ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन

0
5

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार डॉ. बिबेक देबरॉय यांचे काल निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 69 होते. एम्स दिल्लीने जारी केलेल्या निवेदनात त्यांना आतड्यांसंबंधी संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. सकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मश्रीने सन्मानित झालेल्या देबरॉय यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष या नात्यानेही महत्त्वाची भूमिका निभावली होती. देबरॉय हे नीती आयोगाचे सदस्य होते. नवीन पिढीसाठी त्यांनी महाभारत व रामायण यासह सर्व पुराणांची इंग्रजीत सहज भाषांतरे केली.
डॉ. देबरॉय यांचे प्रारंभिक शिक्षण कोलकाता येथील नरेंद्रपूर येथील रामकृष्ण मिशन शाळेत झाले. यानंतर त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथून उच्च शिक्षण पूर्ण केले.

देबरॉय यांनी 1979 ते 1984 या काळात प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता येथे शैक्षणिक कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ते पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समध्ये दाखल झाले, जिथे त्यांनी 1987 पर्यंत काम केले. त्यानंतर 1987 ते 1993 या काळात त्यांनी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडचा कार्यभार सांभाळला. 1993 मध्ये ते वित्त मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या प्रकल्पाचे संचालक बनले. हा प्रकल्प भारतातील कायदेशीर सुधारणांवर केंद्रित होता. 1994 ते 1995 पर्यंत त्यांनी आर्थिक व्यवहार संस्थेत, 1995 ते 1996 पर्यंत नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चमध्ये आणि 1997 ते 2005 पर्यंत त्यांनी राजीव गांधी इन्स्टिट्यूट फॉर कंटेम्पररी स्टडीजमध्ये काम केले. यानंतर, 2005 ते 2006 पर्यंत, त्यांनी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीमध्ये पदभार स्वीकारला, त्यानंतर 2007 ते 2015 या काळात सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चमध्ये काम केले.
भारतीय पौराणिक ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर करुन देबरॉय यांनी जगासमोर नवा दृष्टिकोन मांडला. आधुनिक जगातील प्रश्न-समस्यांच्या निराकरणात भारतीय संस्कृतीने दिलेली मूल्ये आणि कार्यपद्धती चिरंतन ठरेल असा त्यांचा विश्वास होता.

पंतप्रधानांकडून श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. देबरॉय यांचा अर्थकारण, इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविधांगी विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन देशाची ध्येयधोरणे ठरवण्यात ते वाक्‌‍बगार होते. याव्यतिरिक्त ऐतिहासिक दस्तावेज तरुणांपर्यंत कसे पोहोचतील यासाठीही त्यांनी अविरत काम केले’, असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.