चर्चा तर झाली

0
158

‘‘ह्या रविवारी माझे फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम व यूट्यूबवरील सोशल मीडिया अकौंट सोडून देण्याचा विचार करतोय’’ असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केल्याने देशात प्रचंड खळबळ माजली. पंतप्रधानांच्या या घोषणेचा नेमका अर्थ काय यावर नानाविध तर्कवितर्कांना उधाण आले. बहुतेकांना वाटले की, मोदी सोशल मीडियाला कायमचा रामराम ठोकू पाहत आहेत. मग त्यामागच्या कारणांवर चर्चा सुरू झाली. काहींना वाटले, मोदी आता ‘भारतीय सोशल मीडिया’ घेऊन येत असल्यानेच या विदेशी माध्यमांना रामराम करीत आहेत. शशी थरूर तर उत्साहाच्या भरात, मोदी सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या विचारात आहेत, त्याचे हे पूर्वचिन्ह आहे अशी प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले.. अर्थात, पंतप्रधान मोदींच्या डोक्यात नेमके काय आले आहे हे सांगणे अवघड होते, त्यामुळे हे तर्कवितर्क उसळणे स्वाभाविक होते. मात्र, मोदींच्या या घोषणेने या समाजमाध्यमांचे कर्ते हादरले असतील यात शंका नाही, कारण मोदींनी खरोखरच या माध्यमांना कायमचा रामराम ठोकला, तर त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून त्यांचे लाखो भक्तही त्याच वाटेने जाण्याची शक्यता त्यांना सतावून गेली. खरे तर मोदी हे या समाजमाध्यमांच्या अंगभूत ताकदीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. भारतीय राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या आगमनासही बर्‍याच अंशी या समाजमाध्यमांचे साह्य लाभले होते हेही नाकारता येत नाही. या समाजमाध्यमांची असलेली ताकद आणि समाजाशी जोडले जाण्यासाठी त्यांचा करता येणारा वापर याविषयी मोदी वेळोवेळी आग्रहाने बोलत आले. आपल्या सरकारला त्यांनी समाजमाध्यमांवर सक्रिय होण्यास उद्युक्त केले. सर्व मंत्री, सर्व सरकारी खाती या समाजमाध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचावीत यासाठी विशेष प्रयत्न झाले. सरकारने त्यासाठी स्वतंत्र व सुसज्ज असा समाजमाध्यम विभाग देखील स्थापन केला. एवढे सगळे असूनही मोदी जर खरोखरच या समाजमाध्यमांना कायमचा रामराम ठोकू पाहात असतील, तर त्यामागे या माध्यमांचा चाललेला दुरुपयोग हे तर कारण नसेल ना, अशीही एक शंका जनतेच्या मनात डोकावली. शेवटी मोदींनीच आपण केवळ एका दिवसापुरते जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपली सारी सोशल मीडिया खाती महिलांच्या हाती सोपविणार असल्याचे जाहीर करून या सार्‍या चर्चेचा बार फुसका ठरविला. परंतु या निमित्ताने का होईना, परंतु समाजमाध्यमांच्या सद्यस्थितीवर थोडे आत्मचिंतन करणारी चर्चा झाली. शेवटी समाज माध्यम हे माध्यम आहे. ते कसे हाताळायचे, कसे वापरायचे हे वापरणार्‍याच्या हाती आहे. सोशल मीडिया हा आज एक उकिरडा झालेला आहे हे बर्‍याच अंशी खरे आहे. कोणीही उठावे आणि त्यावर काहीही टाकावे असा प्रकार आजकाल अहोरात्र चाललेला आहे. त्याच्या परिणामांची फिकीर आहे कोणाला? आपल्या मनातली सारी गरळ ओकण्यासाठी हे आयते मोफत साधन प्रत्येकाला उपलब्ध झाले आहे. त्यामुळे या माध्यमाची ताकद जरी प्रचंड असली, त्याचा सकारात्मक उपयोग करण्याच्या संधी जरी अगणित असल्या, तरी प्रत्यक्षात सकारात्मक गोष्टींसाठी या माध्यमाचा वापर करणार्‍यांपेक्षा नकारात्मक गोष्टींसाठी, अफवा पसरवण्यासाठी, विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्यासाठी या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. आपल्या निवडणुकांना देखील या माध्यमांकरवी कशा प्रकारे प्रभावीत केले गेले त्याचे दाखले केंब्रीज ऍनॅलिटिका प्रकरणात आपल्यासमोर आले. आज प्रत्येक राजकीय पक्षाच्या सोशल मीडिया सेल सक्रिय आहेत. आपल्या विरोधकांना ट्रोल करणे, बदनाम करणे यासाठी सज्ज असलेल्या टोळ्या या समाजमाध्यमांवर संभावितपणे वावरत असतात. क्षणाक्षणाला या माध्यमांतून ओतल्या जाणार्‍या प्रचंड डेटामधून खरोखरच आपले जगणे समृद्ध करणारे असे आपल्या हाती काय लागते आणि आपल्याला विचलीत करणार्‍या गोष्टी किती असतात याचा खरोखर अभ्यास व्हायला हवा. सोशल मीडियाच्या माध्यमातून अरब जगतामध्ये राज्यक्रांती घडल्या, परंतु आपल्याकडे ‘फेक न्यूज’ च्या माध्यमातून देशामध्ये जे विषारी वातावरण निर्माण होताना अनेकदा दिसते त्याला सोशल मीडियाचा गैरवापरच कारणीभूत असतो. समाजमाध्यमांवरील अफवांमुळे दंगे उसळल्याच्या, माणसांवर हल्ले झाल्याच्या असंख्य घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडल्या आहेत. समाज माध्यमांवरून खोट्या बातम्या पसरवण्यात कोणाला काय आसुरी आनंद मिळतो देव जाणे, परंतु त्यातून या माध्यमाची विश्वासार्हता संपुष्टात येत चालली आहे हेही तितकेच खरे आहे. ‘फेक न्यूज कशी ओळखावी’ यावर मध्यंतरी फेसबुक आणि व्हॉटस्‌ऍपला वर्तमानपत्रांतून पान पान जाहिराती द्याव्या लागल्या होत्या, हे चित्र काही भूषणावह म्हणता येणार नाही. ही माध्यमे कितीही चांगली असोत, कितीही सामर्थ्यशाली असोत, त्यांना मिळालेले सामर्थ्य हे आपल्यामुळे मिळालेले असते. ती कशी वापरायची हे शेवटी आपल्या हाती असते. त्याची जाणीव या निमित्ताने का होईना समाजाला झाली हेही नसे थोडके!