चला, मतदान करूया!

0
23

गेला महिनाभर चाललेल्या प्रचाराच्या रणधुमाळीनंतर अखेर मतदानाचा दिवस उजाडला आहे. लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागांसाठी आज मतदान होणार आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात मिळून जवळजवळ अकरा लाख ऐंशी हजार मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्हीही मतदारसंघांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे आणि त्यांचा कौल ह्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. निवडणूक आयोग गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक निवडणूक शांततेत व सुरळीत तर व्हावीच, परंतु मतदारांसाठी ती अधिकाधिक सुखकर व सुविधाजनक व्हावी असा प्रयत्न करीत असते. ही निवडणूकही त्याला अपवाद नाही. मागील काही निवडणुकांप्रमाणेच ह्या निवडणुकीतही काही मतदानकेंद्रे ‘गुलाबी’ म्हणजे केवळ महिला कर्मचारी असलेली, काही ‘आदर्श’ मतदानकेंद्रे, काही पर्यावरणपूरक, तर काही दिव्यांग कर्मचारी संचालित केंद्रेही आहेत. निवडणूक आयोगाच्या ह्या कल्पक प्रयोगांना मतदारांनी यापूर्वीही उत्साही साथ दिली आहे आणि यावेळीही ती निश्चित मिळेल ह्यात शंका नाही. सध्या दिवस कडक उन्हाळ्याचे आहेत, परंतु एकूण मतदान ऐंशी टक्क्यांवर व्हावे असा प्रयत्न निवडणूक आयोगाने चालवलेला आहे. उन्हाळा असल्याने मतदानकेंद्रावर गेल्याने उष्म्याचा त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन अनेक मतदार मतदानास जाणे टाळू शकतात हे लक्षात घेऊन मतदानकेंद्रावर सकाळी नऊ ते दुपारी चार ह्या वेळेत पाणी आणि लिंबूपाण्याची सोय करण्यात आलेली आहे. शिवाय मतदारांना गरज भासल्यास प्रथमोपचाराची सोयही तयार ठेवण्यात आलेली आहे हे स्वागतार्ह आहे. उन्ह जास्त आहे म्हणून शेतकऱ्याने शेतात राबायचे थांबवले किंवा सैनिकांनी सीमांचे रक्षण थांबवले तर? त्यामुळे उन्हाळा ही सबब लंगडी आहे. उन्हापासून संरक्षणाची योग्य खबरदारी घेऊन मतदान करणे काही फार कठीण नाही. ज्येष्ठ नागरिकांना अगदी घरातून मतदान करण्याची सोयदेखील निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. यंदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही मतदानकेंद्रांवर वृक्षारोपणाचा एक नवा आणि पर्यावरणाभिमुख उपक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. अर्थात, भर उन्हाळ्यात लावल्या जाणाऱ्या ह्या वृक्षांची पाऊस जोर धरेपर्यंत म्हणजे पुढील किमान महिनाभर योग्य निगाही राखली जावी. हा केवळ फोटोपुरता देखावा ठरू नये. मतदानाचा आपला हक्क बजावणे हे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आणि ती जबाबदारीही आहे. मतदानाची भरपगारी सुट्टी असल्याने अनेक मंडळी सहकुटुंब सुट्टीवर पळतात, परंतु हा पळपुटेपणा लोकशाहीच्या हिताचा नाही. काही खासगी आस्थापनांनी मतदानास प्रोत्साहन देण्यासाठी मतदान करणाऱ्या ग्राहकांसाठी खास सवलती घोषित केलेल्या आहेत. मतदान न करणाऱ्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देणारे उपक्रमही राबवले गेले पाहिजेत, तरच मतदानाच्या दिवशी सुट्टी घेण्याचे हे प्रकार थांबतील. गोव्यातील दोन्ही मतदारसंघांतून प्रत्येकी आठ उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानयंत्रांतून आज बंदिस्त होणारा जनतेचा कौल कळण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे हे तर झालेच, परंतु ही लोकसभेची निवडणूक आहे आणि गोव्याचे प्रतिनिधित्व योग्य प्रकारे दिल्लीत करू शकणाऱ्या उमेदवारालाच निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे. जात – पात – धर्म असा संकुचित विचार न करता आणि मतदानाकडे नकारात्मकपणे न पाहता, योग्य, स्वच्छ, निष्कलंक उमेदवारांना दिल्लीत पाठवण्याचे कर्तव्य गोव्याचे सुज्ञ मतदार निश्चितपणे पार पाडतील ह्याची खात्री वाटते. गोव्यातील मतदार सुज्ञ आहे हे त्याने वेळोवेळी दिलेल्या कौलातून दिसून आले आहे. केवळ मोठ्या प्रमाणात मतदान होणे पुरेसे नसते. निवडणूक म्हणजे काही एकगठ्ठा मतांचा बाजार नव्हे. ते स्वयंप्रेरणेने झाले पाहिजे, कर्तव्यभावनेतून झाले पाहिजे, तरच त्यातून योग्य फलनिष्पत्ती होऊ शकते. जनतेच्या ह्या कौलावर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही संसदेमध्ये गोव्याचा आवाज होणे ही आपली जबाबदारी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. उन्हातान्हात रांगा लावून मतदार आपल्याला निवडून देत आहेत ते दिल्लीत गोव्याचा आवाज बुलंद करण्यासाठी. आपला पक्ष, आपले राजकारण ह्यापेक्षा आपले राज्य, आपला देश, आपली जनता मोठी आहे, ह्याची जाणीव ह्या उमेदवारांनीही ठेवायला हवी. सत्ता, संपत्तीची कोणतीही अभिलाषा न ठेवता, जनतेचे रोजचे जगणे सुखकर व्हावे, आपले राज्य, आपला देश सुखी, समाधानी आणि समृद्ध व्हावा याची प्रामाणिक कळकळ समोर ठेवून दिल्लीला जाण्याची आस बाळगणाऱ्या उमेदवारांनाच चोखंदळपणे निवडून देऊया. देश बळकट करूया! चला, मतदान करूया!