काल गोवा घटकराज्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. गोव्याबरोबरच आसाम, बिहार, राजस्थान, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांतील राजभवनात गोवा घटकराज्य दिन साजरा करण्यात आला. घटकराज्य दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुमूर्, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या. गोवा हे निसर्ग सौंदर्य, सुंदर समुद्रकिनारे, प्रेमळ लोक व वैविध्यपूर्ण संस्कृती यासाठी प्रसिद्ध आहे. राज्याने विविध क्षेत्रात प्रगती साधलेली असून, येत्या वर्षांत गोवा समृद्ध होत राहो आणि शाश्वत विकासाचे मॉडेल बनो, असेही राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देताना गोवा शांतता आणि चैतन्य उत्कृष्ट नमुना असल्याचे नमूद केले. राहुल गांधींनी गोवा हे निसर्ग, समृद्ध इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती यासाठी ओळखले जात असून, गोवा हे भारतातील एक मौल्यवान असे रत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.