कला अकादमीच्या जीर्णोद्धाराचे ६० टक्के काम पूर्ण

0
12

>> ऑगस्टपर्यंत संपूर्ण काम होणार ः कला संस्कृतीमंत्री गावडे

कला अकादमीच्या वास्तूच्या जीर्णोद्धाराचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ४० टक्के काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण होणार असल्याचा विश्‍वास कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी काल व्यक्त केला.

अकादमीच्या इमारतीच्या सर्व बाजूंच्या स्लॅबवर पावसाचे पाणी साचून रहायचे व त्यामुळे इमारतीला गळती लागली होती. स्लॅबवर वॉटर प्रुफिंगचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. स्लॅबवर जे पाणी साचून राहत होते ते वाहून जाण्याची सोय करण्यात आली आहे. ही गळती अशीच चालू राहिली असती तर या वास्तूचे मोठे नुकसान झाले असते. त्यामुळे इमारतीला ह्या गळतीमुळे जो धोका निर्माण झाला होता तो सर्वांत प्रथम दूर करण्यात आला असल्याची माहिती गावडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

मंत्री गावडे यांनी काल पत्रकारांना कला अकादमीच्या वास्तूत नेऊन तेथे चालू असलेल्या कामाचे दर्शन घडवले. या वास्तूचा केवळ जीर्णोद्धार करण्यात येत असून वास्तूच्या मूळ रचनेत कोणताही बदल घडवून आणला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही लोक वास्तूच्या जिर्णोद्धाराचे विनाकारण राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. खास करून चार्ल्स कुरैया फाऊंडेशनने विनाकारण ह्या प्रश्‍नावर राजकारण केल्याचा आरोप गावडे यांनी केला.

हे काम चालू असताना कुणालाही आत का सोडण्यात येत नाही याविषयीचा खुलासा करताना गावडे यांनी, हे बांधकाम चालू असताना कुणालाही आता सोडणे हे सुरक्षेच्या दृष्टीने जिकिरीचे असल्यामुळे काम चालू असेपर्यंत कुणालाही अकादमीच्या वास्तूत जाऊ दिले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे काम करताना कला अकादमी वास्तूतील म्युरल्स, पेंटिंग्ज सुरक्षित ठेवण्यात आली आहे. आम्ही ह्या वास्तूत जे-जे काही आहे ते सांभाळून ठेवणार आहोत. मी अकादमीचा जरी अध्यक्ष असलो तरी कला अकादमी ही गोव्यातील जनतेची आहे असे गावडे यांनी यावेळी सांगितले.

अकादमीचा जीर्णोद्धार व त्याचबरोबर दुरुस्तीही केली जात आहे. ब्लॅक बॉक्सला राजांगणासारखे रूप देण्याचा विचार असल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले.