटातील भूमिकांसाठी करोडो रुपये घेणारे अभिनेते मंडळी यात उतरली यात आश्‍चर्य नाही. कॉंग्रेसचे खासदार व सदाबहार नवरदेव असलेले शशी थरूरही २२ वर्षाच्या कोवळ्या वयाच्या युवतीबद्दल सहानुभूती व्यक्त करू लागले. दिशा रवी ही बेंगलुरुमधील एका खाजगी महाविद्यालयातून बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन पदवी मिळवलेली पदवीधर आहे. ग्रेटा थनबर्ग हिच्या प्रेरणेने सुरू झालेल्या फ्रायडेज फॉर फ्यूचर इंडिया या चळवळीची ती एक संस्थापक आहे. पोएटिक जस्टिस फाउंडेशन नावाचा एक खलिस्तान समर्थक गट आहे. या गटाशी दिशा रवी हिने हातमिळवणी केली असा तिच्यावर आरोप आहे. या गटामध्ये स्वतः वकील असल्याने एखाद्या गटाची वकीली घेतल्याने गुन्हेगार ठरू शकत नाही. अशा निकिता जेकबचाही समावेश आहे.

इम्रान खानला संधी –
किसान आंदोलनाचे नेते राकेश टिकैत हे आज एकटे पडले आहेत. त्यांची हत्या घडवून आणायची व त्या आधारे आंदोलन भडकेल असे वातावरण निर्माण करावयाचे असाही देशविरोधी व विशेष करून खालिस्तानवादी गटांचा आंतरराष्ट्रीय कट आहे. देश स्वतंत्र झाला त्याच्या एक दिवस अगोदर देशाचे विभाजन करण्यात आले. मुसलमानांना पाकिस्तान मिळाले म्हणून शिखांच्या खालसा पंथावरून खालिस्तान नावाच्या शिखांसाठी वेगळ्या राष्ट्राची स्थापना करावी अशी मागणी शिखांमधील अतिशय कमी संख्येने असलेल्या गटाने केली होती. वेगवेगळ्या कारणांमुळे व हिंदू-शीख ऐक्यामुळे या मागणीने जोर धरला नाही. तरीही ही मागणी अधूनमधून पुढे येते व शिखांचा निशाणसाहिब या नावाने ओळखला जाणारा ध्वज खालिस्तानचा झेंडा म्हणून वापरला जातो. राजा रणजित सिंह यांच्या द्वारा जे राज्य स्थापन केले होते त्याची आठवण या खालिस्तानवाल्यांच्या मनात घर करून आहे. राजा रणजित सिंह यांची राजधानी लाहोर होती व त्यांच्या राज्यामध्ये अफगाणिस्तानचा समावेश होता. हे सर्वजण या वेळेस सोयिस्करपणे विसरतात.

कॉंग्रेसने विसर्जन केलं तर देशाचे ऐक्य धोक्यात येईल असे मत प्रथम पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी व्यक्त केले होते. दुःखाची गोष्ट म्हणजे आजच्या क्षणी खालिस्तानवाद्यांकडून चालवल्या गेलेल्या या आंदोलनाचे समर्थन कॉंग्रेस पक्षाकडून केले जात आहे. यापूर्वी टुकडे टुकडे गँगचेही समर्थन कॉंग्रेसने केले होते. आता तर कॉंग्रेस पार्टीचा चिनी कम्युनिस्ट पार्टीशी समझोत्याचा करार झाल्याने वर्तमानपत्रातील बातम्यांवरून सिद्ध झाले आहे.
पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनीसुद्धा आता टूल-किट प्रकरणात लक्ष घातले आहे. दिशा रवी हिला अटक होणे हा आपल्या देशातील अंतर्गत प्रश्‍न आहे. आपल्याकडील न्यायव्यवस्था इतकी पारदर्शक आहे की पोलिसांच्या कारवाईत थोडी तरी चूक आढळली तर न्यायालय या मंडळींना बेल देऊ शकते. तरीही अंगांगात हुकूमशाही मुरलेल्या पाकिस्तानच्या राज्यकर्त्याने दिशा रवी हिला अटक केल्याबाबत चिंता व्यक्त करून तिला पाठिंबा दर्शवला आहे. यापुढे जाऊन मोदींची भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामार्फत जनतेची गळचेपी केली जाते असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

देशातील कोणताही प्रश्‍न असो त्यात मानवतावादाचा बुरखा पांघरलेले व पर्यावरणवादाचा झेंडा खांद्यावर घेतलेले कम्युनिस्ट विचारसरणीचे विविध गट यात उतरतात व स्वतःचा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात. कामगारांची क्रांती करता येत नाही म्हणून शेतकर्‍यांची क्रांती घडविण्याची स्वप्ने पाहणारे माओवादी आणि नक्षलवादी पढतमूर्ख वाचनालयात बैठका घेऊन रानावनात शस्त्रे घेऊन फिरणारे पर्यावरणाच्या नावाखाली विकासाला विरोध करणारे ब्रेन वॉश झाल्यामुळे यांना दुसरे काहीही दिसत नाही. भारत नावाच्या देशाचे तुकडे करण्याचा साम्राज्यवाद्यांचा व साम्यवाद्यांचा समान कार्यक्रम आहे. यापासून देशप्रेमी नागरिकांनी सावध राहिले पाहिजे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आमोण्याची ज्ञानगंगा ः रामदास विद्यालय

डॉ. विठ्ठल ठाकूर त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक...

शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य

चेतन कवळेकर(राज्यपुरस्कारप्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षक) शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक...

एक अगम्य चाहता… कधीच न भेटलेला!

ज. अ. रेडकर. मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती...

गूढ वाढले

जगातील आठव्या क्रमांकावरील आणि आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ ह्या सत्तावीस मजली आलिशान निवासस्थानापासून पाच - सहाशे मीटरवर...

सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी...

ALSO IN THIS SECTION

आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम

दत्ता भि. नाईक आगामी मार्च-एप्रिलच्या काळात आसाम, प. बंगाल, तामिळनाडू व पुदुचेरी अशा तीन राज्यांत व एका छोट्याशा...

‘एलआयसी’ अंतर्बाह्य कशी आहे?

शशांक मो. गुळगुळे आतापर्यंत खाजगी कंपन्यांच्या भागभांडवल विक्रीपेक्षा सरकारी कंपन्यांच्या भागभांडवल विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि या...

खांडेकर-कुसुमाग्रज-बोरकर अनोखा त्रिवेणी संगम

राम देशपांडे भाऊंनी पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी साहित्याच्या क्षेत्रावर अधिराज्य केले. स्वतःचा असा एक वेगळा ठसा मराठी मनावर...

अस्त

अंजली आमोणकर देहोपनिषद सिद्ध झालं म्हणजे देहकथा पूर्ण झाली. विसर्जनाची वेळ झाली. गीतेत म्हटले आहे- ‘तू त्रिगुणातीत हो!’...

आनंद सुधा बरसे…

रामनाथ न. पै रायकर मराठी संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गोमंतकीय गायक-नट, रामदास कामत यांनी नुकतीच वयाची नव्वदी पार केली...