जंत ः परिणाम व उपाय

0
83
 • डॉ. मनाली महेश पवार

मुलांमध्ये उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमध्ये ‘कृमी- जंत होणे’ ही एक महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळेच जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी व जंतांचा समूळ नाश व्हावा म्हणून 10 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ (नॅशनल डिऑर्र्मिंग डे) म्हणून साजरा करतात.

मुलांमध्ये उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमध्ये ‘कृमी- जंत होणे’ ही एक महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळेच जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी व जंतांचा समूळ नाश व्हावा म्हणून 10 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ (नॅशनल डिऑर्र्मिंग डे) म्हणून साजरा करतात. ही समस्या जरी साधी वाटत असली तरी त्याची योग्य चिकित्सा करून न घेतल्यास त्याचे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात.
ग्रामीण भागात साधारण 80 ते 90 टक्के मुलांच्या पोटात जंत होतात. जर पोटात जंत असतील तर आपण खातो त्यातले बरेचसे अन्न पोटातले जंतच खाऊन टाकतात. साहजिकच जंतांचा त्रास असणाऱ्यांमधील बरेच लोक अशक्त, कुपोषित होतात. हे जंत रक्त शोषण करतात, तसेच अन्नाचे लोहात रूपांतर करण्यासही अडथळा आणतात. परिणामी शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. कृमीवर वेळीच उपाय न केल्यास आतड्यात कृमींचा गोळा तयार होऊन आतड्याची वाट बंद होऊ शकते. अशावेळी उलट्या व पोटदुखी होऊन प्रसंगी जीवालाही धोका पोचू शकतो.
पूर्वी लहान मुलांना जंत होऊ नयेत म्हणून घरगुती उपाय केले जायचे. वावडिंगाचे पाणी, किरायते, एरंडेल तेल, ओवा इत्यादी औषधे दर महिन्याला दिली जायची. आता दर सहा महिन्यांनी बालवाडी-शाळेत जंताच्या गोळ्या दिल्या जातात. परंतु अजूनही पुरेशी माहिती मुलांना दिली जात नाही. बदललेली आहारपद्धती व स्वच्छतेचे योग्य ज्ञान नसणे ही जंतू पसरण्याची मूळ कारणे आहेत.

जंत कसे होतात?

 • विष्ठेतून जंतांचा प्रसार होतो. जंतांची अंडी-अळ्या विष्ठेतून बाहेर पडतात. ग्रामीण भागात शौचालयांची कमतरता असल्याने उघड्यावर संडास केला जातो. त्यावेळी ही अंडी-अळ्या यांचा प्रसार होतो. पावसाच्या पाण्याने ती इतरत्र पसरतात व पावलांच्या भेगांतून, नखांतून, हाताच्या तळव्यावरून ती आपल्या शरीरात प्रवेश करतात. पावसाळ्यात जंत होण्याचे प्रमाण वाढण्याचे हेही एक कारण आहे. दूषित अन्नाच्या सेवनाने किंवा दूषित पाणी पिल्यामुळे पोटामध्ये जंत होतात.
 • अजीर्ण झाले असता भोजन करणे; मधुर, अम्ल, लवण रसांचा अधिक प्रमाणात व नेहमी उपयोग करणे; विशेषतः पिष्टमय व गुळापासून बनविलेले व द्रवरूप असे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे; व्यायाम न करणे; विरुद्ध पदार्थांचे सेवन करणे ही कृमी होण्याची महत्त्वाची कारणे आहेत.
 • असात्म्य अशा अन्नाचे सेवन करणे, उडीद, दही-दुधाचे पदार्थ, तीळाची पेंड, आनूप प्राण्यांचे मांस, तसेच पालेभाज्या हे सर्वच कृमीच्या उत्पत्तीचे महत्त्वाचे कारण आहेत. पालेभाज्या किडलेल्या असल्या तर त्या कृमीयुक्त असण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून किंवा शिजवून खाल्ल्या तर त्यामुळे कृमी उत्पन्न होऊ शकणार नाहीत.
 • उडीद, पिष्टमय पदार्थ, अम्ल तथा लवणरसबहुल असे पदार्थ, गूळ व पालेभाज्या यांच्या सेवनामुळे कृमी उत्पन्न होतात. मत्स्य, मांस, गूळ, दूध, दही यांच्या अधिक सेवनाने कफज कृमींची उत्पत्ती होते, तर विरुद्धाशन, अजीर्णाशन व पालेभाज्या यांच्यामुळे रक्तज कृमी उत्पन्न होतात.

