कीर्तन संस्थेचे आद्य प्रवर्तक देवर्षी नारद

0
13
  • रमेश सावईकर

देवर्षी नारदमुनीचे सर्वात मोठे कार्य म्हणजे लोकांना भक्तिमार्गावर नेऊन धर्माची महती, देवभक्ती आणि समाजप्रबोधन करणे हे होय. त्यांना कीर्तनसंस्थेचे आद्यप्रवर्तक मानले जाते.
इष्टदेवतेची प्रार्थना करणे किंवा गुणगान करणे हा कीर्तनाचा विषय असून
भक्तिरसाचा परिपोष करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. नारदजयंतीनिमित्त-

नारद हा एक देवर्षी व ऋग्वेदातील एक सूक्तकार , ज्याच्या ठिकाणी देवत्व आणि ऋषित्व या दोहोंचा समन्वय झाला होता. एकूण आठ देवर्षींपैकी- वायुपुराणानुसार- नारद हा अग्रगण्य आहे हे ‘देवर्षीणांच नारदः’ या गीतवचनावरून दिसून येते.
नारद हा यज्ञवेत्ता व सूक्तद्रष्टा होता. त्याच्या नावावर ऋग्वेदातील काही सूक्ते आहेत. सामवेदाचा शिक्षाग्रंथही त्याने लिहिला. नारद हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असून तो परमभागवत, धर्मज्ञ, तत्त्वज्ञ, राजनीतिज्ञ व संगीततज्ज्ञ होता. नारदाच्या जन्माच्या व चरित्राच्या अनेक कथा पुराणांत आढळतात. त्यांत भिन्नता दिसून येते. असे असले तरी वैशाख कृष्ण द्वितीया ही त्याची जन्मतिथी मानली गेली असून त्या दिवशी ‘नारद जयंती’ साजरी करण्याची प्रथा संतकाळापूर्वीपासून चालत आलेली आहे.

नारद हा ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक होता. ब्रह्मदेवाने त्यास उत्पन्न केल्यावर दारसंग्रह करून प्रजा निर्माण करण्याची आज्ञा केली. ती मान्य न केल्याने ब्रह्मदेवाने त्यास शाप दिला. उपबहर्ण गंधर्वरूपात त्याचा गृहस्थाश्रम झाल्यावर त्याची शापातून मुक्तता झाली. ब्रह्मदेवाचा दुसरा मानसपुत्र दक्षप्रजापती याने प्रभूत पुत्रोत्पत्ती करून त्या मुलांना मैथुनधर्माने प्रजा उत्पन्न करण्याचा आदेश दिला; पण नारदाने त्या मुलांना विरक्त बनवून दारसंग्रहापासून विरक्त केले. त्यावेळी ‘तुला गर्भवास घडेल व तू कोठेही एका ठिकाणी स्थिर होणार नाहीस’ असा दक्षाने नारदास शाप दिला. ‘दुर्भगा’ नामक मुलीनेही नारदास असाच अस्थिरत्वाचा शाप दिला होता.
नारद नामस्मरण व हरिगुण संकीर्तन करीत त्रैलोक्यात फिरत असतो. तरी त्याचा स्वतःचा असा एक आश्रम होता असा उल्लेख भागवतात आढळतो.

नारद हा गौरवर्णाचा, ब्रह्मतेजाने युक्त, उंच, मस्तकावर जटाभार धारण करणारा, हातात वीणा असणारा, सुवर्णाचे यज्ञोपवीत धारण करणारा, चंद्रकिरणाप्रमाणे शुभ्र अशी दोन इंद्रदत्त वस्त्रे परिधान करणारा, दंड-कमंडलू बाळगणारा वा पाहणाऱ्यावर छाप पाडणारा होता.
नारद हा भक्तिमार्गप्रवर्तक व कीर्तन संस्थेचा आदिप्रवर्तक मानला जातो. त्याला अध्यात्म, राजनीती, धर्मशास्त्र, यज्ञप्रक्रिया, सर्पज्ञान, संगीत इ. अनेक विषयांचे सखोल ज्ञान होते. नारदाने अनेकांना ज्ञानप्रवृत्त केले व भक्ती शिकवली. त्यात व्यास, वाल्मिकी, प्राचीनबर्ही अशा व्यक्ती होत्या. नारदास देव व दानव या दोघांतही सारखाच मान होता. देव व माणूस यांतील दुवा म्हणून त्याची पुराणांत विशेष प्रसिद्धी आहे. नारद हा सर्वतोगामी व चिरंजीव आहे अशी जनांत समजूत आहे.

नारदाची ग्रंथसंपदाही कमी नव्हती. नारदभक्तिसूत्रे, नारदस्मृति, नारदपंचरात्र, लघुनारदीय, बृहन्नारदीय, नारदपुराण, नारदसंहिता, नारदपरिव्राजकोपनिषद, नारदोपनिषद, संगीत मकरंद, रागनिरुपण, पंचमसारसंहिता, दत्तिल नारदसंवाद इ. ग्रंथ त्याच्या नावावर आहेत.
देवर्षी नारदमुनीचे सर्वात मोठे कार्य म्हणजे लोकांना भक्तिमार्गावर नेऊन धर्माची महती, देवभक्ती आणि समाजप्रबोधन करणे हे होय. त्यांना कीर्तनसंस्थेचे आद्यप्रवर्तक मानले जाते.

