राज्य सरकारने चोवीस तास दुकाने सुरू ठेवण्याची घोषणा करून दोन दिवस उलटले तरी अजूनही शहरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी त्रास सहन करावा लागत आहे. पणजी महानगरपालिकेची जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा योग्य नसल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी त्रास सहन करावा लागत आहे. तर, दुसरीकडे ताळगाव पंचायतीमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे काल वितरण केले जात होते. त्या ठिकाणी नागरिकांची भलीमोठी रांग लागलेली होती. परराज्यातून जीवनावश्यक वस्तू घेऊन आलेले मालवाहू ट्रक शहरात दाखल झाल्यानंतर घाऊक विक्रेत्यांनी दुकानातून सामानाच्या घाऊक विक्रीला सुरुवात केली. किराणा मालाची किरकोळ विक्री करणारी दुकाने काल बंदच होती. पणजीतील महानगरपालिकेचे मुख्य मार्केटसुद्धा बंदच होते.
पणजी मार्केट बंदच
पणजी शहरातील विशाल मार्ट या सुपर मार्केटमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी रांग लागली होती. राज्य सरकारच्या चोवीस तास दुकाने खुली ठेवण्याच्या घोषणेला दोन दिवस उलटले तरी पणजी महानगरपालिकेने मुख्य मार्केट खुले केलेले नाही. मार्केटमध्ये दुकाने खुली असतील म्हणून नागरिक मार्केटमध्ये येऊन पाहणी करीत आहेत. तथापि, मार्केट बंद असल्याने नाराजी व्यक्त करत परत जात आहेत. मार्केटजवळील गोवा मार्केटिंग फेडरेशनच्या सुपर मार्केटजवळ नागरिकांनी रांग लावली होती. परंतु, सुपर मार्केट सुरू करण्यात आले नाही. या सुपर मार्केटच्या जवळील एक खासगी किराणा मालाचे दुकान उघडण्यात आले होते. परंतु, दुकान मालकाने काही लोकांना सामान दिल्यानंतर बंद केले. पणजीत अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी फिरताना दिसत होते.
ग्राहकांची लुबाडणूक?
मार्केटमधील एक कडधान्य घाऊक विक्रीचे दुकान सकाळपासून खुले होते. त्याठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्या दुकानात तांदूळ, आटा आदी वस्तू घाऊक स्वरूपात मिळत होत्या. दुपारनंतर आणखीन काही घाऊक विक्रीची दुकाने खुली करण्यात आली.
मुख्य मार्केट बंदमुळे नागरिकांना भाजीपाला उपलब्ध होऊ शकला नाही. शहरातील काही भागात भाजीपाल्यांची विक्री केली जात होती. तेथेही साठा कमी असल्याने मोजक्याच लोकांना भाजीपाला मिळाला. कांदा व इतर वस्तूंच्या दरावर कुणाचेही नियंत्रण नव्हते. विक्रेत्यांकडून साठा कमी असल्याने जास्त दरात कांदा व इतर भाजीची विक्री करून ग्राहकांची लुबाडणूक केली जात होती.
ताळगाव येथे भाजीच्या मळ्यातील भाजी लावगड केलेल्या शेतकर्यांना चांगले दिवस आले आहेत. भाजीच्या मळ्यातील भाजीची खरेदीसाठी सकाळच्या वेळी नागरिकांची भरपूर गर्दी दिसून येत होती. भाजीच्या मळ्यातील भाजी जास्त दराने विकली जात असली तरी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात भाजीची खरेदी केली जात आहे.
स्वयंसेवकांद्वारे वस्तूंचे वितरण
सरकारकडून स्वयंसेवकांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूचे घरपोच वितरण करण्याची घोषणा केली आहे. नगरसेवकांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती केल्याने जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करताना संबंधितांकडून आपली मतपेटी शाबूत ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न केला जात आहे, अशा वाढत्या तक्रारी आहेत. नागरिक दूरध्वनीच्या माध्यमातून स्वयंसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, त्या स्वयंसेवकांकडून प्रतिसाद दिला जात नाही, अशाही अनेक तक्रारी आहेत. काही राजकीय नेत्यांनी आपल्या बळाचा वापर करून काही घाऊक विक्रेत्यांकडील माल ताब्यात घेतला आहे. काही सुपर मार्केटना घरपोच वितरणासाठी परवानगी देण्यात आली. परंतु, जीवनावश्यक सामानाच्या अभावामुळे घरपोच सेवा केवळ कागदावरच आहे. जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवेची तयारी केलेल्या काही सुपर मार्केटना घरपोच सेवा सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
पणजी महानगरपालिकेने सुरू केलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास वेबसाइटवर संपर्क साधण्याची सूचना केली जात आहे. वेबसाइटवर ग्राहकांना केवळ ईमेल देण्याची सूचना केली जाते. जीवनावश्यक वस्तूंबाबत काहीच माहिती दिली जात नाही. पणजीचे महापौर उदय मडकईकर यांच्याशी मोबाईलवर अनेकवेळा संपर्क साधल्यानंतरसुध्दा त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता.