कासारवर्णे ग्रामस्थांचा पाण्यासाठी पाण्यात ठिय्या

0
26

>> तालुक्यातील मोठ्या प्रकल्पांसाठी पाणी वळवले जात असल्याचा संशय

>> आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

बैलपार नदीकिनारी जलसिंचन खात्याकडून २७ कोटी रुपये खर्चून २ पंप हाऊस बसवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. शेतकरी आणि कासारवर्णे पंचायत मंडळाला विश्वासात न घेता हा प्रकल्प उभारला जात आहे. हे पाणी जलप्रक्रिया प्रकल्पांबरोबरच मोपा विमानतळावरील गेमिंग झोन आयुष हॉस्पिटलसाठी वळवले जाईल, असा संशय कासारवर्णेच्या ग्रामस्थांना असून, तसे झाल्यास नदीकिनारी असलेले ५०० हून अधिक शेतकरी-बागायतदार संकटात येणार आहेत. त्यामुळे काल येथील शेतकरी व ग्रामस्थांनी चक्क बैलपार नदीपात्रातील पाण्यात उभे राहून जल आंदोलन केले. दरम्यान, आमदार प्रवीण आर्लेकर यांनी हस्तक्षेप केल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित ठेवण्यात आले आहे.

काल सकाळी या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी शेतकर्‍यांनी चक्क नदीपात्रातील पाण्यात बसून आंदोलन केले. तसेच या आंदोलनात महिला देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध प्रकारच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला
या आंदोलनाची माहिती आमदार प्रवीण आर्लेकर यांना मिळताच दुपारी २ वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. जलसिंचन खात्याचे अधिकारी, स्थानिक पंचायत, स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी यांची संयुक्त बैठक येत्या दोन दिवसांत घेऊन हे पाणी नक्की कुठे वळवले जात आहे, याची खातरजमा केली जाईल. हा प्रकल्प जनतेच्या विरोधात असेल, तर आपण हा प्रकल्प आपण बंद पाडणार आहे, असे आर्लेकर यांनी सांगितले. या आश्‍वासनानंतर हे जल आंदोलन तात्पुरते स्थगित ठेवत असल्याची माहिती भारत बागकर यांनी दिली.