>> दिल्ली दौर्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची माहिती; पंतप्रधानांकडून सहकार्याचे आश्वासन
राज्यातील खाणबंदीचा प्रश्न सोडविण्यासाठी खनिज लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. खाणबंदी प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौरा पूर्ण करून राज्यात परतल्यानंतर काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसर्यांदा भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत राज्यातील खनिज, पर्यटन, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग आदी विविध विषयांवर चर्चा केली असून, पंतप्रधानांनी आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात खाणबंदीमुळे अवलंबितांसह राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठे संकट कोसळले आहे. खाणी सुरू करण्यासाठी राज्य सरकारने खनिज महामंडळाची देखील स्थापन केलेली आहे; मात्र त्याद्वारे सर्व खाणी सुरू होणे कठीण आहे. त्यामुळे आता सरकारकडून लिलाव प्रक्रियेच्या पर्यायावरही सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, खनिज लिलावाच्या प्रक्रियेला लवकरच प्रारंभ केला जाणार असून, त्याद्वारे खाणबंदीचा विषय सोडवला जाणार आहे. खाणबंदीचा विषय सोडवणे हाच सरकारचा प्राधान्यक्रम आहे, असेही त्यांनी नमूद केले.
गोवा ही देशाची पर्यटन राजधानी बनविण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक साधनसुविधा उभारण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी राज्याला आत्तापर्यंत आवश्यक सहकार्य दिले असून, यापुढेही आवश्यक सहकार्य कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नवी दिल्ली भेटीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांनी आयोजित केलेल्या देशातील मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संयुक्त परिषदेत शनिवारी सहभाग घेतला होता.