गोमेकॉत दाखल होण्यासाठी यापुढे अँटिजेन चाचणी

0
15

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती

>> जिल्हा इस्पितळातही चाचणी लागू करणार

यापुढे गोेमेकॉ व जिल्हा इस्पितळांत दाखल होण्यासाठी अँटिजेन चाचणी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाला आकस्मिक भेट देऊन तेथील एकूण परिस्थितीचा ‘आँखो देखा हाल’ पाहिल्यानंतर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी बुधवारी समाजमाध्यमावरुन आपले म्हणणे मांडले. यावेळी त्यांनी, सरकारी इस्पितळात रुग्णांना फरशीवर झोपवले जाणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना सरकारी डॉक्टर व इतरांना केली. तसेच गोमेकॉसह जिल्हा इस्पितळे व आरोग्य केंद्रे यासंबंधी जनतेच्या जर काही तक्रारी असतील तर त्या आपणाला थेट ईमेलद्वारे अथवा अन्य माध्यमाद्वारे कळवाव्यात, असे आवाहन जनतेला केले.

सगळी सरकारी इस्पितळे ही जनतेच्या सेवेसाठी असून तेथे दाखल होणार्‍या रुग्णांची गैरसोय होऊ नये अथवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, अशी सूचनाही राणे यांनी या व्हिडिओद्वारे केली.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळावर त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांचा बोजा पडणार नाही याकडे आपण खास लक्ष देणार असून तसेच दक्षिण जिल्हा इस्पितळात दाखल होणार्‍या रुग्णांना तेथे उपचार न देता गरज नसताना गोमेकॉत पाठवले जाऊ नये अशी सूचना आपण दिलेली आहे. दोन्ही इस्पितळांबरोबरच फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ तसेच ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांतही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. गरज नसताना रुग्णांना उपचारासाठी गोमेकॉत पाठवणार्‍या जिल्हा इस्पितळातील तसेच आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारी इस्पितळात दाखल होणार्‍या रुग्णांची हेळसांड होऊ नये व त्यांना चांगली सेवा व उपचार मिळावेत याकडे लक्ष देण्यात येत आहे असे राणे यांनी म्हटले.

सुपर स्पेशालिटीत
७० रुग्णांना हलवले

मंगळवारी रात्री गोमेकॉतील सुमारे ७० रुग्णांना गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी विभागात हलवण्यात आल्याची माहितीही राणे यांनी दिली. गोमेकॉत आता कर्करोगासाठीचे इस्पितळ उभारण्याचे काम सुरू झाले असल्याचे सांगून केंद्र सरकारने त्यासाठी २७० कोटी रु. मंजूर केले असल्याची माहितीही राणे यांनी दिली. सध्या सुरू झालेल्या सुपर स्पेशालिटी विभागात लवकरच गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग सुरु करण्यात येणार असून सनद भाटकर हे डॉक्टर या विभागाचे प्रमुख असतील अशी माहितीही आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.

सर्वांनी बूस्टर डोस घेण्याचे आवाहन

१८ ते ५९ या वयोगटातील सर्व लोकांना कोविडवरील बुस्टर डोस देण्यासाठीची सगळी तयारी आरोग्य खात्याने केलेली आहे. बुस्टर डोस देण्यासाठीची सगळी व्यवस्था गोमेकॉ तसेच अन्य इस्पितळे व आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने हा डोस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी समाज माध्यमावरुन केले. बुस्टर डोस सुरक्षित असून लोकांनी न घाबरता व मनात कोणतीही शंका येऊ न देता तो घ्यावा, असे राणे यांनी स्पष्ट केले आहे.
कोविड विषाणूचे नवे नवे उत्परिवर्तीत प्रकार भविष्यात येऊ शकतात. त्यामुळे कोविडवरील बुस्टर डोस घेणे हे सर्वांच्याच सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने आता बुस्टर डोस मोफत उपलब्ध करुन दिलेला असून लोकांनी हा डोस घेण्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही राणे यांनी केले आहे.