कसोटीचा प्रसंग येतो तेव्हा मैत्रीचा कस लागतो. भारत – पाकिस्तान संघर्ष उफाळला तेव्हा प्रत्येक देशाच्या भारताशी असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांचा असाच कस लागला. काही देश उघडपणे भारताच्या पाठीशी उभे राहिले. काहींनी संघर्षापासून अंतर राखून आपला मूक पाठिंबा दर्शवला, तर काहींनी थेट शत्रूशी हातमिळवणी केली. शत्रूराष्ट्राशी म्हणजेच पाकिस्तानशी हातमिळवणी करणारा प्रमुख देश होता तुर्कस्थान. म्हणजेच तुर्किये. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू होताच भारतीय प्रदेशामध्ये पाकिस्तानने मोठ्या संख्येने द्रोन रवाना केले, ह्यामध्ये प्रमुख होते ते तुर्कियेने पाठवलेले, तेथील बनावटीचे द्रोन. हा संघर्ष सुरू असतानाच तुर्कियेचे एक जहाज पाकिस्तानी बंदरात लागल्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्यात काय होते हा भाग वेगळा, परंतु प्रत्यक्षात भारतीय हद्दीमध्ये घुसलेली द्रोन जेव्हा आपल्या हवाई सुरक्षा प्रणालीने आकाशातल्या आकाशात नष्ट केली, तेव्हा जे अवशेष जमिनीवर सापडले, त्यामध्ये जशी चिनी बनावटीची क्षेपणास्रे आढळली, तशीच तुर्कियेने पाठवलेली ही द्रोनही दिसून आली. साहजिकच तुर्कियेने पाकिस्तानला भारताविरुद्ध प्रत्यक्ष मदत केल्याचे त्यातून स्पष्ट झाले. त्यामुळे आता तुर्कियेला भारताच्या आणि भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागणे अगदी साहजिक म्हणावे लागेल. व्यापार आणि पर्यटन ह्या दोन्ही बाबतींत आता तुर्कियेला भारताशी पंगा घेण्याचे परिणाम काय असतात हे कळेल. भारत आणि तुर्किये यांच्यात गेली अनेक वर्षे चांगले संबंध होते. त्यांचे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन हे काही वर्षांपूर्वी भारतभेटीवर आले तेव्हापासून अनेक क्षेत्रांमध्ये हे संबंध वाढीस लागले. वाहनउद्योग, माहिती तंत्रज्ञान, मेट्रो रेल, बोगदे उभारणी, विमानतळावरील साधनसुविधा अशा अनेक क्षेत्रांमध्ये तुर्कियेच्या कंपन्यांनी बडी बडी कंत्राटे मिळवली आहेत. आता सरकारने ह्या सगळ्या कंत्राटांचा फेरआढावा घ्यायला सुरूवात केली आहेच, परंतु त्याच्या आधीच भारतीयांनी तुर्कियेला धडा शिकवायला सुरूवात केली आहे. तुर्किये आणि पाकिस्तानला ह्यावेळी पाठिंबा देणारा दुसरा देश अझरबैजान यांच्या पर्यटन सहली धडाधड रद्द करायला भारतीयांनी प्रारंभ केला आहे. अझरबैजानची राजधानी बाकू ही आजवर भारतीय पर्यटकांमध्ये फार लोकप्रिय होती. तीन चार दिवसांच्या भटकंतीसाठी बाकूला पसंती दिली जायची. परंतु आता ह्या नव्या समीकरणांमुळे ज्या प्रकारे मालदीवला भारतीयांनी धडा शिकवला आणि सुतासारखे सरळ केले, त्याच प्रकारे तुर्किये आणि अझरबैजानला धडा शिकावयाला सुरूवात झाली आहे. देशातील पर्यटनसंस्थांनी दोन्ही देशांची पॅकेजेस देणे बंद केले आहे. पर्यटकांनी आरक्षित केेलेली पॅकेजीस धडाधड रद्द करणे सुरू केले आहे. तुर्कियेमध्ये गेल्या वर्षी तीन लाख तीस हजार भारतीय प्रवासी व पर्यटक गेले होते, तर अझरबैजानमध्ये दोन लाख त्रेचाळीस हजार पाचशे एकोणनव्वद पर्यटक जाऊन आले होते. मात्र आता भारतीय पर्यटकांनी ह्या दोन्ही देशांची सफर रद्द करायला सुरूवात केली आहे. अझरबैजानसारखा देश पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे ह्याचा मोठा फटका त्याला आता बसणार आहे. भारतासारख्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशाचे वैर पत्करण्याचे परिणाम किती भीषण ठरू शकतात ह्याचा अनुभव मालदीवने घेतला आहेच. आता तो अझरबैजान आणि तुर्कियेला घ्यावा लागेल. व्यापाराच्या बाबतीत सांगायचे तर तुर्कियेहून आपल्याकडे मुख्यत्वे सफरचंदे येतात. शिवाय लिंबू, संगमरवर, सिमेंट, रसायने आणि कृत्रिम मोती यांची आयात होते. अझरबैजानमधून आपल्याकडे पशुखाद्य, तेले, अत्तरे आणि चामडे यांची आयात होते. बाजारातील तुर्कियेची सफरचंदे नाकारायला लोकांनी सुरूवात केली आहे. शिक्षणापासून माध्यमक्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये तुर्कियेशी आपले करार होते. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने म्हणजेच जेनयूने तुर्कियेशी केलेला करार रद्द करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. ही अशी कडक पावले आवश्यकही आहेत. सरळसरळ भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या आणि भारतीय प्रदेशामध्ये हाहाकार माजवण्यासाठी द्रोन पाठवणाऱ्या तुर्कियेसारख्या देशाला माफ का करायचे? त्याच्या कंपन्यांना बडी बडी कंत्राटे का बहाल करायची? चीनने आगळीक केली तेव्हा भारताने चिनी कंपन्यांना दणका दिला. साहजिकच सध्याच्या संघर्षात चीन बराच काळ अलिप्त राहिला. चीनच्या तुलनेत तुर्किये आणि अझरबैजान किस खेत की मूली! त्यामुळे ह्या दोन्ही देशांना शासन व्हायलाच हवे आणि भारत सरकार ते देईलच, परंतु भारतीय जनताच ते आज देते आहे! तुर्किये, अझरबैजानसारख्या छोट्या छोट्या देशांना भारतविरोधी भूमिका घेण्याची हिंमत मुळात होतेच कशी? त्यामुळेच हा दणका गरजेचा आहे. पुढच्या वेळी ते ताकही फुंकून पितील.