गोव्यात ७ कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांचा प्रवेश

0
165

>> परप्रांतीय सातही जणांचे प्राथमिक रॅपिड चाचणी अहवाल पॉजिटिव्ह

देशपातळीवर कोरोना विषाणूच्याबाबतीत हरित विभागात असलेल्या गोवा राज्यात कोरोना विषाणूचे ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने काल खळबळ उडाली आहे. सातही जणांचा रॅपिड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या सातही जणांच्या चाचणीचा दुसरा अहवाल प्रतीक्षेत आहे.

बेतोडा-फोंडा येथील एका कंपनीमध्ये गुजरातमधून सामान घेऊन आलेल्या ट्रक चालकाची रॅपिड कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या चालकाला अस्वस्थ वाटू लागल्याने उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्याच्या लाळेचे नमुने बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने सरकारी यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय बनली आहे. सरकारी यंत्रणेने सदर ट्रक चालकाची सविस्तर माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. त्याच्या सहवासात आलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

शेजारील महाराष्ट्रातील कोल्हापूर भागातून वाहनाने गोव्यात येणार्‍या एका कुटुंबातील पाच व्यक्ती आणि गाडीचा चालक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे रॅपिड टेस्टमध्ये आढळून आले आहे. त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी बांबोळी येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

बेतोडा येथील आलेल्या ट्रक चालकाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

त्याच्या सहवासात आलेल्या सहा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली. कोरोना रुग्ण आढळून आल्याने सरकारी यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. राज्यात ३ एप्रिलनंतर कोरोना विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण आढळून आला नव्हता. त्यामुळे केंद्र सरकारकडून केलेल्या वर्गीकरणामध्ये गोव्याचा हरित विभागात समावेश करण्यात आला होता.

राज्यात यापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झालेले सात रुग्ण आढळून आले आहेत. सर्व रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आता कोरोनाबाधित आणखी ७ नवीन रुग्ण आढळून आल्याने लॉकडाऊन पुन्हा कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन ७ कोरोनाबाधित रुग्ण परराज्यातील आहेत. लॉकडाऊन ३ मध्ये शिथिलता मिळाल्यानंतर बाजारपेठ, उद्योग क्षेत्रात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. परराज्यातील लोक गोव्यात प्रवेश करू लागले आहेत. परराज्यातून आत्तापर्यंत तीन हजारापेक्षा जास्त जणांना प्रवेश देण्यात आला आहे.

रॅपिड चाचणी प्राथमिक
अहवाल पॉजिटिव्ह ः विश्‍वजित
दरम्यान, आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी यासंदर्भात ट्विटरवरून सांगितले आहे की फोंडा इस्पितळातील रॅपिड चाचणीत ७ जणांचा प्राथमिक कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. या चाचण्यांचा अहवाल गोमेकॉतील प्रयोगशाळेत पाठविला असून अहवालाची प्रतीक्षा आहे.