केजरीवाल सरकारमधील दोन मंत्र्यांचा राजीनामा

0
13

>> अटकेतील मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांनी सोडले मंत्रिपद; राजीनामा स्वीकारला

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे. राजीनामा दिलेले आपचे दोन्ही नेते सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये कोठडीत आहेत.
मनीष सिसोदिया यांच्याकडे अनेक विभागांची जबाबदारी होती. सत्येंद्र जैन तुरुंगात गेल्यानंतर मनीष सिसोदिया हे त्यांच्या विभागाचे काम पाहत होते.

सत्येंद्र जैन हे मागील 9 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. सुरुवातीला 2017 मध्ये सीबीआयने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी खटला दाखल केला होता. त्यानंतर 2018 पासून ईडीकडून त्यांची सातत्याने चौकशी सुरू होती.सत्येंद्र जैन यांना ईडीने गेल्या वर्षी 30 मे रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत तुरुंगातच आहेत.
दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणात मनीष सिसोदिया यांना रविवारी सीबीआयने अटक केली होती. त्यांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे तीन पानी राजीनामा सोपवला आहे. आपल्या राजीनाम्यात मनिष सिसोदियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली आहे. तसेच आपल्या राजीनाम्यात त्यांनी आपल्या वडिलांच्या शिकवणुकीचाही उल्लेख केला आहे. मी गेल्या आठ वर्षांपासून अत्यंत प्रामाणिकपणे काम करूनही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले आहेत. हे आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. काळ सगळे वास्तव समोर आणेल याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही. मला आता मंत्रिपदावर राहण्याची इच्छा नाही. या पत्राद्वारे मी माझा राजीनामाच देतो आहे, असेही सिसोदियांनी म्हटले आहे.

सरकारमधील 33 पैकी 18 खाती होती सिसोदियांकडे

केजरीवाल यांच्यानंतर मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षातील सर्वात मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे दिल्ली सरकारमधील एकूण 33 पैकी 18 खाती आहेत. सिसोदिया यांच्या अटकेनंतर त्यांचे काम कोण सांभाळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यांच्याकडे शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, वित्त, उत्पादन शुल्क, ऊर्जा, पाणी, आरोग्य अशी महत्त्वाची खाती होती.