गिल, सिराजने कमावले; किशन, सूर्याने गमावले

0
18
  • धीरज म्हांबरे

भारतावर तिसऱ्या सामन्यासाठी दडपण नव्हते; किवी संघाची प्रतिष्ठा मात्र या पराभवामुळे पणाला लागली होती. या सामन्यातील पराभवामुळे त्यांना वनडे क्रिकेटमधील अव्वल स्थानाचा ताज इंग्लंडला द्यावा लागला. इंग्लंड संघाचा आनंददेखील फार दिवस टिकला नाही. टी-ट्वेंटी क्रमवारीत अव्वल असलेल्या भारताने किवींना तिसऱ्या वनडेत गारद करून हा ताज आपल्या नावावर केला. भारताच्या किवींवरील मालिका विजयातून संघातील अनेकांनी खूप काही कमावले तर अनेकांनी गमावलेदेखील!

टीम इंडियाने सांघिक कामगिरीच्या बळावर एकदिवसीय क्रमवारीत प्रथम न्यूझीलंडला लोळवून मायदेशातील वनडे क्रिकेटमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. क्रमवारीत प्रथम असलेल्या संघावर व्हाईटवॉशची नामुष्की ओढवण्याची कदाचित वनडे क्रिकेटमधील ही पहिलीच वेळ असेल. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर नजर ठेवूनच पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. पाकिस्तानने मात्र त्यांची घोर निराशा केली. कराची मैदानावर मालिकेतील तिन्ही सामने ठेवल्याने किवी संघाची गोची झाली. एकाच वातावरणात, हमरस्त्यासारख्या पाटा खेळपट्ट्यांवर त्यांना नाईलाजास्तव मालिकेतील तिन्ही सामने खेळावे लागले. या मालिकेत त्यांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, या सामन्यामुळे त्यांचा उर्वरित दोन्ही सामन्यांसाठी चांगला सराव झाला. त्यांनी यजमान पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर लोळवून भारताला सावधानतेचा इशारा दिला होता. परंतु, भारत दौऱ्यावर त्यांची डाळ शिजली नाही.
मालिकेतील शेवटचे दोन्ही सामने जिंकून त्यांनी मालिका आपल्या नावे केली खरी; परंतु भारत दौऱ्यासाठीची त्यांची तयारी मात्र अपुरी राहिली. याची जबर किंमत त्यांना व्हाईटवॉशच्या रूपात चुकवावी लागली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताकडून निसटता पराभव झाल्यानंतर किवी संघाने पाकिस्तान दौऱ्यातील कामगिरी करण्याची तयारी केली होती, पण रायपूर शहीद वीर नारायण सिंग मैदानावर गोलंदाजीस पोषक खेळपट्टीने त्यांच्यातील हवाच काढून टाकली. आपल्या पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात या स्टेडियमने किवींना जमिनीवर आणले. 5 बाद 15 अशा नाजूक स्थितीतून किवींनी या सामन्यात कशीबशी शंभरी ओलांडली. जवळपास तीस षटके राखून भारताने हा सामना खिशात टाकला. खेळपट्टीच्या अनपेक्षित रूपाने पाहुण्यांसह यजमानांनादेखील अचंबित केले. या सामन्यातील विजयासह मालिका खिशात घातलेली असल्याने भारतावर तिसऱ्या सामन्यासाठी दडपण नव्हते. किवी संघाची प्रतिष्ठा मात्र या पराभवामुळे पणाला लागली होती. या सामन्यातील पराभवामुळे त्यांना वनडे क्रिकेटमधील अव्वल स्थानाचा ताज इंग्लंडला द्यावा लागला. इंग्लंड संघाचा आनंददेखील फार दिवस टिकला नाही. टी-ट्वेंटी क्रमवारीत अव्वल असलेल्या भारताने किवींना तिसऱ्या वनडेत गारद करून हा ताज आपल्या नावावर केला.
