जून महिन्यात पर्यटन कार्यगटासह गोव्यात जी-20 च्या पाच बैठका

0
8

जून महिन्यात गोव्यात जी-20 शिखर परिषदेच्या 5 महत्वाच्या बैठकांचे आयोजन केले जाणार असून, या बैठकांमध्ये स्टार्टअप, वित्त, लेखापरीक्षण आणि पर्यटन यासारख्या विविध विषयांच्या समावेश असेल.

याबाबत बोलताना जी-20 साठीचे राज्याचे नोडल अधिकारी संजीव रॉड्रिग्ज हे म्हणाले की, जी-20 च्या या पाच महत्वाच्या बैठकांत विविध जागतिक मुद्यांवर चर्चा होणार असून, त्यावरील उपाययोजनांबाबत उहापोह होणार आहे. या बैठकांचे आयोजन योग्य पद्धतीने करण्यासाठी सर्व ती तयारी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकांच्या सुलभ आयोजनांसाठी बारकाईने नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताच्या अध्यक्षतेखाली स्टार्टअप-20 कार्यगटाची ही तिसरी बैठक ‘स्टार्टअप-20 गोवा संकल्पना’ या विषयाखाली 3 व 4 जून रोजी आयोजित केली जाणार आहे. स्टार्टअप परिभाषा निश्चित करण्यासाठी ही बैठक एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. भारत व अमेरिकेसह जी-20 चे अन्य देश याबाबत या बैठकीत ऊहापोह करणार आहेत.

5 ते 7 जून या दरम्यान जी-20 च्या आंतरराष्ट्रीय वित्तीय रचनाप्रणाली कार्यगटाची तिसरी बैठक होणार आहे. या बैठकीत आंतरराष्ट्रीय आर्थिक रचनाप्रणालीत सुधारणा घडवणे आणि जागतिक अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी उपाययोजना करण्याबाबत उहापोह होणार आहे, तर शिखर लेखापरीक्षण संस्था यांची एसएआय-20 परिषदेची बैठक 12 ते 14 जून दरम्यान होणार आहे.

पर्यटन मंत्रालय, जागतिक प्रवासी सेवा, पर्यटन समिती आणि डब्ल्यूटीटीसी यांच्याद्वारे 19 व 20 जून रोजी गोव्यामध्ये पर्यटन कार्यगटाची चौथी बैठक होणार आहे. त्यात जागतिक पर्यटन क्षेत्रासमोरील आव्हाने आणि संधी यावर चर्चा होणार आहे. 21 व 22 जून रोजी जी-20 देशांच्या मंत्रिस्तरीय पर्यटन कार्यगटाची बैठक होणार आहे. त्यात पर्यटनमंत्री तसेच पर्यटन क्षेत्रातील निमंत्रित प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.