गोव्यातील गणेश चतुर्थी

0
164
  • शरत्चंद्र देशप्रभू

भौतिक विकासामुळे सांस्कृतिक ढाचा कमकुवत होतो, तर वैज्ञानिक दृष्टीने तर्कसंगत दृष्टिकोन जोपासला जातो. याचे सुप्त परिणाम पारंपरिकपणे रुजवलेल्या भक्तिभावावर होणे साहजिकच. यातून श्रद्धेला ओहोटी लागते. संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व घडवण्यात आपल्या प्राचीन वाङ्मय, संत वाङ्मय तसेच सणा-उत्सवांनी फार मोठे योगदान दिले आहे. यामुळे आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे आलेल्या आक्रमक व्यावसायिकतेला सकारात्मक आकार व दिशा द्यायला पारंपरिक सणा-उत्सवांची, श्लोक, आरती यांची अल्पकाळासाठी का होईना नितांत आवश्यकता आहे.

बदलता काळ, संदर्भ अन्‌‍ बदल हे समीकरण अतूटच. कालौघात बाह्य व आंतरिक बदल होणारच. या बदलांचे परिणाम जीवनाच्या विविध अंगांवर, विविध टप्प्यांवर तसेच शैलीवर सुप्तपणे, सातत्याने कळत-नकळत उमटणार. याचे थेट परिणाम पारंपरिक उत्सवांवर होणे साहजिकच आहे. जीवनाच्या या वाटचालीत काही छोट्या-मोठ्या उत्सवांचे अस्तित्व सांकेतिक स्वरूपाचे झाले आहे. गणेश चतुर्थी हा एकमेव सण आजच्या जीवनाच्या धबडग्यात तग धरून आहे. परंतु यात पण आलेले स्थित्यंतर, दृष्टिकोनातला फरक- संक्रमणाचाच थेट प्रभाव असल्याचे ठळकपणे जाणवते.

धुवाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर कमी झालेला असतो. धरित्रीवर हिरवागार गालिचा पसरलेला असतो अन्‌‍ गोव्यात उत्सवाच्या राजाचे- ‘चवथी’चे- वेध लागलेले असत. नागपंचमीनंतर चवथीच्या वातावरणाची निर्मिती होत असे. गोकुळाष्टमीनंतर तर ‘चवथ’ दारातच आल्याचे संकेत प्रत्येकाच्या देहबोलीतून व्यक्त होत असत. गोकुळाष्टमी ते गणेश चतुर्थीचा काळ म्हणजे पूर्वतयारीचा भुर्रकन उडून जाणारा. तुलनात्मकरीत्या संथ जीवनशैली असूनसुद्धा!
त्याकाळी गणेश चतुर्थीची पूर्वतयारी मन लावून केली जात असे. शेतकरी, कष्टकरीवर्ग तर हा कृषिसंस्कृतीतून उगम झालेला उत्सव अमाप उत्साहाने साजरा करत. पैशांचे पाठबळ नसताना समया, निरांजने, तबके चिंचेने घासून-पुसून लख्ख करत. माटोळीला लागणाऱ्या साहित्यासाठी राने पालथी घातली जात. कुटुंबातील सारेच सदस्य तन्मयतेने, निष्ठेने पूर्वतयारीच्या कार्यात पूर्णपणे समरस होत. जमेल तसा खर्चाचा मेळ बसवून घराची अत्यावश्यक तेवढी डागडुजी केली जात असे. विशेषकरून गणपती विराजमान करण्याची जागा सुरक्षित ठेवण्याकडे कल असे. विघ्नहर्त्याच्या उत्सवात विघ्न नसो ही आंतरिक भावना.