भारताच्या किवींवरील मालिका विजयातून संघातील अनेकांनी खूप काही कमावले तर अनेकांनी गमावलेदेखील. बांगलादेशमधील द्विशतकवीर ईशान किशनला मधल्या फळीत ढकलत रोहित शर्माने स्वतःसह शुभमन गिलला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली. गिलने या संधीचे सोने करताना धावांची लयलूट केली. दुसरीकडे किशनला मात्र मधल्या फळीत खेळणे भावले नाही. शुभमनने ज्या मालिकेत 360 धावांचा रतीब घातला, त्याच मालिकेत किशनला 30 धावांवर समाधान मानावे लागले. संघातील नियमित सदस्य व यष्टिरक्षक फलंदाज के. एल. राहुलने लग्नासाठी सुटी घेतल्यामुळे, संघातील रिक्त जागेवर किशनला संधी मिळाली होती, हे या ठिकाणी ध्यानात घेतले पाहिजे. सूर्यकुमार यादवची हीच गत झाली. श्रेयस अय्यर पाठदुखीमुळे त्रस्त असल्याने सूर्याला वनडेत खेळण्याचा मौका मिळाला खरा; परंतु 3 सामन्यांत त्याने केवळ 45 धावांचे योगदान दिल्याने हा मौका दवडला. टी-ट्वेंटीमध्ये जरी सूर्याने अय्यरला बाहेर बसवून चौथे स्थान आपले बनवले असले तरी वनडेत मात्र सध्यातरी श्रेयसच्या स्थानाला सूर्याकडून धोका नाही. गोलंदाजी विभागात महंमद सिराजच्या रूपात भरवशाचा गोलंदाज मिळाला. बुमराहच्या छायेत दीर्घकाळ घालवल्यानंतर सिराजने नव्या चेंडूचा पुरेपूर वापर करीत मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांत आपल्या प्रदर्शनाने टीकाकारांची तोंडे बंद केली. बुमराह असताना सिराजला बहुतेकवेळा ‘वन चेंज’ गोलंदाजी करावी लागत होती. बुमराहची दुखापत सिराजच्या पथ्यावर पडली असे म्हटले तर या ठिकाणी वावगे ठरणार नाही.
सिराजची मागील वर्षभरातील प्रगती खरेच थक्क करणारी अशीच आहे. फिरकी विभागात कुलदीप यादवने संघातील स्पेशलिस्ट फिरकीपटूची आपली जागा जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर पुन्हा मिळवली आहे. त्याच्या येण्यामुळे युजवेंद्र चहलला पहिल्या दोन्ही सामन्यांत बेंचवरच बसावे लागले होते. अक्षर पटेल व रवींद्र जडेजा हे फिरकी गोलंदाजी करणारे अष्टपैलू वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या संघात नसले तरी त्यांना सक्षम असा पर्याय देण्याचा प्रयत्न वॉशिंग्टन सुंदर याने या मालिकेद्वारे केला. परंतु, यात तो यशस्वी झाला नाही हे त्याने मालिकेत केलेल्या 21 धावांवरून व घेतलेल्या 2 बळींवरून दिसून आले. धावा रोखण्यातही तो कमी पडला. अनपेक्षितपणे मालिकेतील सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरलेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरने मात्र आपल्या कामगिरीने आगामी वनडे विश्वचषकापूर्वी निवड समितीची डोकेदुखी वाढवली आहे. धावा रोखण्यात तो कमी पडला असला तरी हमखास भागीदारी फोडणारा म्हणून तो नावारूपास येत आहे. दबावाखाली ब्रेसवेलला त्याने टाकलेला ‘तो’ यॉर्कर चेंडू अनेकांच्या स्मरणात राहणार आहे. किवी संघाला ब्रेसवेलच्या रूपात या मालिकेतून नवीन हिरा मिळाला. ब्रेसवेलमुळे अनुभवी मिचेल सेंटनरला फिरकी जोडीदार लाभला. टिम साऊदी व ट्रेंट बोल्टमुळे निर्माण झालेली पोकळी मात्र या मालिकेत जाणवली. केन विल्यमसनच्या विश्रांतीमुळे लंगडी पडलेली त्यांची फलंदाजीची फळी भारताचे काम सोपे करणारी ठरली.