क्षणचित्रं… कणचित्रं…
- प्रा. रमेश सप्रे
हल्ली शहरातील काँक्रीट इमारतींच्या उंचीमुळे खिडकीतून पूर्वी दिसणाऱ्या टेकड्या, झाडं एवढंच काय माणसंही नीट दिसत नाहीत. खाली पाहावं तर तिथंही सारं काँक्रीटच. माती दिसतच नाही, काय करायचं? कालाय तस्मै नमः।
‘अमरकोश म्हणजे काय असतं हो आजोबा?’ या अमरच्या प्रश्नानं आजोबांना नवा हुरूप आला. कारण आजकाल प्रश्न विचारणाऱ्या मुलांची पिढी अस्तंगत होत चाललीय. याहीपेक्षा वाईट म्हणजे तुम्ही मुलांना प्रश्न विचारला की प्रश्न पुरा होण्याआधीच ती म्हणतात- ‘माहीत नाही!’ म्हणून उत्साहानं आजोबा म्हणाले, ‘अरे, अमरकोश म्हणजे समानार्थी शब्दांचा संग्रह. जसा शब्दकोश म्हणजे ‘डिक्शनरी’; ज्ञानकोश किंवा विश्वकोश म्हणजे ‘एनसायक्लोपीडिया’ तसाच अमरकोश म्हणजे ‘थिसॉरस!’ नंतर आजोबांनी एक गमतीदार उदाहरण सांगितलं- ‘विंडो, वातायन, खिडकी, गवाक्ष, भिंतीचे भोक.’ खिडकीला निरनिराळ्या भाषेतले शब्द ऐकून अमर हरखून गेला. ‘आणखी सांगा ना आजोबा!’ या अमरच्या उद्गारांवर आजोबा हसून म्हणाले, ‘वेड्या, तुझ्या स्मार्ट मोबाईलवर गुगल अंकल नि यू-ट्यूब आँटी आहेत ना? त्यांनाच विचार की!’ नंतर सुमारे तासभर अमर मोबाइलला चिकटून होता. त्याला अमरकोशाची माहिती, त्यातील काही शब्द यांची उदाहरणे मिळालीच, शिवाय संस्कृत विषयात आठवी, नववी, दहावी अशा वर्गांना अमरकोशातील काही भागांचं पाठांतरही असतं हेही समजलं. असो.
एकदा एका खिडकीनं देवाला प्रार्थना केली, ‘आम्ही खिडक्या छोट्या का आणि ते दरवाजे मोठे का?’ देव काही सांगणार इतक्यात ती खिडकी हट्टानं म्हणाली, ‘ते काही नाही, आम्हालाही दरवाजांसारखं मोठं बनवा.’ देव हसून म्हणाला, ‘तथास्तु!’ मग काय आश्चर्य! दोन्ही बाजूंनी वाढत वाढत खिडक्या दरवाजांएवढ्या मोठ्या झाल्या. आता प्रत्येक खोलीला सर्वत्र दरवाजेच दरवाजे झाले. घरातल्या मंडळींना नवल वाटले, पण त्यांनी सर्व दरवाजांतून ये-जा सुरू केली. काही दिवसांनंतर त्या खिडकीच्या लक्षात आलं की पूर्वी जशी घरातले आजी-आजोबा, आई-बाबा, ताई-दादा आपल्यापाशी काहीवेळ उभं राहून बाहेरचं दृश्य पाहायचे, निरनिराळ्या कृती करायचे, आता कुणी आपल्याजवळ थांबतच नाही. फक्त आत-बाहेर ये-जा करतात. खिडकीनं पुन्हा देवाला प्रार्थना केली, ‘देवा, आम्हाला पूर्वीसारखंच छोटं बनव. त्यामुळे आमचं माणसांशी नातं जुळतं. बरं वाटतं त्यांच्या सहवासात.’ आता मात्र देवानं आधी सांगितलं, ‘समजलं ना खिडकीबाई? प्रत्येकाचं कार्य असतं त्यानुसार त्यांचा आकार नि रचना असते. डोळे नि कान यांची रचना समजा एकसारखी झाली तर त्यांचं कार्य वेगळं कसं होणार?’ खिडकीला आपली चूक कळली. ती पुन्हा पूर्वीसारखी झाली. लगेच कॉलेजमध्ये जाणारा घरातला दादा येऊन तिच्याजवळ थांबलासुद्धा… रस्त्यावरचं ‘सृष्टिसौंदर्य’ पाहायला.
खिडकीतून दिसणारं दृश्य प्रत्येकासाठी वेगळं. आजोबा आकाशातल्या ढगांकडे बघतील त्यावेळी आजी बागेतल्या फुलांकडे पाहत असेल. पण प्रत्येकाच्या अनुभवात, ज्ञानात अशा खिडकीतून घेतलेल्या दर्शनानं भरच पडते हे मात्र खरं. म्हणून खिडकीला ज्ञानप्राप्तीचं माध्यम समजलं जातं. असं म्हणतात- ‘इंग्रजी भाषा ही जगाची खिडकी आहे (विंडो ऑन द वर्ल्ड), तर प्रत्येकाची मातृभाषा ही मनाची खिडकी आहे (विंडो ऑन द माइंड). मन संपन्न होतं, सर्वात चांगलं व्यक्त होतं ते मातृभाषेतच.’ शिक्षणशास्त्रात सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांना (टेक्स्टबुक्स) खिडकी म्हटलंय. तिच्यातून त्या-त्या वयाच्या विद्यार्थ्यांना जीवनाचं दर्शन घडवायचं असतं. त्यांच्या जीवनाच्या संदर्भात, अनुभवांच्या संदर्भात (काँटेक्स्ट) अध्यापन रसरंगपूर्ण बनवायचं असतं. पण असं नाही वाटत की आज या पुस्तक-खिडकीची भिंतच बनवून टाकली. सारं काही पाठ्यपुस्तकातलंच. बाहेरच्या जीवनाशी संबंध नाही. म्हणून पुढच्या आयुष्यात शिक्षणाचा उपयोग अगदी कमी होतो, खरं ना?’
