खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत

0
237

 

>> खनिज निर्यातदार संघटनेची मागणी

कोरोना आपत्तीमुळे राज्यातील पर्यटन व्यवसाय बंद पडलेला असल्यामुळे आता तरी केंद्राने राज्यातील खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी गोवा खनिज निर्यातदार संघटनेने केली आहे.

राज्यातील खाण व्यवसाय बंद पडला त्याला १६ मार्च रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. आता कोरोना आपत्तीमुळे राज्यातील पर्यटन व्यवसायही बंद पडल्याने राज्यातील आर्थिक घडी पार विस्कटली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी गोवा खनिज निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अंबर तिंबलो यांनी केली आहे.

गोव्याने घेतलेल्या कर्जाचा आकडा २० हजार कोटींवर पोहोचला असल्याचे या वर्षीच्या अंदाजपत्रकातून स्पष्ट करण्यात आले होते असे संघटनेने म्हटले आहे.

खाण उद्योग बंद पडलेला असल्यामुळे राज्याला दरवर्षी ७०० कोटींच्या महसुलाला मुकावे लागत असून त्यामुळेच राज्याच्या कर्जात वाढ झाली असल्याचे संघटनेने पुढे म्हटले आहे.

आता पर्यटन व्यवसाय बंद पडल्यातच जमा असून त्यामुळे सुमारे ७५ हजार लोक बेकार होणार असल्याचेही संघटनेने नजरेस आणून दिले आहे.

 

गोवा फाऊंडेशनचा विरोध का?

कोरोना आपत्तीमुळे राज्य सरकार आर्थिक संकटात सापडलेले असताना जिल्हा खनिज निधीतील पैसे लोक कल्याणासाठी वापरण्यास गोवा फाऊंडेशन ही बिगर सरकारी संघटना विरोध का करत आहे असा सवालही तिंबलो यांनी केला आहे.