जंतांची लक्षणे कोणती?

 • मुलांच्या पोटात दुखण्याचा त्रास होत असेल, मळमळल्यासारखे वाटत असेल, त्याचवेळी पोटात एखादा गोळा फिरल्यासारखे वाटत असेल, पातळ जुलाब होत असतील तर त्याला जंत झाले आहेत असे समजायला हरकत नाही.
 • मोठ्या आकाराचे जंत पोटाच्या आतड्यांमध्ये राहून तिथे एक विशिष्ट प्रकारचा गोळा तयार करतात. त्याने हे त्रास होतात.
 • मूल व्यवस्थित आहार घेत असूनही अशक्त दिसत असेल, पोट मोठे दिसत असेल, छोटे मूल तोंडातून सतत फेस काढत असेल, बारीक ताप सतत असेल तरी जंतांची शक्यता लक्षात घ्यायला हवी.
 • चेहऱ्यावर पांढरे डाग दिसत असतील, मुलांना वारंवार खोकला होत असेल, अंगाला खाज सुटत असेल, गुदद्वारापाशी खाज असेल तर त्या मुलांच्या पोटात जंत वाढल्याचे ते लक्षण असू शकते.
 • पुरीषज कृमीमध्ये पांडू, उदर, यकृतवृद्धी, अतिसार, शोथ, शोप यांसारखे गंभीर उपद्रवही अनेक वेळा आढळतात.

जंत-कृमीचे प्रकार

 • आयुर्वेदात जंत-कृमींचा विचार करण्यात आलेला आहे. बाह्य व आभ्यंतर असे मुख्य दोन प्रकार करण्यात आले आहेत. बाह्य कृमीमध्ये उवा-लिखा यांसारख्या कृमींचा समावेश करण्यात आला आहे, तर आभ्यंतरमध्ये शरीराच्या आतील आतड्यात, पचनसंस्थेत, रक्तामध्ये, रक्ताच्या शिरांमध्ये, मलांमध्ये उत्पन्न होणाऱ्या कृमींचा समावेश करण्यात आला आहे.
 • जंत म्हटल्यावर आतड्यातील किंवा मलातील कृमींचा समावेश होतो. हे कृमी प्रामुख्याने शिळे, नासलेले, बिघडलेले अन्न खाणे, माती खाणे, अशुद्ध पाणी पिणे या कारणांनी उत्पन्न होतात. आतड्यामध्ये राहणारे हे जंत थोडे मोठे, लांब असतात. यांचा रंग काळा, पिवळा, सफेद, निळा असतो. संडासाला पातळ होणे किंवा अजिबात साफ न होणे, पोटात दुखत राहाणे, भूक कमी लागणे, अंगाला खाज सुटणे, निरुत्साह, त्वचा निस्तेज-रुक्ष होणे, रक्ताचे प्रमाण घटणे, गुदद्वाराशी खाज येणे या तक्रारी असतात.

जंत झाल्याचे कसे ओळखाल?

 • लहान मुलांमध्ये जंत जास्त प्रमाणात असतात. अशी मुले अशक्त असतात. ही मुले लवकर दमतात. मूल अशक्त असेल, पोट मोठे असेल, लवकर दमत असेल, त्याच्या शरीराची वाढ योग्य तऱ्हेने होत नसेल तर जंत झाल्याचे ओळखावे.
 • पोटात बारीक दुखत आहे, अशी वारंवार तक्रार असू शकते.
 • पोटात गोळा फिरत आहे, अशी भावना असते.
 • कधी पातळ पसरट संडास तर कधी शौचास साफ न होणारी तक्रार असू शकते.
 • लोहाचे प्रमाण कमी झाल्याने चेहऱ्यावर पांढरे डाग दिसू लागतात.
 • कधी पातळ पसरट संडास तर कधी शौचास साफ न होणारी तक्रार असू शकते.
 • लोहाचे प्रमाण कमी झाल्याने चेहऱ्यावर पांढरे डाग दिसू लागतात.
 • काही प्रकारच्या कृमींमुळे गुदद्वाराजवळ खाज सुटते. कारण बारीक कृमी अंडी घालायला गुदद्वाराशी येतात.

