‘गावकार’ फटीमाम

0
10
  • सौ. श्रेया काळे

फटीमाम कधी कोणती वस्तू आमच्यासाठी घेऊन आल्याचे वा कधी खाऊ घेऊन आल्याचे मला आठवत नाही. पण त्याने आमच्यासोबत घालविलेला वेळ, त्याच्याशी मारलेल्या गप्पा, त्याने दिलेला संगीताचा निर्भेळ आनंद हा कुठल्याही वस्तू किंवा खाऊपेक्षा नक्कीच सरस होता.

लहानपणी माझ्या गावी रविवार म्हणजे सारं काही निवांत असा काही प्रकार नव्हता. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून आई-बाबा घरात वावरत असत. फक्त सुट्टी असल्यामुळे कामं तेवढी निराळी असत. आम्ही मुलेदेखील नेहमीपेक्षा जरा उशिरा उठून आई-बाबांना हातभार लावत असू. सकाळी अंगण झाडणे, झाडांच्या वाढलेल्या फांद्या खुंटणे, भाट शिंपणे, लाकूडफाटा एकत्र करणे, नाश्ता-पाणी, सडा-रांगोळी या व्यापात गुंग असताना गेटचा दरवाजा उघडत ‘गेऽऽ वयनी’ अशी हाक मारत फटीमाम आमच्या घरात प्रवेश करायचे.
मला आठवतो तो फटीमाम जवळ-जवळ सत्तरीच्या आसपास असलेला. उंच, मध्यम बांध्याचा, डोक्यावर टक्कल व चेहऱ्यावर देवीचे व्रण असलेला, सदा हसतमुख, मंद चाल असलेला एक सज्जन ‘गावकार.’ त्याचा पोशाखही ठरलेला असे. अंगात पांढरे बनियान व गुडघ्यापर्यंत पंचा नेसलेला असा हा फटीमाम चौकटीचा रंगीत पंचा खांद्यावर घेऊन गावभर फिरत असे.

रविवारी फटीमाम घरी आला की आम्हाला फार आनंद व्हायचा. कारण फटीमाम आला की आमच्या घरी गाण्याचा कार्यक्रम होत असे. त्याला हार्मोनिअम वाजविण्याचा फार नाद होता. गावातल्या देवळात होणाऱ्या भजनात, नाटकात, कीर्तनात तो हार्मोनिअम वाजवत असे.
आमच्या घरात माझ्या बाबांना संगीताची आवड आहे याची कल्पना त्याला होती. घरातल्या छोट्यामोठ्यांना हटकून थोडावेळ बसल्यानंतर फटीमाम आपणहून बाबांकडे हार्मोनिअमचा विषय काढी आणि स्वतः ती उचलून ओसरीवरच्या लाकडी बाकड्यावर ठेवी. मग तिथेच ठिय्या मारून त्याचा स्वतःचा पेटीचा सराव सुरू होई. त्यानंतर बाबा, मी व माझी छोटी बहीण यांचा एकामागोमाग गीत गायनाचा कार्यक्रम रंगत असे. फटीमाम आमची सगळी गाणी पेटीवर वाजवून आम्हाला उत्तम साथ देत असे. त्याच्या या वादनातला गमतीचा भाग म्हणजे, पेटी वाजवीत असताना नकळतच त्याच्या चेहऱ्यावर दिसणारे गमतीशीर हावभाव! तो वाजविण्यात गुंग झाला की त्याच्या भुवया, त्याचे ओठ तो विशिष्ट तऱ्हेने सर्व बाजूंनी हलवत असे. त्यामुळे त्याचा चेहरा फार गमतीशीर दिसायचा. आम्हाला त्याची सवय झाली होती, पण एखाद्या नवख्या माणसाला ते पाहून आपले हसू आवरता आवरत नसे.

आमची गाणी म्हणून झाली की तो माझ्या आईलाही आग्रहाने आपल्यासमोर गायला बसवत असे. माझी आई कोणी गायिका नव्हती. तिला आम्ही क्वचितच एखादे गाणे गुणगुणताना ऐकत असू. याची जाणीव फटीमामला नव्हती असे नाही, पण आमच्या या आनंदात तिचाही सहभाग असावा म्हणून त्याचा आग्रह असे. माझ्या बाबांकडे भावगीतांची एक वहीच होती. त्यावर पाहून आपल्याला माहीत असलेल्या चालींची गाणी ती फटीमामसमोर गात असे. ‘लिंबोणीच्या झाडामागे’, ‘नाच रे मोरा’, ‘किती सांगू मी सांगू कुणाला’ ही गाणी आईने फटीमामसमोर गायलेली माझ्या स्मरणात आहेत. आम्हालाही त्यावेळी तिचे अप्रूप वाटायचे. कधीकधी गाताना जर ती चुकली तर फटीमाम तिला मध्येच थांबवायचा व ती ओळ स्वतः गाऊन तिचे गाणे सुधारतानाही आम्ही कितीतरी वेळा पाहिले आहे. थोडासा हास्यविनोद करत, थोडेसे टोमणे मारत तो आईला गातं करीत असे.