भव्य वाड्या-घरातल्या गणपती उत्सवानिमित्त माणसांचा राबता असला तर अडचण नसे. परंतु वाडा किंवा मोठमोठी चौकीची घरे अन्‌‍ सारी माणसे नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी स्थायिक असली तर पंचाईतच! गळते छत, पावसाच्या पाण्यात फुगलेल्या भिंती, टवके-पोपडे असलेल्या, शेणाचा स्पर्श न झालेल्या जमिनी, कोळिष्टकांनी वेढलेल्या कोंदट खोल्या, विजेची सोय असली तर वेळेवर बिल न भरल्यामुळे खंडित झालेल्या वीज जोडण्या, अपुरे मनुष्यबळ, घरासमोरची वाढलेली झुडपे, निगराणी न राखल्यामुळे घरावर कलंडलेले कल्पतरू. परंतु या साऱ्या समस्यांवर मात करणारी प्रचंड ऊर्जा गणेशभक्तांच्या मनात धगधगत असे. प्रबळ इच्छाशक्ती अन्‌‍ मूळपुरुष किंवा समंधाचा कोप होऊ नये ही आंतरिक इच्छा तसेच परंपरा, रिवाज खंडित न ठेवण्याची मनात पिढ्यान्‌‍पिढ्या रुजलेली भावना. यामुळे गणेश चतुर्थी साजरी करण्याचे शिवधनुष्य मनोबळावर पेलले जात असे. घरात गैरसोय असूनसुद्धा चतुर्थीकाळात दुर्मुखलेल्या चेहऱ्याने कुणी वावरलेला दिसत नसे. पन्नास-साठ वर्षांपूर्वी मुलांचा सोडाच पण वृद्धांचा चतुर्थीचा उत्सव साजरा करण्यात आपल्या कुवतीनुसार का होईना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असे. प्रफुल्लित चेहऱ्यावरच्या विलसत्या समाधानामुळे इतरांना काम करायला हुरूप, बळ मिळत असे. सांघिक वृत्ती अन्‌‍ समावेशी दृष्टिकोन यामुळे गणेश चतुर्थी उत्सवाची पूर्वतयारी, प्रारंभ अन्‌‍ सांगता तणावमुक्त वातावरणात होत असे. काही कारणांमुळे बहुधा वयस्क माणसांची अनुपस्थिती, मुलांच्या परीक्षा, आजारपणं किंवा संभाव्य अडचणी यामुळे काही लोक आपला गणपती आपले वास्तव्य असलेल्या शहरात पुजत. पेडणेकर बहुधा मुंबईत स्थायिक. पेडण्यात त्याकाळी कुणीतरी आपला गणपती मुंबईत पुजला की ती एक ‘ब्रेकिंग न्यूज’ व्हायची. वर्षभर चघळायला विषय.

