घर की नुसता पत्ता?

0
21
  • प्रा. रमेश सप्रे

आजीबाईंना बातम्यांत बिलकूल रस नव्हता, पण नंतर ‘हरवलेल्या व्यक्तींचा शोध’ म्हणून जी चित्रं दाखवून माहिती दिली जाई त्यावेळी मात्र श्वास रोखून पाहत. इतरांना आश्चर्य वाटे, पण विचारूनही आजी काही बोलत नसत.

काही वर्षांपूर्वी वृद्धाश्रमातील एका आजींची हृदयस्पर्शी सत्यकथा खूप प्रसिद्ध (हल्लीच्या भाषेत व्हायरल) झाली होती. तो वृद्धाश्रम सेवाभावी वृत्तीनं फक्त निराधार वृद्धांसाठी कार्यरत होता. अर्थातच तेथील प्रवेश नि साऱ्या सेवा निःशुल्क होत्या.
एका अतिपावसाळी रात्री या आजी अंगावरच्या कपड्यांनिशी पूर्ण भिजून कुडकुडत आश्रमाच्या दारात पडल्या होत्या. त्यांना सेवेकऱ्यांनी आत आणले. असा झाला आजींचा प्रवेश नि सुरू झाला आश्रमातील जीवनप्रवास!
आजी एकही शब्द बोलायच्या नाहीत. त्या अत्यंत आरोग्यवान नि बहुगुणसंपन्न तशाच कलाकौशल्ययुक्त होत्या. मुख्य म्हणजे निरपेक्ष सेवाभावी असल्याने सर्वांना हव्याहव्याशा वाटत होत्या. इच्छा असूनही त्यांची कोणतीही सेवा करण्याची संधी कुणालाही मिळत नव्हती, इतक्या त्या स्वयंपूर्ण, स्वावलंबी नि स्वाभिमानी होत्या. एकूण त्या आजी एक आदर्श व्यक्तिमत्त्व होतं.

त्यांचा एक स्वभावविशेष म्हणजे, पूर्ण मौन असल्याने आश्रमातील सेवा संपली की त्या एकट्या बसायच्या. एरव्ही खूप सक्रिय असलेल्या आजींचा हा एकांत इतर आश्रमवासीयांना खूप गूढ वाटे. त्या काळात दूरदर्शन हा कृष्णधवल (ब्लॅक ॲण्ड व्हाईट) होता. एकच वाहिनी होती. तिच्यावर दर शनिवारी एक मराठी चित्रपट दाखवला जात असे. सारेजण टी.व्ही. असलेल्या सभागृहात बसून तल्लीन होऊन चित्रपट पाहत असत. त्यावेळी आजी एकट्याच बागेतल्या बाकावर बसून शून्यात नजर लावून कसल्यातरी विचारात असत. ज्यावेळी चित्रपटाचं मध्यांतर होई, ‘चित्रपटाचा उर्वरित भाग बातम्यांनंतर’ अशी सूचना पडद्यावर येई तेव्हा सर्वजण उठून जात. त्यावेळी लगबगीने आजी टी.व्ही.च्या पडद्यासमोर बसत आणि एक टक लावून समोरून सरकणाऱ्या चित्रांकडे पाहत. त्यांना बातम्यात बिलकूल रस नव्हता, पण नंतर ‘हरवलेल्या व्यक्तींचा शोध’ म्हणून जी चित्रं दाखवून माहिती दिली जाई त्यावेळी मात्र श्वास रोखून पाहत. इतरांना आश्चर्य वाटे, पण विचारूनही आजी काही बोलत नसत.
एकदा त्या वृद्धाश्रमावर डॉक्युमेंटरी करण्यासाठी काहीजण आले. त्यात मुलाखत घेणारी एक चुणचुणीत तरुणी होती. ज्यावेळी आजींकडे खुणांच्या (मुक्यांच्या) भाषेत तिने संवाद सुरू केला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का देत इतक्या दिवसांत मुक्या असलेल्या आजी डोळ्यांत पाणी आणून उद्गारल्या, “तुझ्या वयाचीच नातवंडं आहेत गं माझी! दोन मुलं नि दोन मुली आहेत मला. पतीच्या अकाली निधनानंतर मी एकटीनं सर्वांना लहानाचं मोठं केलं. शिकवलं. स्वतःच्या पायावर त्यांना उभं केलं. सर्वजण वेगवेगळे राहायला लागले. माझा उपयोग होता तोपर्यंत सर्वांनी मला वापरलं. नंतर कोणीही जबाबदारी घेईना म्हणून कुणाच्याही नकळत एका पावसाळी रात्री मी घराबाहेर पडले नि इथं पोचले. नवे संबंध जोडून विषाची परीक्षा कशाला पाहायची म्हणून फक्त मौनसेवा करायचं ठरवलं. इथल्या सर्वांना मी हवी असते; पण माझ्या रक्ताच्या मुलामुलींना, नातवंडांना माझी कधीतरी आठवण येईल नि ‘हरवलेल्या व्यक्तींचा शोध’ या कार्यक्रमात ते माझा फोटो देऊन मला घरी बोलावतील या खुळ्या आशेनं फक्त तो पाच मिनिटांचा कार्यक्रम मी बघते. सुरुवातीला खूप आशा होती. आता इतक्या वर्षांनंतरही वाटतंच, कधीतरी बोलावतील, शोधतील. आता वाटतं मी नाही, ती मंडळीच हरवलीय!”
सर्वांचे, अगदी त्या मुलाखत घेणाऱ्या तरुणीचेही डोळे पाणावले होते. अनेकांची अवस्था आजीसारखीच होती. सर्व भानावर येण्यापूर्वी आजी पुढची कामं करण्यासाठी निघून गेल्या होत्या. असो.

