जी-२० शिखर संमेलनात तरुणांनी सहभागी व्हावे

0
8

>> मन की बातमध्ये मोदींचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी आपल्या ९५ व्या ‘मन की बात’द्वारे देशातील तरुणांना जी२० शिखर परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले. २०२३ मध्ये होणार्‍या जी-२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील विणकर येल्दी हरिप्रसाद गरू यांचा विशेष उल्लेख केला. येल्दी हरिप्रसाद गरू यांनी हातांनी विणलेला जी-२० लोगो पंतप्रधान मोदी यांना भेट म्हणून पाठवला आहे. मोदी यांनी याबद्दल येल्दी यांचे आभार मानले.

तेलंगणातील एका जिल्ह्यात बसलेला माणूसही जी-२० सारख्या शिखराशी किती जोडलेला आहे हे पाहणे चांगले असल्याचे मोदी म्हणाले. पुण्याचे रहिवासी सुब्बा राव चिल्लारा आणि कोलकाता येथील तुषार जगमोहन यांनी जी-२० संदर्भात भारताच्या प्रयत्नांचे खूप कौतुक केले असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे

भारतात २०२३ मधील जी२० परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. १ डिसेंबरपासून भारत औपचारिकपणे जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. नुकत्याच इंडोनेशियामध्ये झालेल्या १७ व्या शिखर परिषदेत जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले आहे. जी-२० देशांमध्ये भारत, ब्रिटन, अमेरिका, चीन, फ्रान्स, जर्मनी, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की आणि युरोपीय संघ यांचा समावेश आहे.