खालावलेली वाचन संस्कृती

0
84
  • चंद्रकांत म. गावस
    (होंडा, सत्तरी- गोवा)

आज समाजामध्ये जी इतकी बजबजपुरी वाढली आहे, स्वैराचार वाढला आहे, नकारात्मक भावना वाढीस लागल्या आहेत त्याला अनेक कारणे असतील; पण प्रमुख कारण मात्र वाचनाचा अभाव! वाचनसंस्कृतीपासून आपण जितके दुरावत जाऊ तितकी समाजाची हानी ठरलेली आहे. कोणी काहीही म्हणो; हेच खरे आहे!!

मला आठवतं… लहानपणी काजूच्या हंगामात काजू घेऊन मी साखळीच्या बाजारात यायचो. काजू विकायचो. आलेल्या पैशातून एकतरी गोष्टीचं पुस्तक विकत घ्यायचो. कारण वाचनाची हौस भागविण्याचा तोच एक उपाय होता. त्याकाळी कोठे वाचनालय नव्हते की शाळेत पुस्तके. पण पुस्तक वाचनाची तर आवड लागलेली. मग हाच एक उपाय माझ्यासमोर राहिला होता.
पुढे पेडणे येथे हायस्कूलमध्ये गेलो आणि माझ्या हाती वाचनालयरूपी पुस्तकांची गुहाच सापडली. त्यावेळी जे पिशासारखे वाचन केले, ती शिदोरी मला अजूनही पुरतेच आहे.
आमचा काळ हा झपाटलेल्या वाचनाचा होता. त्यातून मिळणारा आनंद हा निर्भेळ होता. त्याची कशाचीच तुलना करता येणार नाही. आज आनंद देणारी अनेक साधने हाताशी आली आहेत; पण आजही माझ्यासाठी पहिल्या स्थानावर पुस्तक आहे! मोबाईल, व्हॉटस्‌ऍप, फेसबुक ही आकर्षणे काही काळ हातात राहातात; पण लवकरच त्याचा कंटाळा येतो आणि मग पुस्तक हातात धरावेसे वाटते. अन् एकदा पुस्तक हातात आले की जो आनंद परमळतो… शब्दात सांगता येत नाही.
पण आजच्या पिढीतील एक बरीच मोठी संख्या मात्र या आनंदाला मुकली आहे. याला कारण ही पीढी नाही; आम्हीच आहोत! एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून!
मुळात आज अनेक पालकांना वाचनाची आवड नसल्यामुळे ती पाल्यांमध्ये संक्रमित झाली नाही. आजचा पालकच मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचे पाल्य त्यात बुडून गेले आहेत, याचे नवल नाही. मुलांना पालकांनी मोबाईलची इतकी सवय लावली आहे की मुलं आज मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत; किंबहुना जगू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

मूल जेवत नाही, हातात मोबाईल द्या. आईला घरात काम करायचे आहे, मुलाच्या हातात मोबाईल द्या. काही कारणास्तव मूल रडते आहे, हातात मोबाईल द्या. कारण काहीही असो, मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो आणि मग हेच पालक सतत तक्रार करीत राहतात. मूल मोबाईलशिवाय राहत नाही, आपलं मूल अभ्यास करीत नाही, खेळायला जात नाही की पाहुण्यांकडे येत नाही. कसल्या कार्यक्रमात भाग घेत नाही. मुलं सदान्‌कदा घरात बसून मोबाईल हातात धरून बसतात.

