चतुर्थीपूर्वी सामाजिक योजनांचे मानधन देणार : मुख्यमंत्री

0
52

>> मानधनाची रक्कम 15 सप्टेंबरपर्यंत बँक खात्यात जमा; ‘मुख्यमंत्री एलपीजी सिलिंडर अनुदान’ योजनेचा शुभारंभ

राज्य सरकारच्या विविध सामाजिक योजनांच्या लाभार्थ्यांचे मानधन, तसेच दूध उत्पादक शेतकरी व इतरांच्या प्रलंबित अनुदानाची थकित रक्कम आगामी गणेश चतुर्थीपूर्वी 15 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. नागरी पुरवठा खात्याच्या ‘मुख्यमंत्री एलपीजी सिलिंडर अनुदान योजने’च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक, नागरी पुरवठा खात्याचे सचिव संजीत रॉड्रिग्ज, संचालक गोपाळ पार्सेकर यांची उपस्थिती होती.
राज्य सरकारने गोमंतकीयांना गणेश चतुर्थी उत्साहात साजरी करता यावी यासाठी गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आदींचे सर्व थकित मानधन 15 सप्टेंबरपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, राज्यातील शेतकरी, दूध उत्पादक प्रोत्साहन अनुदानाची थकबाकी दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून दिला जाणारा तांदूळ चांगला नसल्याची अफवा काही जण पसरवत आहे. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. तो तांदूळ प्रोटीनयुक्त व फोर्टीफाईड आहे. यामुळेच तो दिसायला वेगळा दिसतो. तसेच, सामान्य तांदळापेक्षाही जास्त पोषक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नागरी पुरवठा खात्याकडून या महिन्यात शिधापत्रिकेवर अनुदानित दरात साखर दिली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी डॉ. सावंत यांनी केली.
यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी मार्गदर्शन केले. तसेच गॅस अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले.

गॅस सिलिंडरसाठीचे अनुदान त्वरित जमा करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी एलपीजी सिलिंडरचे दर 200 रुपयांनी कमी केले आहेत. तसेच, राज्य सरकारने अंत्योदय अन्न शिधापत्रिकाधारकांसाठी गॅस सिलिंडरसाठी प्रति महिना 275 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ सुमारे 11 हजार 550 कुटुंबांना होणार आहे. या योजनेखालील तीन महिन्यांचे 825 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.