>> सक्रिय रुग्ण २ हजारांच्या वर; कोविड पॉझिटिव्हिटी दर २६.४३ टक्के; ओमिक्रॉनचे नवे ४ रुग्ण
राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, नवीन ६३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सक्रिय रुग्णांची एकूण संख्या २२४० एवढी झाली असून, कोविड पॉझिटिव्हिटी दर २६.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसर्या बाजूला राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग सुद्धा वाढत असून, काल ओमिक्रॉनचे आणखी ४ रुग्ण आढळून आले, त्यातील एक व्यक्ती स्थानिक असून, त्याला राज्याबाहेर किंवा परदेश प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी नाही.
राज्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्यास प्रारंभ झाला असून, जानेवारी महिन्यात रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. नववर्षात पहिल्या दोन दिवशी ३०० हून अधिक रुग्ण सापडले होते. त्यानंतर काल त्याहून दुप्पट रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या चोवीस तासात २३८७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील ६३१ नमुने बाधित आढळून आले. बाधितांपैकी ६२६ जणांनी गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे, तर ५ बाधितांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले आहे. सकारात्मक बाब म्हणजे चोवीस तासांत एकाही कोरोना बळीची नोंद झाली नाही. तसेच गेल्या चोवीस तासांत ६२ जण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के एवढे खाली आले आहे.
पणजी येथे सर्वाधिक सक्रिय २९९ कोरोनाबाधित आहेत. मडगाव येथील बाधितांची संख्या २७१ एवढी आहे. कासावली येथे १७७, पर्वरी येथे १५३, म्हापसा येथे १३६, कुठ्ठाळी येथे ११४, कांदोळी येथे १११, शिवोली येथे ९६, चिंबल येथे ८७, फोंडा येथे ८२, लोटली येथेे ८२, वास्को येथे ७० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव
राज्यात ओमिक्रॉनचे आणखी ४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक व्यक्ती स्थानिक असून, त्याने कुठेच प्रवास केलेला नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिली. पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत ओमिक्रॉन संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. त्यातील काही नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ओमिक्रॉनची बाधा झालेला एक स्थानिक असून, त्याने कुठेच प्रवास केलेला नाही. यावरून ओमिक्रॉनचा झपाट्याने फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे. राज्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचे कडक पालन करण्याचे आवाहन राणे यांनी केले.
कोर्डेलिया जहाजावरील ६६ प्रवाशांना संसर्ग
मुरगाव बंदरात उतरलेल्या कोर्डेलिया जहाजावरील २००० प्रवाशांपैकी ६६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे सदर जहाज मुरगाव बंदरातून हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सदर जहाजातील काही प्रवाशी कोविडबाधित आढळल्याने जहाजाला मुरगाव बंदरात प्रवेश नाकारण्यात आला होता. जहाजातील सर्वांना सक्तीने कोविड चाचणी करायला लावली होती. एका नामवंत इस्पितळातील २५ ते ३० कर्मचार्यांना त्या प्रवाशांच्या चाचणीसाठी जहाजावर नेण्यात आले. त्यांनी सर्व प्रवाशांच्या स्वॅबचे नमुने घेतले. काल या प्रवाशांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला असून, जहाजातील २००० प्रवाशांपैकी ६६ प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
दरम्यान, याबाबत संबंधित जिल्हाधिकारी आणि एमपीटी कर्मचार्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाकडून या जहाजावरील प्रवाशांना उतरवून घेण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.