कोरोना रुग्ण मिळाल्याचे वृत्त खोटे : आरोग्यमंत्री राणे

0
127

गोव्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचा एक रुग्ण मिळाला असल्याचे वृत्त हे खोटे असल्याचा खुलासा काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यानी केला. एका महिलेने फोन करून आपण पुणे येथील प्रयोगशाळेतून बोलत असून एका संशयित रुग्णाचा कोरोनासाठीचा अहवाल हा पॉझिटिव्ह असून त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे दिसून आले असल्याचे सांगितल्याने सगळा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले. चौकशीअंती कुणी तरी फोन करून ही चुकीची माहिती दिल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. त्या महिलेची ओळख पटली असून तिच्याविरूद्ध पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सदर महिलेने दूरध्वनीवरून कॉल करून माहिती दिल्याने आम्हाला ते खरेच वाटले. त्या महिलेने एका डॉक्टरला फोन केला होता. त्याच्याकडून आपणाला माहिती मिळाल्यानंतर आपण प्रसार माध्यमांना ती माहिती दिली. मात्र, नंतर खातरजमा केली असता ते वृत्त खोटे असल्याचे उघड झाले. त्यामुळे आपण पुन्हा ताबडतोब खुलासा करताना ते वृत्त खरे नसून कुणीतरी दूरध्वनीवरून खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट केल्याचे राणे यांनी सांगितले.

समाज माध्यमावर चर्चा
विश्‍वजित राणे यांनी बुधवारी दुपारी गोव्यात कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याचे वृत्त दिल्यानंतर समाजमाध्यमावर ते वृत्त क्षणात व्हायरल झाले. कोरोनाची लागण झाली असलेला एक रुग्ण पळून गेलेला असून त्याची माहिती मिळाल्यास आरोग्यखात्याला कळवा अशा वृत्तासह त्याचे छायाचित्रही व्हायरल करण्यात आले होते. नंतर तीही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.