कीर्तन हा एक दाक्षिणात्य गानप्रकार, जो चौदाव्या शतकाच्या सुमारास उदयास आला. इष्टदेवतेची प्रार्थना करणे किंवा गुणगान करणे हा कीर्तनाचा विषय असून भक्तिरसाचा परिपोष करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. ‘दिव्यनाम कीर्तन’ हा कीर्तनाचा एक विशेष प्रकार. त्यात फक्त ‘पल्लवी’ आणि ‘चरण’ हे दोन गीतभाग आढळतात. त्यागराज, विजय गोपाळ आणि भद्राचलम्‌‍ रामदास यांनी अशा प्रकारची कीर्तने रचली. ‘उत्सव संप्रदाय कीर्तन’, ‘मानसपूजा कीर्तन’ आणि ‘संक्षेप रामायण कीर्तन’ हे कीर्तनाचे आणखी काही प्रकार आहेत. अनेक कीर्तने संस्कृतमध्ये रचली गेली असली तरी तेलगू भाषेतील कीर्तनांचे प्रमाण अधिक आहे.

भगवंताच्या गुणांचे वर्णन व गुणगान करणे, भगवंताच्या नामाचे संकीर्तन करणे अशा स्वरूपातील कीर्तनप्रकार हा ‘नवविधा भक्ती’ प्रकरणात येतो. कीर्तनांतून समाजाचे प्रबोधन होते म्हणून कीर्तन परंपरा हे सामाजिक कार्याचे एक परंपरागत अंग बनले आहे.
कीर्तनकारास ‘हरिदास’ वा कथेकरीबुवा म्हणतात. म्हणून कीर्तनकारबुवांच्या नावाआधी हरिभक्त परायण (ह.भ.प.) अशी बिरुदावली लावली जाते. कीर्तन सादरीकरण ही एक कला आहे. कीर्तनाच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते. श्रोत्यांच्या मनात इतर रसांच्या सहाय्याने भक्तिरसाचा परिपोष करणे हे कीर्तनाचे प्रयोजन असते. त्यामुळे नीटनेटका पोषाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद इ. सर्व रससाधने कीर्तनाची प्रमुख अंगे आहेत.

परंपरेनुसार कीर्तनसंस्थेचे आद्यप्रवर्तक नारदमुनी मानले जातात. श्रीमद्भागवतादी ग्रंथातून कीर्तनाचा महिमा मोठ्या विस्ताराने वर्णिला आहे. मराठी भाषक राज्यांमध्ये म्हणजे गोवा, महाराष्ट्र राज्य, तसेच बेळगाव, कारवार, सदाशिवगड आदी व अन्य मराठी लोकांच्या प्रांतांत नारदीय कीर्तन परंपरा अजूनही समाजप्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम म्हणून कीर्तनकार बुवांनी उपयोगात आणले आहे व ही परंपरा पुढे चालू राहावी म्हणून ‘हरिभक्त परिषद’ नावाची संस्था विविध राज्यांत सक्रिय आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास आदी संतांनी व त्यांच्या शिष्यपरंपरानी कीर्तनसंस्थेचा विशेष प्रचार केला. संत नामदेवाना तर महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात.
नारदीय संप्रदायाच्या कीर्तनात ‘पूर्वरंग’ व ‘उत्तररंग’ असे दोन भाग असतात. नमन, निरुपणाचा अभंग व निरुपण यास पूर्वरंग म्हणतात आणि उदाहरणादाखल एखादे आख्यान सांगणे यास ‘उत्तररंग’ म्हणतात. आख्यानाचे पर्यवसान आरंभीच्या निरुपणाच्या अभंगात करून तो अभंग आणि ‘हेचि दान देगा देवा’ हा तुकारामाचा अभंग गाऊन आरती करतात.

भारताच्या सर्व प्रांतांत कीर्तन व भजन यांच्या विविध प्रथा प्रचलित आहेत. कीर्तनसंस्था हे लोकशिक्षणाचे, धर्मशिक्षणाचे प्रभावी साधन आहे.
गोवा राज्यात ‘हरिभक्त परिषद- गोमंतक’ या नावाची संस्था नारदीय कीर्तन परंपरा पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवून गेली 40 हून अधिक वर्षे सक्रिय आहे. दरवर्षी ‘नारद जयंती समारोह’ वैशाख कृष्णपक्ष द्वितीय तिथीदिनी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने देवर्षी नारदमुनीच्या मूर्तीची पालखी मिरवणूक, मूर्तीचे विधिवत पूजन, नंतर कीर्तनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण, भजन, आरत्या आदींचे आयोजन केले जाते. मंगलाचरण, पूर्वरंग, उत्तररंग अशा स्वरूपात गोवा, कोंकण (सिंधुदुर्ग), बेळगाव, कारवार, सदाशिवगड येथील ज्येष्ठ व नवोदित कीर्तनकार या उत्सवात सहभागी होतात. कीर्तनातून धर्मजागृती, धर्मरक्षण, भगवतभक्ती, समाजशिक्षण व समाजप्रबोधन करण्याचे ध्येय बाळगून ‘हरिभक्त परिषद, गोमंतक’ ही संस्था कार्यरत आहे.
या वर्षी नारद जयंती समारोह, हरिभक्त परिषद- गोमंतक व श्रीवाठादेव मंदिर जीर्णोद्धार समिती (वाठादेव, डिचोली) यांच्या संयुक्त सहकार्याने रविवार दि. 7 मे 2023 रोजी सायंकाळी 3.30 वा. ते 7 वा. या वेळेत श्रीवाठादेव मंदिर सभामंडपात आयोजित करण्यात आला आहे.