उपाययोजना

 • जंतांचे जीवनचक्र अस्वच्छतेवर अवलंबून असते. मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावली गेली तर जंतांची बाधा सहसा होत नाही. म्हणून जंतांच्या उच्चाटनासाठी मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लागली पाहिजे. घरोघरी शौचालये हा यावरचा मुख्य उपाय आहे.
 • कृमींवर उपचार करताना कृमींच्या निर्मितीची कारणे टाळा. जशी- लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या, कॅडबरी, बिस्किटे, आइस्क्रीम इत्यादी अधिक प्रमाणात देणे टाळावे. शिळे, उघड्यावरील पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे टाळावे.
 • डुक्कर, कोंबडी, गाय-बैल यांचे मांस नीट न शिजवता खाण्यानेही विशिष्ट प्रकारचे वर्म आतड्यामध्ये तयार होतात म्हणून मांस नीट शिजवूनच खावे.
 • नखे वेळोवेळी कापावीत व काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत.

काही घरगुती उपाय

 • रोज सकाळी अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासह घ्यावे. लहान मुलांसाठी दूध उकळताना त्यात वावडिंगाच्या बिया टाकाव्यात. बिया दोन-तीन तास आधीच भिजवून ठेवाव्यात किंवा विडंगारिष्ट अर्धा ते दोन चमचे वयानुसार दोन वेळा द्यावे. साधारण दोन आठवडे खंड न पाडता रोज द्यावे.
 • जेवणानंतर ताकात बाळंतशेप, बडीशेप, ओवा व हिंग यांचे बारीक चूर्ण टाकून घेण्यानेही जंत कमी होतात.
 • शेवग्याच्या शेंगा उकळून त्या पाण्यात सैंधव मीठ व मिरे पूड टाकून घेतल्याने जंत कमी होतात.
 • जंत होऊ नये म्हणून आहारात कडीपत्ता, ओवा, हिंग, मिरी, हळद, जिरे, सैंधव मीठ, शेवगा, दालचिनी, मुळा या गोष्टींचा आहारात नियमितपणे समावेश करावा.
 • कारल्याच्या पानांचा रस, मुळ्याचा रस व मध एकत्र करून घेतल्याने जंत पडण्यास मदत होते.
 • कडुनिंबाच्या सालीचे चूर्ण व हिंग यांचे मिश्रण मधासह घेण्याने जंतांचा नाश होतो.
 • डाळिंबाची साल वाळवून त्याचे चूर्ण रोज अर्धा चमचा इतक्या प्रमाणात घेण्याने जंतांचे प्रमाण कमी होते.
 • खाजकुयलीची कुसे मधाबरोबर घेण्याने जंत पडतात. दुसऱ्या दिवशी त्रिफळासारखे चेटक घ्यावे.
 • वारंवार जंत होण्याची सवय असल्यास जेवणानंतर एक-दोन लवंग किंवा दालचिनीचा छोटा तुकडा खावा.
 • लसणाची एक पाकळी तुपात तळून सकाळ-संध्याकाळ महिनाभर घ्यावी.
 • रोज चार ते पाच कडीपत्त्याची ताजी पाने चावून खाल्ल्यास बारीक दोऱ्याप्रमाणे दिसणारे जंत मलावाटे बाहेर पडतात.
  आजकाल जंत पडण्यासाठी ‘अलबेन्डॅझॉल’सारखी गोळी शाळेत दिली जाते. या औषधांमुळे जंत मारले जातात. मात्र मलाद्वारे बाहेर पडतातच असे नाही. त्यामुळे या गोळ्यांंबरोबर एरंडेल, त्रिफळा चूर्ण किंवा आरग्वधासारखे रेचक औषध घ्यावे.