राज्यात चोर्यामार्यांत अचानक वाढ झालेली दिसते. विशेषतः फोंडा तालुक्यात खांडोळ्याच्या श्री महागणपतीलाच ह्या अधार्मिक चोरट्यांनी लुबाडले. उसगावात दोन एटीएम लुटली गेली, कुंकळ्येत एक दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यातच गेले काही दिवस महिलांच्या सोनसाखळ्या पळविण्याच्या प्रकारांतही वाढ झाली आहे. राज्यात अचानक वाढलेली ही गुन्हेगारी एखाद्या बिगरगोमंतकीय सराईत चोरट्यांच्या टोळीने गोव्यात प्रवेश केल्याची खूण आहे. अशा टोळ्या आपला संशय येऊ नये यासाठी आपल्यासोबत एखाद्या महिलेलाही ठेवतात असे यापूर्वीही दिसून आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक कुटुंबे आपल्या मूळ गावी श्रीगणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी गोव्यातील आपली घरे बंद करून जात असल्याने अशा टोळ्या या दिवसांत गोव्यात घुसत असतात आणि गणेशोत्सवाच्या काळात लुटालूट करून पोबारा करीत असतात. गेली कित्येक वर्षे असे प्रकार सुरू आहेत. मग असा पूर्वानुभव असताना रात्रभर चोरटे तालुक्यात धुमाकूळ घालत असताना फोंडा पोलीस कुठे झोपले होते असा संतप्त सवाल नागरिक करू लागले तर चूक कसे म्हणायचे?
खांडोळ्यातील महागणपती मंदिरातील चोरी, एटीएम फोडणारी टोळी, कुंकळ्ये येथील दुकानातील चोरी ह्या सगळ्या चोरीच्या घटनांत एकाच टोळीचा सहभाग आहे की चोरीच्या ह्या स्वतंत्र घटना आहेत हे अद्याप स्पष्ट नाही. कुंकळ्ये येथून पळ काढताना चोरट्यांना दुचाक्या टाकून पळ काढावा लागला, परंतु त्या अर्थातच चोरीच्या आहेत. त्यामुळे पोलिसांची मदार आता केवळ ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवर आहे. फोंड्यात सी. एल. पाटील यांच्यासारखे अनुभवी व कार्यक्षम उपअधीक्षक आहेत, त्यामुळे ते ह्या चोर्यांचा छडा लवकरात लवकर लावतील अशी अपेक्षा आहे. परंतु फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील रात्रीच्या गस्तीत सुस्तता आलेल्याचे ह्या घटना निदर्शक आहेत हेही कबूल केले गेले पाहिजे. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोलीस यंत्रणेला जरा जागवावे. अर्थात सगळा दोष पोलिसांच्याही माथी मारता येणारा नाही.
मुळात एटीएमसारख्या ठिकाणी बँकांनी सुरक्षा रक्षक नेमणे अनिवार्य असताना असे चोरीचे प्रकार कसे घडू शकतात हाही प्रश्न आहे. एटीएम फोडले गेले आणि एटीएमच्या रक्षणासाठी तेथे सुरक्षा रक्षक नियुक्त केलेला नसेल तर त्यासाठी बँकच्या संबंधित शाखा व्यवस्थापकाला जबाबदार धरले गेले तरच अशी बेफिकिरी थांबेल. खांडोळ्यातील महागणपतीच्या मंदिरातून श्रींचे सोन्याचांदीचे अलंकार घेऊन पळालेल्या चोरट्यांनी सीसीटीव्हींचे डीव्हीआरही काढून नेले आहेत. याचाच अर्थ चोरटे शिकाऊ नाहीत. तरबेज आहेत. असे दागदागिने लुटले जातात तेव्हा स्वस्तात मिळते म्हणून हे सोने चांदी चोरट्यांकडून खरेदी करणारे काही स्थानिक सुवर्णकार आहेत हे यापूर्वीच्या चोरी – दरोड्यांत आढळून आलेले आहे. अशा लोकांवरही सहगुन्हेगार मानून पोलिसी कारवाई झाली पाहिजे.
राज्यामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही लावलेले आहेत. असे असताना अशा गुन्हेगारी टोळ्या येतात, लुटतात आणि बिनबोभाट पळ काढतात हे कसे घडू शकते? याचाच अर्थ पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीत ढिलाई आहे. अनेकदा छोटे मोठे गुन्हे झाले की तक्रारदाराला त्यासंबंधी तक्रार न करण्याचा सल्ला पोलीस स्थानकातच दिला जातो. कोर्टात फेर्या माराव्या लागतील अशी भीती घातली जाते. त्यामुळे गुन्हेगारीची आकडेवारी कमी दाखवता येते. परंतु अशा घटना घडतात तेव्हा यंत्रणेची पोलखोल होऊन जाते.
आता लवकरच गणेशोत्सव येणार आहे. घरे बंद ठेवून लोक बाहेरगावी जातील. तेव्हा राज्यात दरोडे पडायला नको असतील तर पोलीस यंत्रणेने जरा सतर्क व्हावे. एकाच रात्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या चोर्यांमुळे पोलिसांची नाचक्की झाली असल्याने वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली जाईल आणि परवाच्या घटनांतील टोळी पकडली जाईल अशी आशा आहे, परंतु नंतर त्याबद्दल शेखी मारण्यापेक्षा मुळात अशा घटना घडूच नयेत यासाठी काय प्रतिबंधक उपाययोजना करता येण्यासारख्या आहेत याचा विचार झाला पाहिजे. गोव्याच्या सीमांवर आणि बस, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर नीट तपासणी झाली तर पर्यटनाच्या बहाण्याने गोव्यात घुसून लुटालूट करणार्या बाहेरील गुन्हेगारी टोळ्यांना हुडकणे कठीण नसेल. गरज आहे जागरूकतेची. मुळात पोलीस यंत्रणेचा धाक चोराचिलटांना असायला हवा तो गोव्यात दिसत नाही. पोलीस यंत्रणेकडून अधिक सतर्कतेची आणि वाढत्या गस्तीची अपेक्षा आहे. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या विषयात जातीने लक्ष घालून जनतेला आश्वस्त करावे.
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.