चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
6

>> झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला रामराम; मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर होते नाराज

झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. झारखंडची राजधानी रांची येथील शहीद मैदानात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या उपस्थितीत चंपाई सोरेन यांनी भाजपात प्रवेश केला. वर्षअखेरीस झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हा पक्षप्रवेश महत्त्वाचा ठरला आहे.

चंपाई सोरेन यांनी काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर पोस्ट करत झारखंड मुक्ती मोर्चा पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला अपमानास्पद पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून काढल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर त्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला.
पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला झारखंड भाजपचे संघठन प्रभारी लक्ष्मीकांत वाजपाई, भाजप प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी, माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

चंपाई सोरेन यांच्या या निर्णयानंतर आता झारखंडच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंपाई सोरेन हे झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन यांचे निकटवर्तीय मानले जातात. झारखंड राज्याची निर्मिती करण्यासाठी झालेल्या आंदोलनात चंपाई सोरेन सहभागी होते. हेमंत सोरेन तुरुंगात असताना चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले होते; मात्र हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांना राजीनामा मुख्यमंत्रिपदाचा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.

चंपाई सोरेन भाजपात दाखल झाल्यामुळे राज्यात भाजपाची ताकद वाढली आहे. विधानसभेच्या बहुसंख्य जागांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. कोल्हान क्षेत्रावर त्यांची मजबूत पकड आहे. राज्यात त्यांची ‘कोल्हानचा टायगर’ अशी ओळख आहे. झारखंडमधील विधानसभेच्या 81 जागांपैकी 28 जागा आदिवासी समुदायासाठी राखीव आहेत. या जागांवर भाजपाची ताकद कमी आहे. चंपाई सोरेन यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपाची या जागांवरील ताकद वाढणार आहे. त्यामुळे राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेससमोरील आव्हाने वाढली आहेत.