पु. ल. देशपांडे यांनी आपल्या चिंतनगर्भ खुमासदार शैलीत अमेरिकेतील जनजीवनावर एक लेख लिहिला होता. त्याचं शीर्षक होतं- ‘एक बेपत्ता देश.’ एकदा अमेरिकेतील मित्राचा पत्ता शोधत असताना सर्वजण न बोलता पुढे जात होते. शेवटी एका आजीबाईंना त्यांनी गाठलं. घाबरून त्याही पळून जात होत्या, पण त्यांना पु.ल. म्हणाले, “मी माझ्या मित्राचा पत्ता शोधतोय. तो या भागातच राहतो. मी भारतातून आलोय.” हे शब्द ऐकताच ती अमेरिकन आजी म्हणाली, “खरंच तू भारतीय आहेस. मग मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते. आय्‌‍ कॅन ट्रस्ट यू.” तिनं पत्ता सांगितला. पु.ल. तिथं पोचले. आज त्यांच्या अमेरिकेतील मित्राचा गृहप्रवेश होता. वास्तुशांतीचा विधी सुरू होता. खुणेनंच त्यानं पु.लं.ना बसायला सांगितलं. ते बसले मात्र, एवढ्यात बाजूचा फोन वाजला. पु.लं.नी तो घेतला आणि काही बोलणार इतक्यात पलीकडून मंजूळ स्वरात एक तरुणी म्हणाली, “अभिनंदन! आपण अमेरिकेत घर घेतलंय तेव्हा आता इथंच राहणार ना? पुन्हा अभिनंदन! कदाचित तुमचा हाऊस वॉर्मिंग सेरेमनी (वास्तुशांती) सुरू असेल. पण तुम्ही इथं राहणार म्हणजे इथंच मरणार. आमची एजन्सी स्वस्त दरात जवळच्या दफनभूमीत आपल्यासाठी जागा ‘रिझर्व्ह’ करील. आणि हे पहा, सध्या आमची स्कीम चालू आहे- ‘एकावर एक फ्री…” ती असंच काही बोलत असताना पु.लं.नी फोन काटला नि कपाळावरचा घाम पुसत म्हणाले, “काय देश आहे हा? स्वतःचा पत्ता हरवलेला. बेपत्ता!” विचार करण्यासारखा अनुभव आहे हा. वाईट एकच वाटतं की आता सर्व देश अगदी आपला प्रिय भारतसुद्धा असा ‘बेपत्ता’ समाज होत चाललाय. आपला आत्मपरिचय (सेल्फ आयडेंटिटी) विसरत चाललाय. संस्कृतीची पाळंमुळं उखडत चालल्यामुळे आपला समाज बेपत्ता (पान नसलेल्या, पर्णहीन) वृक्षासारखा भकास बनू लागलाय. ही स्थिती बदलली नाही तर समाजव्यवस्था डळमळू लागेल. असो.
एकदा नारद काहीशा तक्रारीच्या स्वरात विष्णुभगवानांना विचारतात, “भगवंता, तुझा निश्चित ठावठिकाणा (पत्ता) कोणता?” यावर हसून भगवंत सांगतात, “मी वैकुंठ, सूर्य, समाधिस्थ योग्याचं मन अशा ठिकाणी कधीकधी असतो. पण ‘मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद।” म्हणजे माझे भक्त जिथे नामघोष-भजन-कीर्तन-नर्तन करतात तिथं मी असतोच असतो. अगदी तिष्ठत उभा असतो… अठ्ठावीस युगे! पुंडलिक नि इतर भक्त, वारकरी यांची निरंतर भक्ती जिथं चालू आहे, तीच तर खरी पंढरी! नामानं अखंड दुमदुमणाऱ्या पंढरीत, नारदा, माझा नित्यनिवास असतो. हा खरा भगवंताचा कायमपत्ता (पर्मनंट ॲड्रेस). पण याहीपेक्षा एक चिरंतन पत्ता (इंटर्नल ॲड्रेस) भगवंत गीतेत सांगतात- ‘ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽजुर्न तिष्ठति.’ सर्व प्राणिमात्रांच्या ‘हृदयात’ ईश्वराचा वास असतो.

आपल्याला हा पत्ता मिळाला तर आपण कधीही बेपत्ता होणार नाही. ‘24 बाय 7 ग्लोबल कनेक्टिव्हिटी’ तेव्हाच प्रभावी ठरेल जेव्हा आपली ‘इनर कनेक्टिव्हिटी’ अभंग, अखंड राहील. यासाठी हवा आत्मसंवाद. एकांतात स्वतःशी बोलण्याची सवय लावली पाहिजे. बाहेर तर सारेच अखंड बोलत, गुगलत असतात. आत वळलं नाही तर बेपत्ताच!
एका लघुपटातलं भरतवाक्य (अखेरचं संदेशवाक्य) खूप अर्थपूर्ण होतं… ‘आपण स्वतः, आपलं घर फक्त एक ॲड्रेस (पत्ता) नसतं तर प्रेझेन्स (उपस्थिती) असतं. प्रेझेंटच नसलो तर अस्तित्वच नाही. फक्त पास्ट ॲण्ड फ्यूचर. फक्त दुखऱ्या आठवणी नि भेडसावणाऱ्या चिंता! अखंड वर्तमान हाच आपला खरा पत्ता आहे. बघा विचार करून.