आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, अश्रुधुराचा वापर
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत सुरू असलेले आंदोलन काल चिघळले. या आंदोलनात सहभागी झाल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी पत्रकारांनाही प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले. काल आंदोलकांनी सर्वे स्थळावर धडक दिली असता पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. तसेच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. तसेच अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे. सोमवारपासून या रिफायनरी संदर्भात मातीचे परीक्षण करण्यास सुरुवात झाली आहे.
खासदार राऊत यांना अटक
या आंदोलनात स्थानिकांच्या बाजूने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतही उतरले असून आंदोलनात सहभागी झाल्यामुळे खासदार राऊत यांना काल अटक केली आहे. या अटकेची माहिती राऊत यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे.
70 टक्के नागरिकांचे समर्थन ः मुख्यमंत्री
या प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दावा फेटाळून लावताना मी स्वतः उद्योगमंत्र्यांशी बोललो आहे. येथील 70 टक्के पेक्षा जास्त लोकांचे प्रकल्पाला समर्थन असल्याचे म्हटले आहे. हे सर्व भूमिपुत्र आहेत, गावकरी आहेत. त्यांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प, त्यांच्यावर अन्याय करून पुढे न्यायचा नाही, अशी भूमिका सरकारची आहे. काही लोक स्थानिक होते, काही बाहेरचे लोक होते, अशी माहिती मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणतेही काम जबरदस्तीने होणार नाही, अशी ग्वाहीही शिंदे यांनी देत या प्रकल्पाला संमती असल्याचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले होते. त्यामुळे विरोधकांनी राजकारणासाठी राजकारण करू नये असे आवाहन केले.