काँग्रेसचे उमेदवार योग्य वेळी घोषित

0
17

गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाकडून राज्यातील लोकसभा निवडणुकीवर विचारविनिमय केला जात असून योग्य वेळी दोन्ही जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे, असे काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकम टागोर यांनी पत्रकारांशी बोलताना येथे काल सांगितले. माणिकम टागोर यांचे गोव्यात आगमन झाले आहे. येथील काँग्रेसच्या मुख्यालयात गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. राज्यात अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस समितीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला जात आहे. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली जात आहे, असे टागोर यांनी सांगितले. काँग्रेस पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये गटबाजी नाही. काँग्रेस पक्षासाठी सर्वजण एकजुटीने कार्य करीत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.