नगरगाव-आंबेडे येथील घटना; कुटुंबीयांकडून घातपाताची शक्यता व्यक्त
नगरगाव-आंबेडे येथे 24 वर्षीय श्रवण देविदास बर्वे या तरुणाचा मृतदेह घराच्या अंगणात काल संशयास्पद स्थितीत सापडला. त्याच्या गळ्याभोवती दोरी, गळ्याला जखम आणि हाताला जखम झाली होती. त्यामुळे त्याचा खून झाल्याचा संशय वडिलांनी व त्याच्या भावाने व्यक्त केला आहे. सदर घटना घडली, त्यावेळी श्रवण हा एकटाच घरात होता, तर अन्य कुटुंबीय हे होंडा येथील घरी वास्तव्याल होते. काल सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ते नगरगाव येथे परतल्यानंतर वडिलांना श्रवणचा मृतदेह घराच्या अंगणात दिसून आला आणि त्यानंतर वाळपई पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
नगरगाव आंबेडे येथील हनुमान मंदिराच्या परिसरापासून जवळपास 100 मीटर अंतरावर देविदास बर्वे यांचे घर आहे. घराच्या सभोवताली बागायत आहे. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रवण बर्वे हा सोमवारी रात्री एकटाच घरामध्ये होता. त्याचे वडील, आई व भाऊ हे होंडा-नारायणनगर येथील घरामध्ये राहायला गेले होते. काल सकाळी त्याचे वडील नगरगाव या ठिकाणी परतल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती वाळपई पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर, तपास अधिकारी सनिशा नाईक व इतर पोलीस कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्या दरम्यान त्यांना अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. श्रवणच्या वडिलांनी नोंदवलेल्या तक्रारीत खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलीस खात्याने फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. दुपारी 2 च्या सुमारास सदर पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली व महत्त्वाचे पुरावे व नमुने गोळा केले. श्रवणचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉमध्ये पाठविण्यात आला. शवचिकित्सेनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी देखील घातपाताचा संशय व्यक्त केला आहे; मात्र मात्र जोपर्यंत शवचिकित्सा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत सदर घटना हा खून की आत्महत्या हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खुनाचा संशय बळावला
घराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारीच श्रवणचा मृतदेह पडलेला होता. त्याच्या गळ्याभोवती दोरी होती. हाताला व मानेला दुखापत असल्यामुळे खुनाचा संशय बळावला आहे. तसेच घराचा दरवाजा उघडा होता, तर त्याचा मोबाईल घरामध्ये होता, अशी माहिती समोर आली आहे.
श्रवण रात्री 11 वाजेपर्यंत होता मित्रांसोबत
मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण बर्वे हा 11 वाजेपर्यंत हनुमान मंदिरानजीक आपल्या मित्रांसमवेत होता. त्यावेळी त्यांच्यात गप्पाही रंगल्या होत्या. त्यांनी आयपीएलचा सामना पाहिला व त्यानंतर ते सर्व घरी गेले. यानंतर सकाळी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. त्यामुळे मित्रांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याच्या मृत्यू मागे घातपात असण्याची शक्यता मित्रांनी सुद्धा व्यक्त केली आहे.