मागच्या काळात गणपतीचा उत्सव म्हणजे आनंदाचा परमोच्च बिंदू. प्रत्येकाकडे वेळ होता. दिखाऊपणा वा घाई नव्हती. गणपतीची मूर्ती, रंग, भाव, वस्त्रे, बैठक, आसन, मखर यांचे निरीक्षण आत्मीयतेने केले जायचे. मागच्या अन्‌‍ यंदाच्या मूर्तीची चिकित्सक दृष्टीने, आस्वादक वृत्तीने तुलना केली जायची. संध्याकाळी कुठूनतरी एक पेट्रोमॅक्स पैदा केला जायचा. याव्यतिरिक्त समईच्या मंद प्रकाशाने गणपतीच्या मुखावर तेजोवलय झळकल्याचा भास व्हायचा. घरातील गृहिणी भोजन झाल्यावर वाती वळण्यात किंवा गणपतीच्या आसनाभोवती प्रदक्षिणा घालण्यात दंग. अविश्रांत श्रमाच्या खुणा चेहऱ्यावर उमटत नव्हत्या. गणपतीच्या मूर्तीच्या मुखकमलावरचे तेज जणू यांच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झाल्याचे प्रतीत होत असे. शुद्ध भक्तिभाव म्हणजेच श्रमपरिहार असेच त्याकाळी समीकरण जुळत असे. चंद्रोदयापूर्वी जवळचे गणपतिदर्शन हा मुख्य कार्यक्रम असे. मनसोक्त जड जेवणानंतर पण आप्तेष्टांनी आत्मीयतेने दिलेला लाडू, करंज्या, चिवडा, शेवाचा फराळ खावाच लागे. पोटात मावला नाही तरी पण! त्याकाळी चतुर्थी म्हणजे एक आनंदमेळावाच. दीड दिवसाच्या विसर्जनानंतर मुलांची मने मरगळत. वडील मंडळींच्या अल्पजीवी उत्सवामुळे त्यांचा राग यायचा. काही कुटुंबांत पाच दिवस पण गणपती पुजला जात असे. पेडण्यात तर एका सुवर्णाकाराच्या वास्तूत एकवीस दिवसांचा गणपती पुजला जायचा. कालांतराने ही प्रथा त्या घराण्यात खंडित झाली. अपुऱ्या सोयीसुविधांचा अडथळा चतुर्थीच्या निर्भेळ आनंदात डोकावू पण शकत नसे. कारण मनाच्या धारणाच विलक्षण भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या प्रतीत होत असत. आज फ्लॅटसंस्कृती, प्रगत दळणवळणाने चवथीच्या उत्सवातला प्राणच हरवल्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. काही कुटुंबसदस्य चतुर्थीच्या दिवशी येतात व विसर्जनानंतर गाडीने पसार होतात, तर काहीजण आपल्या मूळ घरातल्या गणपतीची धावती भेट घेताना आढळतात. गतिमान जीवनामुळे चतुर्थी उत्सवातला सहभाग प्रतीकात्मक वाटतो. मुले शहरी जीवनात वाढलेली. गावातल्या अपुऱ्या सुविधांनी वेढलेल्या जुन्या वास्तू त्यांना भावत नाहीत. चिडचिडेपणा येतो, गणेश चतुर्थीच्या आनंदावर विरजण पडते.

