केजरीवाल मैदानात

0
17

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना अखेर 21 दिवसांचा अंतरिम जामीन मिळाला. अर्थात, दिल्ली मद्यघोटाळ्यातून ते आरोपमुक्त झालेले नाहीत वा त्यांना आरोपपत्र दाखल होईपर्यंतचा जामीनही मिळालेला नाही. हा केवळ अंतरिम जामीन आहे आणि 2 जूनला पुन्हा कोठडीत दाखल व्हावे लागणार आहे. परंतु तरीही दिल्ली आणि पंजाबमधील लोकसभा निवडणुकीच्या आधी तुरुंगातून मुक्तता झाल्याने त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आम आदमी पक्षासाठी तो फार मोठा दिलासा म्हणावा लागेल. ‘इंडिया’ आघाडीलाही त्यांच्या सुटकेने आता थोडे बळ मिळाले असेल. केजरीवाल गेले पन्नास दिवस तुरुंगात होते. त्यांना अंतरिम जामीन मिळू देण्यास सक्तवसुली संचालनालयाने कसोशीने विरोध केला, निवडणूक प्रचार करता येणे हा काही त्यांचा मूलभूत अधिकार नव्हे असेही न्यायालयात सांगून पाहिले, परंतु सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन देऊन न्यायाची बूज राखली आहे. केजरीवाल हे एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत व एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, कोणी सराईत गुन्हेगार नव्हेत असे ठणकावत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हा अंतरिम जामीन दिला आहे. आता तुरुंगाबाहेर येण्याची संधी मिळालेले केजरीवाल ती वाया कशी घालवतील? लागलीच त्यांनी आपला लढा हुकूमशाहीविरुद्ध असल्याचे सांगत ‘इन्किलाब झिंदाबाद’च्या घोषणाही दिल्या. शनिवारी त्यांनी ‘रोड शो’ही केला. वास्तविक, न्यायालयाने जामीन देताना त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या कार्यालयात न जाण्यास किंवा सचिवालयातही न फिरकरण्यास वा कोणत्याही शासकीय फायलींवर सही न करण्यास फर्मावले आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून ह्या काळात ते आपली जबाबदारी जरी पार पाडू शकणार नसले, तरी आम आदमी पक्षाचे नेते म्हणून पक्षाच्या प्रचारकार्यात मात्र ते हिरीरीने भाग घेऊ शकतील. आम आदमी पक्ष ह्या लोकसभा निवडणुकीत देशभरात मिळून एकूण 22 जागा लढवतो आहे. त्यापैकी पंजाबात तेथील सर्व तेरा जागा पक्ष लढवत आहे. दिल्लीत काँग्रेसशी हातमिळवणी झाल्याने सातपैकी नवी दिल्ली, पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली व दक्षिण दिल्ली ह्या चार जागा ‘आप’ लढवतो आहे, तर ईशान्य दिल्ली, वायव्य दिल्ली व चाँदनी चौक ह्या तीन जागांवर काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. दिल्लीची ही निवडणूक सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी होणार आहे. म्हणजेच केजरीवाल यांना आता प्रचारासाठी दहा बारा दिवसांचा मुबलक वेळ मिळाला आहे. देशात लढवत असलेल्या 22 पैकी आधीच मतदान होऊन गेलेल्या आसाममधील दोन व गुजरातमधील दोन जागा वगळता पंजाबमधील 13, दिल्लीतील 4 आणि हरयाणातील कुरूक्षेत्राची 1 मिळून 18 जागांचा प्रचार केजरीवाल यांना पुन्हा तुरुंगाची हवा खाईपर्यंत करता येईल. आपल्या अटकेमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा वापर ते मते मिळवण्यासाठी कितपत करू शकतात हे पहावे लागेल. आम आदमी पक्ष हा ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष आहे. ‘इंडिया’च्या प्रचारासाठी ते वेळ देणार का हे अद्याप स्पष्ट नाही, परंतु आम आदमी पक्षासाठी मात्र त्यांची जामीनावरील मुक्तता हा निश्चित दिलासा ठरला आहे. अर्थात, केजरीवाल जेव्हा जेव्हा मतदारांना सामोरे जातील तेव्हा ते दिल्लीच्या मद्यघोटाळ्याची आठवण ताजी करतील असे टीकास्र अमित शहांनी सोडले आहे. केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले आहेत खरे, परंतु ते काही कोण्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अटकेत नव्हते. दिल्लीच्या अबकारी धोरणात खासगी मद्य कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून शंभर कोटींची लाच घेऊन तो पैसा गोव्यासह विधानसभा निवडणुकीत वापरल्याचा त्यांच्या पक्षावर जो आरोप आहे, त्यातून ते किंवा त्यांचा पक्ष अद्याप दोषमुक्त झालेला नाही. गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत हा पैसा कोणाकोणाला मिळाला, त्याचे लाभार्थी कोण आहेत हा सगळा तपशील सक्तवसुली संचालनालयाच्या आरोपपत्रात आहेच, त्यामुळे स्वतःला हुतात्मा म्हणून जनतेसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न जरी केजरीवाल करीत असले, हुकूमशाहीविरुद्ध लढणारा कार्यकर्ता अशी आपली प्रतिमा जरी ते लोकांपुढे ठेवू पाहात असले, तरी त्यामुळे त्यांच्यावरील आणि त्यांच्या पक्षावरील आरोपांचे गांभीर्य यत्किंचितही कमी होत नाही. देशव्यापी आंदोलन उभारून देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी म्हणून स्थापन झालेला हा राजकीय पक्ष स्वतःच आकंठ भ्रष्टाचारात बुडाल्याचे चित्र समोर यावे हे काही केजरीवाल यांच्यासाठी भूषणावह नाही. स्वतःच्या हनुमानभक्तीचा देखावा त्यांनी सध्या उभा केला असला, तरी अण्णा हजारे नावाच्या रामाला त्यांनी हातोहात कसा गुंगारा दिला हे लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध हाती घेतलेली झाडू प्रथम त्यांनी स्वतःचा पक्ष साफ करायला वापरणे गरजेचे आहे.