गोव्याचा समान नागरी कायदा आदर्शवत : राष्ट्रपती

0
21

>> राजभवनातील नागरी स्वागत सोहळ्यात काढले उद्गार; आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर वाहिली आदरांजली

समृद्ध वनक्षेत्र ही गोव्याची अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे आणि तिचे संवर्धन व्हायला हवे. पश्चिम घाटातील घनदाट जंगले हे अनेक वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास आहेत. या नैसर्गिक वारशाचे जतन केल्यास गोव्याच्या शाश्वत विकासाला चालना मिळेल. आदिवासी आणि इतर वनवासींना त्यांच्या परंपरा जपत विकासात भागीदार बनवले पाहिजे. गोव्यातील समान नागरी कायदा एक आदर्श कायदा आहे. या कायद्याच्या माध्यमातून सर्व नागरिकांना समान हक्क प्राप्त होत आहेत. त्यामुळे आधुनिकता आणि परंपरा यांचा समतोल साधत गोवा पुढे जाईल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल व्यक्त केला. दोनापावला येथील राजभवनातील नवीन दरबार सभागृहात आयोजित नागरी स्वागत सोहळ्यात त्या बोलत होत्या.
या सोहळ्याला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची उपस्थिती होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘तुमका सगळ्यांक माय मोगाचो नमस्कार’ अशा शब्दांत कोकणी भाषेतून केला. गोवा मुक्तीसाठी राम मनोहर लोहिया यांनी 18 जूनला क्रांतीची ज्योत पेटविली. त्याला गोमंतकीय स्वातंत्र्यसैनिक आणि जनतेने मोठा प्रतिसाद दिल्याने गोव्याला 1961 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. गोवा मुक्तीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या हुतात्म्यांना आझाद मैदानावर जाऊन आदरांजली वाहण्याची संधी मिळाली, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

यावेळी राष्ट्रपतींनी गोवा सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा या उपक्रमाची प्रशंसा केली. शाश्वत विकास उद्दिष्टांच्या मापदंडांवर गोवा राज्य चांगली कामगिरी करीत आहे. गोवा हे पर्यटनाचे आकर्षण केंद्र असण्यासोबतच शिक्षण, व्यापार, वाणिज्य, उद्योग, तंत्रज्ञान आणि नौदल संरक्षणासाठीही महत्त्वाचे केंद्र आहे. गोव्याच्या कॉस्मोपॉलिटन संस्कृतीला स्त्री-पुरुष समानतेची परंपरा आहे, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर पहिलाच गोवा दौरा आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी त्यांचे गोव्यात आगमन झाले होते. आता, राष्ट्रपदीपदी निवड झाल्यानंतर नागरी सन्मान करण्याची संधी प्राप्त झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रपतींचा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कुणबी शाल, साडी आणि पारंपरिक समई देऊन सन्मान केला. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते वन हक्क कायद्यांतर्गत निवडक लाभार्थ्यांना सनदांचे वाटप करण्यात आले.
तत्पूर्वी, राष्ट्रपतींनी आझाद मैदानाला भेट देऊन हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.


भाषणात मनोहर पर्रीकरांचा उल्लेख
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात माजी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या कार्याचा उल्लेख केला. स्व. मनोहर पर्रीकर यांनी संरक्षणमंत्रिपदी असताना उल्लेखनीय कार्य केले. तसेच, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणूनही भरीव काम केले, असे त्या म्हणाल्या.

आज दीक्षांत सोहळ्यात होणार सहभागी
बुधवार दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोनापावला येथे राजभवनातील दरबार सभागृहात आयोजित गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तसेच, संध्याकाळी 4 वाजता पर्वरी येथील गोवा विधानसभेत आयोजित खास समारंभात लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत.