जानेवारीपासून श्रमधाम योजनेचा आवाका वाढणार

0
31

काणकोण मतदारसंघातील गरिबांना घरे बांधून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली श्रमधाम ही संकल्पना संपूर्ण राज्यभर राबविण्याची गरज आहे. काणकोणात श्रमधाम संकल्पनेतून आत्तापर्यंत 20 घरांचे बांधकाम करून संबंधिताकडे घरे सुपूर्द करण्यात आली आहेत. येत्या जानेवारीपासून काणकोण तालुक्याच्या बाहेर धारबांदोडा तालुक्यात श्रमधाम योजनेतून घरे बांधण्याचे काम सुरू केले जाणार आहे, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी उत्तर गोव्यातील सरपंच, उपसरपंचासाठी श्रमधाम आणि लोकोत्सव कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत बोलताना पर्वरी येथे काल दिली.
यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, गोवा विधानसभेच्या सचिव नम्रता उल्मन, पंचायत खात्याचे उपसंचालक पांगम यांची उपस्थिती होती.

काणकोण मतदारसंघात माणुसकीच्या भावनेतून श्रमधाम ही योजना राबविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे घराचे बांधकाम करू शकत नाही. तसेच, विविध कारणांमुळे सरकारी योजनेचा लाभ घरबांधणीसाठी घेऊ शकत नाहीत. त्या कुटुंबीयांची घरांची बांधणी श्रमधामातून करण्यास सुरुवात केली आहे. ही योजना केवळ काणकोण मतदारसंघापुरती मर्यादित राहता कामा नये. राज्यातील इतर भागात सुध्दा गरीब, गरजू नागरिकांना घर बांधणीसाठी साहाय्याची गरज आहे. सरपंच, पंच सदस्यांनी आपल्या गावातील घरबांधणीसाठी मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांचा शोध घेण्याची गरज आहे. श्रमधाम प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य करण्याची आपली तयारी आहे, असेही रमेश तवडकर यांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशन डिसेंबर अखेरीस शक्य
गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेर किंवा जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात घेतले जाऊ शकते. हिवाळी अधिवेशनाची तारीख अजून निश्चित झालेली नाही. साधारणपणे चार किंवा पाच दिवसांचे अधिवेशन घेतले जाऊ शकते, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.