कॉंग्रेसचे ‘चिंतन’

0
35

गेली काही वर्षे सतत पडझड चाललेल्या कॉंग्रेस पक्षाला नवजीवन देण्याचा संकल्प करणारे तीन दिवसांचे नवसंकल्प चिंतन शिबीर कालपासून राजस्थानच्या उदयपूरमध्ये सुरू झाले आहे. जवळजवळ चारशे नेते या तीन दिवसांत पक्षाच्या भवितव्याबाबत गहन चर्चा करणार आहेत. कॉंग्रेस पक्ष या शिबिराद्वारे मोठे संघटनात्मक निर्णय घेणार असल्याची हाकाटी आधीच पिटण्यात आलेली असल्याने या शिबिराच्या फलनिष्पत्तीबाबत फारशी अपेक्षा जरी नसली तरी अर्थातच उत्सुकता आहे.
यापुढे पक्षामध्ये एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला निवडणुकीत उमेदवारी देण्याचे ठरविण्यात आले असल्याचे सूतोवाच नुकतेच करण्यात आले. मात्र, हा निर्णय घेत असताना पक्षाच्या शीर्षस्थानी असलेल्या गांधी घराण्याला मात्र त्यातून वगळण्यात आले आहे. खरे तर कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी ही वरपासून सुरू होणे आवश्यक असते, तरच ती खालपर्यंत व्यवस्थित पोहोचते. परंतु कॉंग्रेस एकीकडे बड्या संघटनात्मक बदलांची बात करीत आहे, पण दुसरीकडे पक्षनेतृत्वाच्या आजवरच्या अपयशाला झाकण्याचा केवीलवाणा प्रयत्न करीत आहे. एकीकडे पाच वर्षे ज्याने पक्षाचे काम केले आहे, त्यालाच पक्षात पद मिळेल असे म्हणायचे आणि दुसरीकडे २०१८ साली पक्षप्रवेश केलेल्या प्रियंका गांधींनी तात्काळ वरची पदे भूषवायची याची संगती लागत नाही. पक्षाने मोठ्या अपेक्षेने आजवर ज्यांच्याकडे पाहिले ते राहुल गांधी अजूनही पक्षाचे नेतृत्व स्वीकारून पूर्णवेळ आपले जीवन झोकून देण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत. नुकतेच नेपाळच्या नाईट क्लबमधील त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे एकीकडे नाईट क्लबच्या संस्कृतीतले जगणे आणि दुसरीकडे कॉंग्रेससारख्या गांधीवादी विचारसरणीच्या पक्षाचे लोढणे यात त्यांची कुतरओढ चालली असावी असे स्पष्ट दिसते आहे. पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी आरसा दाखवला तरी ते वास्तव स्वीकारण्याचीच जर पक्षनेतृत्वाची तयारी नसेल तर अशा पक्षाला अपयशाच्या खाईतून कोणी कसे वर काढायचे? त्यासाठी कोणी जादूची कांडी फिरवायची? पक्षाने प्रशांत किशोरांसारखा जादूगार बोलावला खरा, परंतु त्यानेही आता पाठ फिरवली आहे.
पक्षाचे पन्नास टक्के पदाधिकारी यापुढे पन्नास वर्षांखालील असतील असा निर्णय या शिबिरात घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते आहे. हा निर्णय खरोखरच पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी आहे की राहुल गांधींपुढील बुजुर्गांचा अडसर दूर सारण्यासाठी? पन्नास वर्षांखालील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जरूर असेल, परंतु राजकारणाचा अनुभव, परिपक्वता यांची वानवा असू शकते त्याचे काय? भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या यशामध्ये त्याच्या संघटनात्मक रचनेचा मोठा वाटतो हे तर सर्वविदित आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस नवी संघटनात्मक रचना निर्माण करू पाहतो आहे. त्यासाठी दर वीस बुथांवर एक मंडल समिती, एका ब्लॉकखाली पाच ते दहा मंडल समित्या वगैरे रचना या शिबिरानंतर स्वीकारण्यात येणार आहे. तिकडे भाजपाने मतदारयादीच्या प्रत्येक पानासाठी पन्नाप्रमुख नेमण्याइतपते संघटनात्मक जाळे विणलेले आहे. अशा वेळी कॉंग्रेससारख्या पक्षाची ज्या राज्यांत सत्ता नाही, तेथे ही संघटनात्मक रचना केवळ कागदोपत्री राहण्याचीच शक्यता अधिक दिसते. सत्ता आली की गुळाला मुंगळे चिकटावेत तसे ‘कार्यकर्ते’ येऊन चिकटतात, परंतु जो पक्ष सातत्याने निवडणुकांमागून निवडणुका हरत चालला आहे, हातातली राज्येही घालवत चालला आहे, ज्याला काही भवितव्यच दिसत नाही अशा पक्षासोबत फरफटत जाण्यास राजकारणात नव्याने उतरू पाहणारी तरुणाई कितपत तयार होईल?
कॉंग्रेसची सर्वांत मोठी समस्या कोणती असेल तर ती आहे सर्वांत वरच्या स्तरावरील नेतृत्वाची पोकळी. सोनिया गांधींच्या आजारपणापासून ठळकपणे जाणवू लागलेली ही पोकळी भरणारे समर्थ नेतृत्व जोवर निर्माण होत नाही, तोवर कॉंग्रेसचे गाडे हे असेच रडत रखडत चालणार आहे हे सांगायला कोण्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. कॉंग्रेसची दुसरी समस्या आहे ती म्हणजे त्याचा वैचारिक गोंधळ. एकीकडे निवडणुका आल्या की ‘सॉफ्ट हिंदुत्व’ची भाषा बोलायची आणि दुसरीकडे अल्पसंख्यकांचा कैवारी असल्याचा पवित्रा घ्यायचा या दुतोंडी नीतीमुळे दोन्हींचा विश्वास पक्ष गमावत चालला आहे. राज्याराज्यांतील कॉंग्रेसच्या पारंपरिक मतपेढ्यांना प्रादेशिक पक्ष खिंडार पाडत चाललेले आहेत. पक्षनेते पक्षहितापेक्षा स्वार्थाला अधिक महत्त्व देताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत भले कितीही चिंतन केले तरी उदयपूरमधून पक्षाचा नवा उदय होऊ शकेल काय?