गोव्यात टीव्ही आल्यावर मुले गणपतीच्या मूर्तीकडे पाठ करून कार्यक्रम किंवा सिनेमा पाहण्यात रमू लागली. हे दृश्य वयस्क लोकांना फारच क्लेशदायी वाटे. परंतु मुले याची परतफेड कीर्तनाची सीडी टाकून करत, जेणेकरून वडीलधाऱ्यांना उत्सवाचे पावित्र्य टिकवण्याचे समाधान लाभत असे. आता भ्रमणध्वनी क्रांती आल्यावर गणेश चतुर्थी उत्सवावर त्याचे बरेवाईट पडसाद पडणे स्वाभाविक. यामुळे दूरगावी स्थायिक झालेल्या अन्‌‍ काही अपरिहार्य कारणामुळे गावी न आलेल्यांना ‘आँखों देखा हाल’ काही क्षणात पाठवायची सोय झाली. यामुळे आभासी पद्धतीने का होईना, कौटुंबिक सोहळ्याचा परिघ व्यापक झाला. आजच्या उत्सवात मुलांत पण अलिप्ततेची भावना जाणवते. एकत्र कुटुंबाच्या विघटनामुळे मुलांची गैरसोय सोसून एकत्र राहण्याची प्रक्रिया पण लुप्त झालेली आहे. आज मुलांची मानसिकता तडजोड करण्याइतपत लवचीक राहिलेली नाही. यामुळे उत्सवात झोकून देणे हे यांच्या कुवतीबाहेर. इंग्रजी माध्यमातून झालेल्या पूर्वप्राथमिक शिक्षणामुळे मुलांचे सांस्कृतिक वारशांशी असलेले नाते कमकुवत झाले आहे. काही शिष्ट पालकांना पण आपल्या पाल्याकडून हीच अपेक्षा असते. यावरून त्यांना आपला सामाजिक दर्जा, आर्थिक दर्जा सांभाळण्याचे समाधान मिळते. भौतिक विकासामुळे सांस्कृतिक ढाचा कमकुवत होतो, तर वैज्ञानिक दृष्टीने तर्कसंगत दृष्टिकोन जोपासला जातो. याचे सुप्त परिणाम पारंपरिकपणे रुजवलेल्या भक्तिभावावर होणे साहजिकच. श्रद्धेला ओहोटी लागते. अंधश्रद्धा ही बालमनाच्या दृष्टीने वाईटच. परंतु संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व घडवण्यात आपले प्राचीन वाङ्मय, संतवाङ्मय तसेच सणा-उत्सवांनी फार मोठे योगदान दिलेले आहे. यामुळे आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे आलेल्या आक्रमक व्यावसायिकतेला सकारात्मक आकार व दिशा द्यायला पारंपरिक सणा-उत्सवांची, श्लोक, आरती यांची अल्पकाळासाठी का होईना नितांत आवश्यकता आहे. गणेशोत्सवात आपण किमान चार वेळा समर्थ रामदासांच्या दोन नावाजलेल्या आरती आळवतो- ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ अन्‌‍ ‘लवथवती विक्राळा.’ कित्येकांना या समर्थरचित आरत्या असल्याची पण माहिती नसते. परंतु या आरतीतील आर्त स्वरूप, आशयघनता अन्‌‍ तालबद्ध अभिव्यक्ती अधोरेखित केली तर आरत्यांतील गोडवा शतपटीने वाढतो. देवतांचे सगुण अन्‌‍ निर्गुण रूप एकाच वेळी प्रक्षेपित करण्याचे समर्थांचे सामर्थ्य जाणवते. मुक्तीनंतर गोव्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होऊ लागले. पणजी येथील पोलीस खात्याचा अकरा दिवसांचा गणेशोत्सव व महालक्ष्मी मंदिरातला नऊ दिवसांचा उत्सव त्याकाळी लोकांनी स्वीकारलेला. म्हापशातील मार्केटमधला सार्वजनिक गणेशोत्सव तर सांस्कृतिक, सांगीतिक कार्यक्रमांसाठी नावाजलेला. कालांतराने गावागावांतून असंख्य सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होऊ लागले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्राधान्य आता देणगी, लॉटऱ्यांना अन्‌‍ त्यातील मूल्यवान बक्षिसांना. येथे पण पारदर्शकतेचा अभाव आढळतो.

काही घराण्यांनी एकत्र येऊन आपल्या मूळ वास्तूचे नूतनीकरण करून गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजनबद्ध उपक्रम राबवायला प्रारंभ केला आहे. हे प्रयत्न सफल पण झाल्याचे दृष्टीस पडत आहे. व्यावसायिक सांघिक नियोजन हे आजच्या घडीला महत्त्वाचे. भक्तिभाव व्यावसायिक आयोजनामुळे निर्माण होऊ शकत नाही, हा परंपरावाद्यांचा दावा. परंतु अशा व्यवस्थापनामुळे कुटुंबसदस्यांवरचा ताण कमी होतो, अन्‌‍ आपोआप ताणविरहित मनात भक्तिभाव झिरपतो अन्‌‍ चतुर्थीचा आनंद उपभोगण्यातले मुख्य अडथळे दूर होतात. गोव्यात याच दृष्टीने वाटचाल सुरू झाल्याचे दिसून येते. काही कुटुंबांमध्ये जिथे तरुणाईच्या मदतीची अपेक्षा नसते तिथे चांदीच्या छोट्या गणेशमूर्तीचे प्रतीकात्मक पूजन अन्‌‍ विसर्जन केले जाते. विसर्जन प्रक्रिया ही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. डोक्यावरून गणपती वाहण्याचे कसब लुप्त होत आहे. पर्याय पण उपलब्ध केले जातात. ज्यांना कुणाचाच आधार नसतो त्यानी दूर्वाच्या गणपतीची पूजा करून कुंडीत विसर्जन करण्याचा अपरिहार्य पर्याय निवडलेला आहे. काही का असेना, गोव्यात अजून तरी गणेशोत्सव आपले अस्तित्व टिकवून आहे.