सवय लावली आम्ही आणि आता ओरडही आमचीच. आणि ज्याने मोबाईलऐवजी लहान मुलांच्या हाती गोष्टींची पुस्तके दिली ते पालक मात्र सुखी आणि समाधानी आहेत. कारण पुस्तके वाचून मुलांना आनंद तर वाटतोच, पण नकळत मुलांच्या मनावर चांगले संस्कार घडत जातात. त्यांच्या शब्दसंपत्तीत भर पडते, ज्याचा उपयोग त्यांना पेपरमध्ये निबंध लेखन, पत्रलेखन, संवाद, उतारा, बातमी तयार करणे अशा विषयांमध्ये होतो.
एक वाचनाची सवय आणि इतके सारे उपयोग. एक मोबाईलची सवय आणि अनेक सार्‍या तक्रारी. मग पालक म्हणून आपणच ठरवायला हवे मुलांच्या हातात काय द्यायचे ते? दहा हजारांचा मोबाईल की शंभर रुपयांचे पुस्तक? हो, तोही मोठा प्रश्‍नच आहे पालकांना. अनेक पालकांना पुस्तकांसाठी शंभर रुपये घालवायचे म्हणजे जीवावर येतेे. पुस्तकांसाठी शंभर रुपये ही खूप मोठी गोष्ट वाटते.
अनेक बाप असे आहेत की मुलांकडे खूप कपडे आहेत; पण वाढदिवस म्हणून काही हजारांचा आणखी एक ड्रेस आणतात. त्याच वाढदिवसानिमित्ताने हजारो रुपये वायफळ खर्च करतात. काहीजण तर अशा कामासाठी लाखो रुपये उधळतात. प्रसंगी त्यासाठी कर्जही घेतात. पण शंभर रुपयांचे पुस्तक घ्यायचे म्हणजे खूप महाग वाटते. ते तेवढे घेतले जात नाही. पुस्तक सोडून पोरांना सगळ्या गोष्टी दिल्या जातात. आणि इतके करून अपेक्षा काय तर आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत.
नाही होणार चांगले संस्कार. एकदा मुलांच्या हातात मोबाईल दिला आणि पुस्तक काढून घेतले की कुणीही पालकांनी चांगल्या संस्काराची अपेक्षा करू नये.
खरंच, प्रामाणिक इच्छा आहे पालकांची की आपल्या मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत तर मुलांच्या हाती पुस्तके द्या. लहानपणापासून त्यांना वाचनाची सवय लावा. कोणत्या तरी एखाद्या वाचनालयाचा सभासद करून घ्या.

मुलांना एकदा का वाचनाची आवड लागली की तुम्ही निश्‍चिंत राहा. मुलांवर पुस्तकेच संस्कार करत राहतील; तुम्ही संस्कार करायची गरज नाही. आणि पुस्तकांची, वाचनाची मुलांना तुम्ही सवय लावली म्हणून आयुष्यात तुम्हाला कधी पश्‍चात्ताप करायची पाळी येणार नाही. वाचनाची सवय सोडून बाकी कसलीही जरी मुलांना सवय लावली- विशेषतः मोबाईलची- तर पुढे पालकांना मुलांच्या काळजीने झोप लागणार नाही. चिंता सुटणार नाही. पण वाचनाची सवय लावा, तुम्हाला आयुष्यभर चिंता करायची गरज उरणार नाही!
आपण आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीमध्ये वाढवतो. आपल्या संस्कृतीचे कळत नकळत धडे देतो. कधी वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने, कधी मुद्दाम चार गोष्टी सांगून. आणि आपला धर्म, आपला समाज याची जाण मुलांना त्यातून येत जाते. काही धर्मांमध्ये तर धार्मिक कठोर शिक्षणच दिले जाते. कारण तो एक संस्कार आहे असे आपण मानतो.
वाचन हाही एक संस्कार आहे. पु. ल. देशपांडे म्हणतात, ‘जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे, पण अर्थपूर्ण जगण्यासाठी वाचन गरजेचे आहे.’
युवा कवी ऐश्‍वर्य पाटेकर यांना त्यांच्या एका शिक्षकांनी सांगितले, ‘शिक्षण तुला भाकरी देईल, पण कविता तुला नाव देईल.’
आनंद यादव तर म्हणाले, ‘वाचनामुळे मी घडलो.’
वाचनामुळे घडलेल्यांची हजारो उदाहरणे मिळतील; पण वाचनामुळे बिघडला असे एकही उदाहरण नाही. कारण वाचन हा एक संस्कार आहे. आपल्या संस्कृतीचेच ते एक अंग आहे.
गोव्याच्या बाबतीत असे म्हणतात की गोव्यात कसलाही व्यवसाय सुरू करा, त्याला स्पर्धा आहे. गिर्‍हाईक मिळेलच, पण आपला माल खपेलच याची शाश्‍वती नाही. पण दुधाचा धंदा सुरू करा; त्याला गिर्‍हाईक मिळेल याची शंभर टक्के खात्री आहे. तसे आपले मूल सुसंस्कारित व्हावे असे पालकांना जर वाटत असेल तर शंभर टक्के खात्रीशीर उपाय एकच- वाचन. मुलांना वाचनसंस्कृतीमध्ये घेऊन या. तिथेच ठेवा त्यांना.

