घंटा

0
29

(क्षणचित्रं… कणचित्रं…)

  • प्रा. रमेश सप्रे

आपल्या वाढदिवसाला त्या छोट्या मुलानं पॉकेटमनीतून एक घंटा आणली आणि वडिलांना म्हणाला, ‘ही माझ्या वाढदिवसाची भेट तुमच्यासाठी. तुम्ही म्हातारे व्हाल आजोबांसारखे तेव्हा हीच घंटा मी तुम्हाला बक्षीस देईन.’

‘बाबा, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? हू विल बेल द कॅट? याचा अर्थ काय हो?’ देवूचे असले प्रश्न बाबांना नेहमी आवडत असत. ते वाटच पाहायचे अशा प्रश्नांची. ‘त्याच्यामागे एक गोष्ट आहे देवू…’ गोष्ट म्हटल्यावर सर्वांनी कान टवकारले. अनू, बिंदू, सरू सारी बाबांभोवती जमा झाली. बाबांनी गोष्ट सुरू केली- त्याचं असं झालं, एका घरात सव्वाशे उंदीर होते. जुनं मातीचं घर. जिकडे-तिकडे बिळंच बिळं. एक बुजवावं तर दोन तयार! शेवटी घरातील सर्वांनी एक मांजर आणलं. बोका होता तो. सारे उंदीर स्वयंपाकघरात किंवा कोठीच्या खोलीत जमले की अचानक यायचा नि प्रत्येक वेळी एक उंदीर मटकवायचाच. शेवटी ज्येष्ठ उंदरांनी एक शक्कल (युक्ती) सुचवली. बोक्याच्या गळ्यात घंटा बांधायची म्हणजे तो येताना दुरूनच कळेल नि आपण आपापल्या बिळात लपून राहू. सर्वांना ती कल्पना खूपच आवडली. अडचण एकच होती- बोक्याच्या गळ्यात कुणी बांधायची? कारण घंटा बांधणारा जिवंतच उरणार नाही. असो.