यासंदर्भात एक सत्यकथा पाहूया. दुर्गा भागवत या प्रतिभावंत लेखिकेला आदिवासी, वनवासी लोकांच्यात राहून त्यांच्या जीवनपद्धतीचा, संस्कृतीचा अभ्यास करताना अन्नातून विषबाधा झाली. एवढी की डॉक्टरांनी किमान वर्षभर बिछान्यावर विश्रांती (बेडरेस्ट) घ्यायला सांगितलं. या संकटाचं दुर्गाबाईंनी संधीत रूपांतर केलं. एका खिडकीजवळ पलंग ठेवून वर्षभर दिवसाचे चोवीस तास बाहेरच्या निसर्गदृश्यांचं निरीक्षण करून एक अप्रतिम, अमर पुस्तक लिहिलं- ‘ऋतुचक्र.’ खिडकी ज्ञानसाधना करते ती अशी. पण ज्ञानसाधना करायला नको का?
सर्वांना सकारात्मक जीवनाचा संदेश देणारा हा हृदयस्पर्शी प्रसंग पहा. हॉस्पिटलमधील एक वॉर्ड, ज्यात सर्व अंतिम श्वासाकडे वेगानं पोचणारे रुग्ण. त्यातले बरेचसे युद्धात जखमी झालेले सैनिक. खिडकीशेजारच्या कॉटवरील पेशंट रोज गुडघ्यावर बसून मोठ्यानं खिडकीबाहेरच्या दृश्याचं वर्णन करायचा. कधी रंगीबेरंगी ढगांचं, कधी उडणाऱ्या आकाशपक्ष्यांचं, कधी जवळ असलेल्या उद्यानातील नाचणाऱ्या कारंज्यांचं, बागडणाऱ्या मुलांचं, वाऱ्यावर डोलणाऱ्या फुलांचं, तर कधी रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांचं, वाहनांचं… वॉर्डमधल्या सर्व रुग्णांना ते ऐकून खूप बरं वाटायचं. तो खिडकीजवळच्या कॉटवरील रुग्ण मेल्यावर एका रुग्णानं हट्टानं नर्सकडून ती कॉट मागून घेतली. तिथं गेल्यागेल्या गुडघ्यावर बसून खिडकीतून बाहेर पाहतो तो काय, समोर एक उंच भिंत. एकही खिडकी नसलेली आंधळी भिंत. नर्सला विचारल्यावर ती शांतपणे म्हणाली, ‘आपल्याला, म्हणजे तुम्हां सर्वांना बरं वाटावं म्हणून तो रुग्ण कल्पनेनं विविध दृश्यांचं वर्णन करत होता. आणखी विशेष म्हणजे तो स्वतः पूर्ण आंधळा होता.’ हे ऐकून तो नवा रुग्ण क्षणभर सुन्न झाला. पण लगेचच त्यानंही बाहेरच्या प्रत्यक्षात नसलेल्या दृश्याचं वर्णन सुरू केलं. ही एक अतिशय परोपकारी सकारात्मक दृष्टीच नव्हे का?
एक पालक मुख्याध्यापकांकडे तावातावाने आपल्या मुलाची समस्या सांगून सूचना देत होते. ‘असं करायला हवं, तसं करायला नको’ असं बराच वेळ ऐकून घेतल्यावर मुख्याध्यापक शांतपणे म्हणाले, ‘तुमच्या एका मुलासाठी केलेला बदल दुसऱ्या अनेक मुलांना त्रासदायक, अपायकारक ठरू शकतो.’ हे ऐकूनही जेव्हा तो पालक आपलंच तुणतुणं वाजवत राहिला तेव्हा मुख्याध्यापक ठामपणे ठासून म्हणाले, ‘जगाकडे आणि जीवनाकडे पाहण्याची तुमचा मुलगा ही एकच खिडकी तुमच्यासाठी आहे; पण मला हजार खिडक्यांतून (कारण शाळेत हजार विद्यार्थी होते) पाहावं लागतं. आता सांगा, अधिक विशाल, विश्वरूप दर्शन कुणाचं असेल? तुमचं की माझं?’ यावर त्या पालकाचे डोळे उघडले. त्याला नवी दृष्टी मिळाली. एक खिडकी घेऊन तो शाळेत आला होता, पण हजार खिडक्या घेऊन परतला. जीवन असंच असतं.
शेवटी एक खंत. हल्ली शहरातील काँक्रीट इमारतींच्या उंचीमुळे खिडकीतून पूर्वी दिसणाऱ्या टेकड्या, झाडं एवढंच काय माणसंही नीट दिसत नाहीत. खाली पाहावं तर तिथंही सारं काँक्रीटच. माती दिसतच नाही, काय करायचं? कालाय तस्मै नमः।