त्यासाठी काय करावं लागेल? सतत त्यांच्याशी पुस्तकाविषयी बोला. त्यांना पुस्तके घेऊन द्या. एखाद्या वाचनालयाचा सभासद करून द्या. जशी ही पालकांची जबाबदारी आहे तशी ती शिक्षकांची पण आहे. शिक्षक काही पालकांपेक्षा वेगळा नाही; किंबहुना पालकांमधूनच शिक्षक आल्यामुळे पालकांसारखीच त्यालाही वाचनाची आवड नाही. मी शिक्षक असल्यामुळे हे सांगतो. ऐंशी टक्के शिक्षकांना वाचनाची बिलकूल सवय नाही; मग मुलांना ही सवय कशी लागेल?
विशेषतः मराठीचे अनेक धडे कोणत्या ना कोणत्या पुस्तकातून घेतले आहेत. उदा. शिवाजी ‘राजे’ शोभले हा दहावीतला धडा रणजीत देसाई यांच्या ‘श्रीमान योगी’ या कादंबरीतून घेतला आहे. अनेकांनी ही कादंबरी वाचली नसेल, अनेकांना या कादंबरीचे नावही माहीत नसेल; पण शिक्षक हा धडा अनेक वर्षे शिकवत आलेले आहेत आणि त्यांचे विद्यार्थी शंभर टक्के उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा निकाल शंभर टक्के लागला की गंगेत घोडे न्हाले! तो कसा लागला? त्यासाठी काय काय क्लुप्त्या केल्या त्याच्याशी कुणाचा काही संबंध नाही.

जसे ऐंशी टक्के शिक्षक वाचत नाहीत, तसे ऐंशी टक्के शाळांमध्ये वाचनालय नाही. कपाटामध्ये पुस्तके आहेत, पण ती ना कधी शिक्षकांनी पाहिली, ना कधी विद्यार्थ्यांना दाखवली… आणि वर्षानुवर्षे आमच्या शाळा अशा पद्धतीने बर्‍यापैकी चालल्या आहेत. शंभर टक्के निकाल येतो. शिक्षकांचा गौरव होतो. सगळे बरे चालले आहे.

शिक्षकांची जर ही गत असेल तर विद्यार्थी तरी कसा जाईल वाचनाच्या मार्गाने? जणू वाचन हा वाममार्ग आहे अशीच अनेक शिक्षकांची समजूत असल्यासारखे सारे चालले आहे.
मला तरी असे वाटते की आज समाजामध्ये जी इतकी बजबजपुरी वाढली आहे, स्वैराचार वाढला आहे, नकारात्मक भावना वाढीस लागल्या आहेत त्याला अनेक कारणे असतील; पण प्रमुख कारण मात्र वाचनाचा अभाव! वाचनसंस्कृतीपासून आपण जितके दुरावत जाऊ तितकी समाजाची हानी ठरलेली आहे.
कोणी काहीही म्हणो; हेच खरे आहे!