कुस्तीपटूंचा गंगा नदीत पदके विसर्जित करण्याचा निर्णय मागे

0
8

लैंगिक शोषण प्रकरणी भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी गंगेत पदके विसर्जित करण्याचा निर्णय काल मागे घेतला. शेतकरी नेत्यांनी कुस्तीपटूंची समजूत काढल्यानंतर गंगा तीरावरुन सर्व कुस्तीपटू मागे परतले. कुस्तीपटूंनी शेतकरी नेते नरेश टिकैत यांच्याकडे सर्व पदके सोपवली आहेत. कुस्तीपटूंसोबतच्या चर्चेनंतर टिकैत यांनी केंद्र सरकारला कारवाईसाठी 5 दिवसांची मुदत दिली आहे. टिकैत यांनी त्यांच्याकडून पदकांची बॅगही घेतली आहे. ही बॅग ते राष्ट्रपतींना देणार असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे. सर्व खेळाडू हरिद्वारहून घरी रवाना झाले आहेत.

केंद्र सरकारचा निषेध म्हणून कुस्तीपटूंनी मेहनतीने कमावलेली सर्व पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व कुस्तीपटू विविध पदकांनी भरलेल्या बॅगा घेऊन हरिद्वार येथे गंगा किनाऱ्यावर जमले होते; परंतु त्यानंतर शेतकरी नेत्यांनी कुस्तीपटूंना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आणि कुस्तीपटूंनी त्यांचा निर्णय
मागे घेतला.