गुरूवारपर्यंत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस

0
9

हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

आज मुसळधार ते अतिमुसळधारेची शक्यता

आज सोमवार 26 पासून गुरुवार दि. 29 जूनपर्यंत राज्यात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
आज 26 रोजी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

आज 26 रोजी राज्यात नारंगी रंगाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या 27, 28 व 29 रोजी पिवळ्या रंगाचा इशारा देण्यात आला आहे. 25 ते 29 या दरम्यान गोवा व महाराष्ट्रातील किनारपट्टीवर वादळी लाटा उठणार असून जोरदार वारे वाहणार आहेत. त्यामुळे वरील काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

काल रविवारी 25 रोजी काणकोण, साखळी, सांगे व अन्य भागांत जोरदार पाऊस कोसळला.
आज 26 व उद्या 27 रोजी 24 तासांत काही भागांत जोरदार म्हणजेच 64.4 मी. मी. एवढा पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

वास्कोत पावसाचा जोर कायम

पावसाने जोर धरला. पहाटे 6 ते 10 वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. सकाळी पडलेल्या या पावसाच्या तडाख्यात तीन ठिकाणी झाडे कोसळून पडली. वास्कोत स्वतंत्रपथ मार्गावर जीर्ण झालेले अशोक वृक्ष मुळापासून उन्मळून पडला. सदर झाड वीज तारांवर पडल्याने वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. तसेच सुमारे तीन तास वीजपुरवठा खंडित झाला. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वीजपुरवठा सुरळीत केला. दुसऱ्या एका घटनेत सासमोळे बायणा येथे एका घरावर झाड कोसळून घराचे नुकसान झाले. तर चिखली येथे विद्यानगर येथे रस्यावर झाड कोसळले. तसेच माटवे दाबोळी येथे डोंगराळ भागाची माती कोसळण्याची घटना घडली. दुपारी 11 नंतर पावसाचा जोर ओसरला व पावसाने विश्रांती घेतली. नंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. वास्को अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन सदर अडथळे दूर केले.

म्हापशात तीन वाहनांवर संरक्षण भिंत कोसळली

9 लाख रुपयांचे नुकसान

म्हापसा येथील एकतानगर हाऊसिंग बोर्ड येथील ब्रागांझा इमारतीची संरक्षण भिंत कोसळली. यामुळे 2 कार व 1 दुचाकी व इतर मिळून सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची वाहनचालकांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक आशीर्वाद ऊर्फ परेश खोर्जुवेकर यांनी पालिका कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वाहने बाजूला काढली.

या घटनेत सुधीर पाटील यांची अल्टो कारचे (जीए 06 ई 4021) 1 लाख 50 हजार, प्रणिता नाईक यांच्या कारचे (जीए 06 एफ 2086) सुमारे 6 लाख, तर अकबर नदाफ यांच्या यामाहा दुचाकीचे (जीए 03 ई 6443) 1 लाखाचे नुकसान तसेच संरक्षण भिंतीचे मिळून सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना घडल्याची माहिती म्हापसा पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. ही वाहने फक्त उभी करून ठेवली होती. त्यामुळे या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

शनिवारी संध्याकाळी उशिरा खोर्ली येथे एक संरक्षण भिंत दुचाकीवर कोसळून वाहन चालकाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे जागोजागी झाडे रस्त्यावर पडून काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती म्हापसा अग्निशामक दलाने दिली.