मनसोक्त पेटी वाजवून झाली की फटीमाम बाबांसोबत इकडच्या-तिकडच्या ‘गजालीं’ना बसत असे. आई पण त्याच्या नाश्ता-पाण्याच्या व्यवस्थेसाठी स्वयंपाकघरात निघून जाई. घरी बनवलेली इडली, डोसा, पोळे, सांजा वा मुगाची उसळ चहासोबत खाऊन फटीमाम आमचा निरोप घेत असे. या सगळ्या व्यापात रविवारची सकाळ संपून दुपार कधी होई याचा आम्हाला पत्ताही लागत नसे. असे कित्येक रविवार आम्ही फटीमामसोबत अनुभवले असतील… संगीताच्या घरगुती मैफलींनी सजलेले, किंबहुना मंतरलेलेच.
फटीमाम मानाने गावकार होता. गावच्या सातेरीच्या देवस्थानात त्याला मान होता. घरची शेती होती. पण त्याच्यामध्ये तो कधी रमला नाही. त्याचा पुतण्याच शेती करून त्याला त्याच्या वाट्याचे भात देत असे. त्याच्या घरी त्याची स्त्री नव्हती. त्याचा एकुलता एक मुलगा गुरू माझ्यापुढे दोन वर्षे गावच्या सरकारी शाळेत शिकत होता. त्याला शिक्षणाची आवड होती. तो चित्रेही उत्तम काढायचा. फटीमाम त्याला आईबाबाचे सुख देत एकटाच आपल्या संसाराचं रहाटगाडगं ओढत असे. त्याला गुरूकडून फार अपेक्षा होत्या. तो पास होऊन वरच्या वर्गात गेला की आपला आनंद फटीमाम ‘मारांद’ मारून साजरा करीत असे.

फटीमाम अगदी निर्व्यसनी! त्याचे घर गावातल्या देशी दारूच्या दुकानाला लागून असतानादेखील त्याने कधी दारूला स्पर्श केला नाही. त्याने साधी विडीसुद्धा हातात धरलेली आम्ही पाहिले नाही. तोंडात अपशब्द तर नाहीच नाही. त्याच्या या सज्जनशीलतेमुळे गावातल्या भटा-बामणांच्या घरीही त्याचे स्वागत होई. पण फटीमामला त्याच्या मर्यादांचीही जाण होती. मला आठवते, बाबा घरी नसताना फटीमाम घरात प्रवेश करीत नसे. गेटच्या बाहेरच चौकशी करून घरी निघून जायचा.
या फटीमामला एक खोड होती. त्याची बायको निवर्तल्यानंतर घरच्या स्वयंपाकाची जबाबदारी त्याच्यावरच पडल्याने तो स्वतःला स्वयंपाकात तरबेज समजत असे व त्या जोरावर इतरांनी बनविलेल्या पदार्थांत तो खोड काढी. माझी आई त्याला नाश्त्याला चपाती खाऊ घालायला नेहमी टाळायची. कारण चपाती दिली की ‘चपात्यो मोव जावपाक, घडी घालतना खूप त्याल लावपाक जाय गे वनयी’ असा टोमणा तो मारीत असे. आईला त्याच्या या सवयीचा तिटकारा येत असे. पण त्याच्या वयाचा मान राखून तिने त्याला कधीही उत्तर दिले नाही अन्‌‍ कधी उपाशीही पाठविले नाही.

फटीमाम कधी कोणती वस्तू आमच्यासाठी घेऊन आल्याचे वा कधी खाऊ घेऊन आल्याचे मला आठवत नाही. पण त्याने आमच्यासोबत घालविलेला वेळ, त्याच्याशी मारलेल्या गप्पा, त्याने दिलेला संगीताचा निर्भेळ आनंद हा कुठल्याही वस्तू किंवा खाऊपेक्षा नक्कीच सरस होता. वर्षे सरत गेली. आमच्या गावात शिक्षणाच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे बाबांनी आमचे बिऱ्हाड जवळच्या शहरात हलविले. गाव बदलला तशी आमची जीवनशैलीही. तसे आम्ही सुट्टीत गावी येत असू पण आता प्रत्येक वेळी फटीमाम भेटेच असे नाही.
आम्ही शहरात असतानाच एक दिवस फटीमाम वारल्याचे समजले. तेही खूप दिवसांनंतर. त्याच्या निधनाच्या बातमीने आम्ही खिन्न झालो. रक्ताचे जरी नसले तरी संगीताच्या माध्यमातून आमच्यामध्ये तयार झालेले माणुसकीचे नाते आता संपले ही भावनाच जीवनात एक पोकळी निर्माण करून गेली. त्या दिवशी माझ्या आईच्या डोळ्यातून टपकलेले अश्रू हे त्याच पोकळीची साक्ष देणारे होते. फटीमामच्या मुलाचाही नंतर संपर्क होऊ शकला नाही. म्हणजेच फटीमाम गेल्यानंतर त्याच्या घराशी आमचा संबंध जवळजवळ संपलाच.
माझे आणि माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर छोट्या भावासह आम्ही आमचं बस्तान तब्बल तेरा वर्षांनंतर परत गावी हलवलं. आता गावाचेही थोडेफार शहरीकरण झाले होते. आमच्या घराचीही डागडुजी करून ते थोडेफार नव्या शैलीशी मिळतेजुळते करून घेतले होते. आता अंगणालगतच्या घराच्या ओसरीवर जुन्या बाकड्याची जागा नक्षीदार झोपाळ्यानं घेतली होती. झुलत्या झोपाळ्यासंगे लोखंडी सळ्यांचा होणारा आवाज आजही त्या सुरांची आठवण करून देतो…