जरब बसवण्याची वेळ

0
20

स्वतः भिंद्रनवालेचा नवा अवतार असल्याचे भासवणारा अमृतपालसिंग जवळजवळ ऐंशी हजार पोलीस मागावर असताना पळूच कसा शकतो, असा संतप्त सवाल पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने नुकताच केला. अमृतपालचा पाठलाग चालला असताना आणि त्याचे सहकारी पकडले जात असताना नेमका तोच कसा पोलिसांच्या तावडीतून निसटू शकला हा प्रश्न देशवासीयांच्या मनातही आहे. त्याचे उत्तरही गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या विविध सीसीटीव्ही फुटेजनी दिले आहे. अमृतपालसिंगच्या मागावर पोलीस लागले तेव्हा तो मर्सिडिज मोटारीत होता. नंतर त्याने आपली वाहने बदलली. कधी मारुती ब्रिझामधून पळाला, तर कधी दुचाकीवरून. या दरम्यान त्याने आपले कपडे देखील बदलले. फेट्याचा रंग बदलला. सुरक्षा दले एकतर नेहमीच्या धार्मिक पेहरावाऐवजी त्याने शर्ट – पँट घातल्याने त्याला ओळखू शकली नसावीत किंवा त्याच्याप्रती सहानुभूती बाळगणाऱ्यांनी त्याला यथास्थित जाऊ दिले असावे. परंतु गेल्या आठवड्यात आम्ही म्हटल्याप्रमाणे हे अमृत नावाचे विष असे मोकळे सोडणे फार घातक ठरू शकते. खलिस्तानची चळवळ पुन्हा जोर धरू पाहते आहे आणि ज्या प्रकारे या अमृतपालच्या चेल्यांनी अजनाला पोलीस स्थानकावर सशस्त्र हल्ला चढवला, ज्या प्रकारे शासकीय इमारतींवर अगदी क्षेपणास्र हल्ले करण्यापर्यंत देखील या खलिस्तानवाद्यांची मजल गेलेली आहे आणि आता तर विदेशात सॅन फ्रान्सिस्कोपासून लंडनपर्यंत त्यांनी ज्या प्रकारे भारतविरोधी कृत्ये खुलेआम सुरू केली आहेत, ते पाहता केंद्र सरकारने यामध्ये अतिशय गांभीर्याने लक्ष घालावेच लागेल.
अमृतपालसिंगच्या बापासह त्याच्या सहकाऱ्यांना सध्या रासुकाखाली अटक करण्यात आली आहे आणि सुरक्षिततेच्या कारणाखाली थेट आसाममध्ये रवानगी करण्यात आली आहे. मात्र, पंजाबमध्ये जोर धरू लागलेल्या चळवळीचा प्रमुख सूत्रधार अमृतपालसिंग देशाबाहेर पळाल्याची वार्ता आली नाही म्हणजे मिळवली. काश्मीरमध्ये चोंबडेगिरी करणाऱ्या पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटच्या कारवाईने भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याने आणि 370 वे कलम रद्द करून काश्मीरचे विशेषाधिकार काढल्याने काश्मीर पेटवण्याचे आपले मनसुबे आयएसआयला गुंडाळावे लागले. एनएसएने काश्मीरमधील फुटिरतावाद्यांच्या आर्थिक रसदा तोडल्या आणि लष्कराने दहशतवाद्यांना कंठस्नान घालून त्यांचा खोऱ्यातील वरचष्मा मोडून काढला. आता काश्मीर बदलू लागले आहे. श्रीनगरमध्ये प्रथमच मॉल उभा राहतो आहे. अनेक बदल घडत आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये आपली डाळ शिजणार नाही हे उमगलेली आयएसआय आता पंजाबमध्ये पुन्हा दहशतवादाला खतपाणी घालू पाहते आहे. स्वतंत्र खलिस्तान हा शुद्ध वेडेपणा आहे. तो कधीही प्रत्यक्षात येणारा नाही. परंतु शिखांची माथी भडकावून त्यातून भारतामध्ये अशांतता निर्माण करण्याचा हा पुन्हा एकदा सुरू झालेला प्रयत्न आहे. एकेकाळी पंजाब असाच पेटवला गेला होता. दिवसागणिक तेथे मृत्यूसत्र चालले होते. गोव्याचे सुपुत्र ज्युलिओ रिबेरोंच्या नेतृत्वाखाली तेथील पोलिसांनी त्या दहशतवादाचा कणाच मोडला. इंदिरा गांधींनी सुवर्णमंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांना हुसकावण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यूस्टारची धडक कारवाई करून भिंद्रनवालेचा निःपात केला. मात्र, त्यांना त्या धाडसापोटी त्यांच्याच अंगरक्षकांनी केलेल्या गोळीबारात प्राण गमवावे लागले. आता आपले विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांची तीच गत करू अशी धमकी देण्यापर्यंत या अमृतपालसिंगची मजल गेलेली आहे. हा काटा नायटा होण्याआधीच निपटून काढला गेला पाहिजे आणि ते काम केवळ पंजाबची सुरक्षा दले करू शकणार नाहीत. एनएसएने ज्या प्रकारे काश्मीरमधील दहशतवादाची आर्थिक रसद तोडली, त्याच प्रकारे पंजाबमधील खलिस्तानवाद्यांची रसद तोडली जाण्यासाठी धडक कारवाई करावी लागेल. विशेषतः विदेशांतून येणारा पैसा रोखण्यासाठी इंटरपोलच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर जरब बसवणाऱ्या कारवाईचीही नितांत गरज भासते आहे. भारतीय दूतावासांवर हल्ला चढवण्यापर्यंत आणि तिरंगा खाली खेचण्यापर्यंत ज्यांची मजल जाते, त्यांच्यासाठी त्यांचा विदेशातील आसराही सुरक्षित ठरता कामा नये. ब्रिटनपासून कॅनडा सरकारपर्यंत अशा भारतविरोधी शक्तींवर कडक कारवाईसाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला आपला सारा राजनैतिक दबाव वापरावा लागेल. खलिस्तानच्या विदेशस्थित समर्थकांच्या घरापर्यंत जेव्हा कारवाई पोहोचेल, तेव्हाच अशा गोष्टींना मिळणारा पाठिंबा थांबेल आणि ही चळवळ निपटून काढता येईल. अमृतपाल वगैरे हे केवळ हस्तक आहेत. खरे सूत्रधार वेगळे आहेत. खरी गरज ही त्यांना जरब बसवण्याची आहे.