>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, दिगंबर कामत यांनी भरला अर्ज; उमेदवारी अर्जांसाठी आज शेवटचा दिवस
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी भाऊगर्दी झाली होती. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. आतापर्यंत एकूण ३१० अर्ज दाखल झाले असून, काहींनी दोन-दोन अर्ज भरले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (दि. २८) हा शेवटचा दिवस आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोनच दिवस उरल्याने काल अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या कालावधीत पहिल्या तीन दिवसांत केवळ ७० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर काल अनेकांनी आपले अर्ज मतदारसंघातील निवडणूक अधिकार्यांकडे सादर करण्यासाठी धावपळ केली. यावेळी बहुतांश उमेदवारांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयांबाहेर जमले होते. यावेळी कोविड नियमांचे कोठेही पालन होत नसल्याचे दिसून आले.
काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (साखळी), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (मडगाव), माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (मांद्रे), माजी मंत्री मायकल लोबो (कळंगुट), उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर (मडगाव), मंत्री विश्वजीत राणे (वाळपई), मंत्री जेनिफर मोन्सेरात (ताळगाव), आमदार चर्चिल आलेमाव (बाणावली), माजी आमदार एलिना साल्ढाणा (कुठ्ठाळी), दिव्या राणे (पर्ये), उद्योजक रिकार्डो डिसोझा (कळंगुट), माजी आमदार रवी नाईक (फोंडा), विजय सरदेसाई (फातोर्डा), मनोज परब (वाळपई), माजी आमदार किरण कांदोळकर (हळदोणा), सभापती राजेश पाटणेकर (डिचोली), ज्योशुआ डिसोझा (म्हापसा), जेनिता मडकईकर (कुंभारजुवा), जोसेफ सिक्वेरा (कळंगुट), नारायण नाईक (कुठ्ठाळी), प्रवीण झांटये (मये), कार्लूस आल्मेदा (वास्को), दामू नाईक (फातोर्डा) आणि डॉ. चंद्रकांत शेटये (डिचोली) या प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
कोण काय म्हणाले?
बाबूश मोन्सेरात…
पणजीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तुम्ही उत्पल पर्रीकर यांना जास्त महत्त्व का देता, असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. कॉँग्रेस, आपने सक्षम उमेदवार पणजीत दिले आहेत, तरी तुम्ही केवळ उत्पल यांचेच नाव का घेता? आपण कुठल्याही उमेदवाराला कमजोर उमेदवार समजत नाही. मतदार योग्य निर्णय घेतील, असे मोन्सेरात म्हणाले.
उत्पल पर्रीकर…
यावेळी मतदार दबावाला बळी पडणार नाहीत. पणजी मतदारसंघातील मतदारांकडून आपणाला निश्चित पाठिंबा मिळेल, असा विश्वास उत्पल पर्रीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. उत्पल पर्रीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. यावेळी उत्पल पर्रीकर यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.
पणजीतील प्रमुख उमेदवारांचे एकाच दिवशी अर्ज
पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात, कॉँग्रेसचे उमेदवार एल्विस गोम्स, अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर, आम आदमी पक्षाचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी एकाच दिवशी काल निवडणूक अधिकार्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केले.