>> मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
राज्य सरकारने गोव्यातील राजकारणामध्ये गेली ५० वर्षे कार्यरत असलेले माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ आमदार, कॉंग्रेसचे नेते प्रतापसिंह राणे यांना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
सरकारने ज्येष्ठ आमदाराला कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय पहिल्यांदा घेतला आहे. ज्येष्ठ नेते राणे हे आमदार म्हणून गेली ५० वर्षे कार्यरत आहेत. ज्येष्ठ नेते राणे यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी मुख्यमंत्री, गोवा विधानसभेचे सभापतिपद, विरोधी पक्षनेते अशी पदे भूषविली आहेत. सलग अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
तसेच, सोळा वर्षे मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. कॅबिनेट मंत्र्याला मिळणार्या सर्व सुविधा ज्येष्ठ आमदार राणे यांना मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
कॉँग्रेसचे नेते राणे यांना आजीवन कॅबिनेट दर्जा दिल्याने चर्चेचा विषय बनला आहे. ज्येष्ठ नेते राणे यांनी कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून पर्ये विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला होता. तथापि, त्यांचे पुत्र तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वडिलांनी सन्मानपूर्वक राजकारणातून निवृत्ती स्वीकारावी, असे आवाहन केले होते. त्यानंतर कॉँग्रेसने प्रतापसिंह राणे यांना पर्ये मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. परंतु त्यानंतर प्रतापसिंह राणे यांनी कॉंग्रेसच्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलताना राजकारणातून निवृत्ती घेण्याचा संकेत दिले.