  • एरव्ही घंटा म्हटली की मंदिर-चर्च-देवघर अशा पवित्र जागा आठवतात. इतकंच नव्हे तर तेथील घंटानादही ऐकू येतो. प्रत्येक ठिकाणच्या घंटेचा ध्वनी वेगळा असतो. भीमरूपी महारुद्रा स्तोत्र आवडतो ना? त्यातल्या ‘घंटा किंकिणी नागरा’ यातील घंटांचा ‘किणकिण’ असा मंजूळ ध्वनी आठवतो. एखाद्याच्या मानसपूजेत ‘क्षुद्र घंटा वाजती कटी। दशांगुळी मुद्रिकांची दाटी। बाहुभूषणे शोभती मनगटी। ऐसा भगवान देखिला॥’ हा अनुभवही त्याला प्रत्यक्ष जाणवतो. अशाच ‘क्षुद्र’ सानुल्या, सुंदर घंटा बाळकृष्णाच्या कमरेवरील करगोट्यात तसेच गोपींच्या कटीवरील मेखलात (कंबरपट्टा) आणि गवळणींच्या पैंजणातही ऐकू येतो.
  • चर्चमधील घंटानादांना विशिष्ट काळाची अशी भाषा असते. सकाळच्या प्रार्थनेसाठी भक्तांना बोलावताना, दुपारी मृतात्म्यांना शांती लाभावी (रेस्ट इन पीस) म्हणून होणारा घंटानाद, ख्रिसमस-ईस्टरचा आनंदी घंटानाद तर ‘गुड फ्रायडे’च्या दिवशी होणारा धीरगंभीर घंटानाद ज्यावेळी आसमंतात पंख पसरून उडणाऱ्या पक्ष्यासारखा फैलावत जातो, तेव्हा मार्गातील प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून जातो.
  • मंदिरातल्या घणघण घंटाध्वनीलाही त्याची स्वतःची अशी सांकेतिक भाषा (कोड लँग्वेज) असते. आरती संपून ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ सुरू झालं की वेगवान लय बदलून एकदम संथ टोले वाजू लागतात. मुलांनाही कळतं प्रसादाची वेळ जवळ आलीय. खेळ, आरडाओरडा थांबवून ती मंदिरात जमा होतात.
  • दुपारची वेळ. एका मुलानं हट्टानं मागून घेतलेली नि मामानं कौतुकानं दिलेली एअरगन. आज किमान अर्धा डझन पक्षी तरी एअरगननं मारायचे असा बेत मनात करून छोटा अल्बर्ट झाडांकडे निघाला. पाखरे उडतही होती नि फांद्यांवर विसावलेलीही होती. नेम धरून बंदुकीचा चाफ ओढून अल्बर्ट निशाणा साधण्याच्या अगदी बेतात असताना शेजारच्या चर्चची घंटा वाजू लागली. अँजेलसची दुपारी मृतात्म्यांच्या शांतीसाठी वाजणारी संथ-शांत घंटा. छोट्या अल्बर्टच्या निरागस मनात एकदम विचार चमकून गेला. ‘ओ गॉड, मी या पक्ष्याला मारण्यापूर्वीच त्याच्या मरणोत्तर शांतीसाठी घंटा वाजू लागली. म्हणजे देवाला आधीच कळले तर! बरं झालं मी चाप पूर्ण ओढून सोडला नाही.’ अल्बर्टला वाईटही वाटलं नि आपल्या हातून हिंसेचं पाप होण्याचं टळलं म्हणून बरंही वाटलं. घरी येऊन त्याने ती बंदूक मामाला परत दिली नि आयुष्यभर जीव घेण्याऐवजी जीव वाचवण्याची प्रतिज्ञाही केली. पुढे हाच बालक डॉ. अल्बर्ट श्वायत्झर म्हणून प्रसिद्ध झाला. ज्यांना वैद्यकीय सेवाशुश्रूषेची अत्यंत आवड होती अशा आफ्रिकेसारख्या काळ्या खंडात जाऊन त्यानं आजीवन सेवा केली. ज्याबद्दल त्याला नोबेल पारितोषिक दिलं गेलं.
  • 11 सप्टेंबर 1893. फक्त वीस वर्षांच्या युवकाने घनगर्जनेसारख्या धीरगंभीर आवाजात आपल्या अत्यंत छोट्या पण इतिहास घडवणाऱ्या भाषणाचा शेवट अतिशय प्रभावी प्रार्थनेनं केला. ‘या सर्वधर्मपरिषदेचे उद्घाटन करताना जो चर्चबेलचा दीर्घ घंटानाद झाला तो माझाच प्रेषित… माझाच धर्म… माझाच पवित्र ग्रंथ, माझंच प्रार्थनास्थळ नि पद्धती जगात एकमेव सर्वश्रेष्ठ आहे’ या संकुचित भावनेचा अंत दर्शवणाऱ्या डेथनेलचा (केएनइएलएल नेल) घंटानाद ठरो. …सांगायला नकोच, हा युवक होता भावी काळाचा लढवय्या संन्यासी (फायटिंग मंक्‌‍)- स्वामी विवेकानंद. घंटानाद एकच पण संदेश परस्परविरुद्ध! असो.
  • अनेक शतकांपूर्वी अशीच एक घंटा टांगली होती. इंद्रप्रस्थ या राजधानीतील राजवाड्यासमोर स्वतःवर अन्याय झाला किंवा आपल्याला आलेला काहीतरी अद्भुत अनुभव सर्वांना कळवावा यासाठी ती घंटा कुणीही, केव्हाही वाजवू शके. एकदा मध्यरात्री घंटा वाजवल्यावर बाहेर आलेल्या पांडवांचा राजा युधिष्ठिरला एका भिक्षूनं अन्याय निवेदन केला. ‘चोरांनी सर्व गायी चोरून नेल्यामुळे आपलं कुटुंब उपासमारीनं मरेल.’ यावर युधिष्ठिरानं दुसऱ्या दिवशी सकाळी भीम-अर्जुनाला पाठवून त्याच्या गायी आणून देण्याचं वचन दिलं. तो भिक्षुक आश्वस्त होऊन निघून गेला. पण भीम अस्वस्थ झाला. थोड्या वेळानं त्यानं ती घंटा घणाघणा वाजवली. परत बाहेर आलेल्या युधिष्ठिरानं काय झालं विचारताच भीम म्हणाला, ‘एक अद्भुत गोष्ट तुझ्या तोंडून ऐकली, ती सर्वांना कळावी म्हणून घंटा वाजवली. तुला कसं कळलं की उद्या सकाळपर्यंत अर्जुन-मी जिवंत असणार आहोत नि तो भिक्षूक नि त्याच्या गायी जिवंत असणार आहेत?’ युधिष्ठिराला ते बोलणं पटलं नि त्यानं भीमार्जुनांना आदेश दिला, ‘आत्ता या क्षणी जा नि त्या गायी सोडवून भिक्षुकाला परत करा.’ त्याप्रमाणे घडलेदेखील.
  • शेवटी एक मार्मिक कथा- आपल्या वृद्ध आई-वडिलांना मागच्या अंधाऱ्या खोलीत ठेवून त्यांना एक घंटा दिली. बाहेर यायचं नाही, फक्त घंटा वाजवायची. हे त्या आई-बाबांना जरी योग्य वाटलं तरी नातवाला हे आवडायचं नाही. आपल्या वाढदिवसाला त्यानं पॉकेटमनीतून एक घंटा आणली आणि म्हणाला, ‘ही माझ्या वाढदिवसाची भेट तुमच्यासाठी. तुम्ही म्हातारे व्हाल आजोबांसारखे तेव्हा हीच घंटा मी तुम्हाला बक्षीस देईन. आपली चूक कळून त्यांनी आजोबांना बाहेर आणले.