गुजरात कोण जिंकणार?

0
38

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत आज पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. १९ जिल्ह्यांतील ८९ जागांसाठी जवळजवळ दोन कोटी चाळीस लाख मतदार आज तेथे मतदान करतील. गेली २७ वर्षे भारतीय जनता पक्षाने गुजरातचा आपला गड कायम राखला आहे. म्हणजे १९९५ पासून तेथे भाजप सतत सत्तेवर आहे. त्यातील तीन कार्यकाळ तर नरेंद्र मोदींचे होते. आज पंतप्रधानपदी आणि गृहमंत्रीपदी मोदी आणि शहा विराजमान आहेत. त्यामुळे गुजरात संपूर्णतः त्यांच्या पाठीशी उभा आहे, त्यामुळे यावेळची निवडणूक ही एकतर्फी असल्याचा आत्मविश्‍वास भाजपा नेते व्यक्त करताना दिसत आहेत. खरे तर यावेळची निवडणूक ही आम आदमी पक्ष मोठ्या तयारीनिशी निवडणूक रिंगणात उतरल्याने तिरंगी आहे, परंतु ‘आप’ ला गुजरातमध्ये खातेही खोलता येणार नाही असे भाजपाला वाटते, तर कॉंग्रेस पक्ष २०१७ च्या तुलनेत अधिक कमकुवत झालेला असल्याने भाजपाला यावेळीही राज्यात पर्याय नसेल, असा विश्‍वासही भाजप नेत्यांना आहे. मात्र, भाजपला गुजरातमध्ये यावेळी बंडखोरीची बरीच झळ बसली. त्याचा निवडणुकीवर कितपत परिणाम होतो हेही पाहावे लागेल.
२०१७ च्या निवडणुकीत भाजपला गुजरातमध्ये केवळ ९९ जागांवर समाधान मानावे लागले होते व कॉंग्रेसने ७७ पर्यंत मजल मारली होती. कॉंग्रेसची ती प्रगती तेव्हा आश्‍चर्यचकित करणारी होती. अर्थात, तेव्हा गुजरातमधील भाजप सरकारविरुद्ध विविध जातीय आरक्षणाच्या चळवळींनी उचल खाल्ली होती. विशेषतः पटिदारांचे आंदोलन जोमात होते. ठाकूर समाजही रस्त्यावर उतरला होता. परंतु या दोन्ही चळवळी आज पूर्ण थंडावल्या आहेत. इतकेच नव्हे, तर एकेकाळी गुजरातमध्ये आपल्या आंदोलनातून प्रचंड वादळ उठविणारे पटिदारांचे नेते हार्दिक पटेल आणि ठाकूरांचे नेते अल्पेश ठाकूर हे दोघेही भाजपात आहेत. गेल्यावेळी कॉंग्रेसने आपली परिस्थिती सुधारली होती खरी, परंतु त्यातील पंधरा आमदार भाजपात गेले आहेत. कॉंग्रेसचे भावी नेते म्हणून ज्यांच्याकडे आशेने पाहिले जाते, ते राहुल गांधी निवडणुकांत पक्षाला सावरायचे सोडून ‘भारत जोडो’ यात्रेत दंग आहेत. अशोक गहलोत आणि मल्लिकार्जुन खडगे यांनी कितीही किल्ला लढवला, तरी मोदी – शहांच्या झंझावातापुढे त्यांचा निभाव लागण्यासारखी परिस्थिती नाही. परिणामी, भारतीय जनता पक्ष गुजरातची सलग सातवी निवडणूक दोन तृतियांश बहुमताने जिंकून इतिहास घडवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
आम आदमी पक्षाने यावेळी कॉंग्रेसची जागा घेत गुजरातमध्ये जोरदार प्रचाराचा धडाका लावला. गेल्या जुलैपासून अरविंद केजरीवालांनी गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे. पंजाबप्रमाणेच गुजरातमध्येही सत्ता आपल्या हाती येईल असा विश्‍वास ते व्यक्त करीत आहेत, त्यासाठी गुजराती जनतेवर दिल्ली आणि पंजाब मॉडेलची उदाहरणे ठसवण्यासाठी धडपडत आहेत. गोव्याप्रमाणेच गुजरातमध्येही ‘आप’ने इसुदान गढवीसारख्या लोकप्रिय न्यूज अँकरला आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून टाकले आहे. परंतु गुजराती जनता आम आदमी पक्षाला स्वीकारणार का याबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह आहे. पंजाबात ‘आप’ला बाजी मारता आली, कारण तेथे त्यांचा सामना भाजपशी नव्हता; गुजरातमध्ये गाठ भाजपशी आहे, अशी दर्पोक्ती भाजप नेते करीत आहेत. पण ‘आप’ ने १८२ पैकी १८१ जागांवर उमेदवार उभे केले आहेत, त्याचा निकालावर काही परिणाम होतो का हे पहावे लागेल.
गुजरातच्या जनतेच्या मनात काय आहे याचा थांगपत्ता लावण्यासाठी तर्‍हेतर्‍हेची सर्वेक्षणे केली गेली आहेत. वेगवेगळ्या मापदंडांवरून आकडेवारीचे विश्‍लेषण केले गेले आहे. एक गोष्ट खरी आहे की गेल्या काही निवडणुकांमध्ये गुजरातमध्ये भाजपच्या जागा सातत्याने घटत आहेत. परंतु २०१७ च्या निवडणुकीतील भाजपची मतांची टक्केवारी ४९.०५ टक्के होती. कॉंग्रेसला त्या निवडणुकीत ४२.९७ टक्के मते मिळाली होती खरी, परंतु कॉंग्रेसचा तो जोश आज दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यातच राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सरदार सरोवर प्रकल्पाला चाळीस वर्षे रखडवणार्‍या मेधा पाटकर होत्या, यासारख्या गोष्टींवर नेमके बोट ठेवत पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसला आधीच बॅकफूटवर ढकलले आहे. भाजपने स्थानिक प्रश्‍नांबरोबरच दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आदी विषय प्रचारादरम्यान लावून धरले आहेत. निवडणूक जाहीरनाम्यात ‘अँटी रॅडिकलायझेशन सेल’ उभारण्याची घोषणाही यावेळी आहे. भाजपा निम्म्याहून अधिक मते घेऊन बाजी मारील असा विश्‍वास पक्ष व्यक्त करताना दिसतो आहे. हा आत्मविश्‍वास प्रत्यक्षात उतरतो की हवेत विरतो ते पाहूच.